व्यस्त पण मस्त?

करमणूक म्हणजे आपल्याला आनंद देणाऱ्या विविध गोष्टी. हो हे खरे आहे कि आज त्याची व्याख्या बदलली आहे पण साधने तीच आहेत उलट त्यात वाढ झाली आहे . 

माझ्या लहानपणी मनसोक्त खेळणे, वाचन करणे, कधीतरी चित्रपट पाहायला जाणे, वर्षातून दोन वेळा म्हणजे वाढदिवस आणि दिवाळीला नवीन कपडे खरेदी करणे, नातेवाईकांना भेटणे अशा गोष्टीतून करमणूक होत असे. दूरदर्शन वरील गजरा, छायागीत, चित्रपट, फुल खिले है गुलशन गुलशन असे कार्यक्रमही खूप करमणूक करायचे. मित्र मैत्रिणी मिळून गप्पा टप्पा मारणे, आई-वडील, मुले मिळून एकत्र हसत खेळत जेवणे ह्याही गोष्टी आनंद देऊन जात आणि हे आपले आयुष्यच होते. आपल्याला वेगळा वेळ काढावा लागत नव्हता. सगळ्या गोष्टींसाठी वेळ होता. मला वाटते जीवन शांत पण निखळ होते. प्रचंड स्पर्धा नव्हती. म्हणून कधी करमणुकीसाठी वेगळा वेळ काढावा लागला नाही. रोजच्या जगण्यातूनच आनंद शोधण्याची कला आपल्याला अवगत होती.

" हा वीकएंड फ्री ठेवा रे" आपण बाहेर जायचा प्लॅन करत आहोत असे आई वडिलांना सांगावे लागत नव्हते. त्यावेळी आई वडील सगळे निर्णय घ्यायचे आणि त्यात आपल्याला कुठेही, काहीही चुकीचे वाटत नसे. आता मुलांना विचारून ठरवावे लागते. त्यांचे काही वेगळे ठरले आहे का हे पहावे लागते.

पण आजही करमणूक म्हणजे चित्रपट पाहणे, शॉपिंगला जाणे, टेलीव्हिजन पाहणे आहेच! उलट त्यात ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअॅप, कॉम्पुटर, मोबाइल फोन सारख्या साधनांची भर पडली आहे.

जीवनमान आता खूप वेगवान झाले आहे. आठवड्याचे पाच दिवस घरातील सगळेच आपापल्या कामात असतो म्हणून शनिवार रविवार एकत्र वेळ घालवण्यासाठी आवर्जून काहीतरी योजावे लागते. शॉपिंगला जाणे हे आता नेहेमीचेच झाले आहे. एकत्र असलो तरी गप्पा टप्पा कमीच होतात. आज विचारांची देवाण घेवाण फोन, व्हाट्सअॅप द्वारे होत असते.

चित्रपटाच्या बाबतीत आपली आणि मुलांची आवड जुळतेच असे नाही पण त्यालाही व्हेंटिलेटर सारखे अपवाद आहेत. हा चित्रपट आम्हाला आणि आमच्या मुलांना फारच आवडला. सण समारंभ आवर्जून एकत्र साजरे करणे ही आता गरज बनली आहे. पूर्वी ते आपोआपच होत असे.

करमणूक करमणूक म्हणजे तरी काय? आपण करत असलेल्या गोष्टीतून आनंद मिळवणे. तो मिळवणे आपल्याच हातात असते असे मला वाटते. म्हटले तर वेळ नाही आणि म्हटले तर वेळ आहे असे काहीतरी होत असते. करमणूक ह्या सदराखाली आता अनेक नवीन गोष्टींची भर पडली आहे. आज आपण विविध देश फिरतो, लहानपणी शाळेला सुट्टी पडली की गावी जाणे एव्हढेच पर्यटन माहित होते. आज आपण सुट्टीचे प्लान्स करतो, प्रत्येक सुट्टीत वेगवेगळ्या स्थळांना भेटी देणे आणि जमल्यास विविध देश पाहणेही शक्य झाले आहे. कदाचित आता करमणुकीची व्याप्ती वाढली आहे आणि त्यामुळे त्यावर होणार खर्चही वाढला आहे. तो ज्याला जसा परवडतो तास तो करतो. आपल्या लहानपणी हॉटेलात खाणे हे बोटावर मोजता येईल इतके वेळाच होत असे आता दर वीकेंडला हा कार्यक्रम होतोच. आता आपल्या करमणुकीवरचा खर्चही वाढला आहे आणि त्याची गरजही.

पूर्वी आपण मित्र मैत्रिणी कधीही भेटत असू आणि मनसोक्त गप्पा मारत असू आता त्याला get together म्हटले जाते. आपली पिढीही आता फेसबुक व व्हाट्स अॅप ह्या नवीन साधनांचा सर्रासपणे वापर करू लागली आहे. आपापले करमणुकीचे मार्ग आपण शोधातच असतो. लहानपणी नवीन नवीन पुस्तके वाचणे खूप आनंद द्यायचे आता इंटरनेट वर पुस्तके वाचली जातात. पण सिंगापुर मध्येही मराठी पुस्तकांचे वाचनालय काढून आपली पुस्तके वाचनाची आवड जपण्याची संधी देणाऱ्या सिंगापुर महाराष्ट्र मंडळाच्या समितीला खरंच माझा सलाम!

परदेशात आल्यावर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे महत्व खूपच असते. सणवार साजरे करणे, एकत्र येणे, मराठी नाटके, चित्रपट पाहणे हे सगळे इकडे शक्य झाले ते केवळ महाराष्ट्र मंडळ सिंगापुर मुळेच. 

पण एक नक्की आता पहिल्यासारखे शांत आणि संथ जीवन राहिलेले नाही. सतत गोष्टी घडत असतात आणि आपण आनंदाच्या शोधात पुढे पुढे जात असतो, निरंतरपणे........ 

- अनुराधा मिलिंद साळोखे

1 टिप्पणी: