अध्यक्षांचे मनोगत

मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानते. मागच्या संपूर्ण वर्षभर मला साथ देणाऱ्या आणि मंडळाच्या कामात हातभार लावताना स्वतःला झोकून देणार्‍या २०१६ च्या कार्यकारिणीची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मी ऋणी आहे. ह्यावर्षीही, नवीन कार्यकारिणीसोबत मिळून-मिसळून अनेक चांगले कार्यक्रम होतील ह्याची मला खात्री आहे. 

ऋतुगंध २०१६ मधील समितीचा हा शेवटचा अंक आहे. मागील वर्षभर संपादक जुई चितळे आणि सहकाऱ्यांनी ज्या निष्ठेने आणि कलात्मकतेने ऋतुगंधचे निरनिराळे अंक आपल्यापर्यंत पोचवले ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. जुईबरोबरच शाल्मली वैद्य (सहसंपादक), राजश्री लेले (जनसंपर्क), चारू आफळे व स्वांतना पराडकर (कला आणि सजावट) यांचेही मनापासून आभार. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ब्लॉग संयोजक यशोवर्धन जोशी आणि सुमेध ढबू ह्या दोघांचा. २०१५ मध्ये यशोवर्धनाच्या पुढाकारामुळे ऋतुगंधला ब्लॉगच्या स्वरुपात नवीन रुप प्राप्त झाले. तसेच सुमेध ढबू याने ब्लॉगवर दिसणारी 'लेखक सूची' नावारूपास आणली. 

मला वाटतं ऋतुगंधच्या ह्यावेळेच्या अंकाचा विषय जसा 'नाव नसलेली नाती' आहे त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र मंडळाशी नाव नसलेले पण घट्ट असे नातं आहे. इथे आपल्याला अगदी घरच्यासारखं वाटतं आणि म्हणून आपण सगळे नित्यनेमाने इथल्या कार्यक्रमांना हजेरी लावतो. मंडळात एकत्र जमून आपले सण साजरे करणे, आपली भाषा, संस्कृती, साहित्य ह्या गोष्टी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जोपासणे, सुग्रास मराठमोळ्या भोजनाचा आस्वाद घेणे... या आणि अश्या अनेक गोष्टी यंदाही आपण करणार आहोत. 

मंडळाच्या सभासदांमध्ये अनेक उत्तम कलाकार आहेत जे आपल्या कौशल्याने, मेहनतीने आणि व्यावसायिकरित्या दर्जेदार कार्यक्रम आपल्यासमोर सादर करतात. मग तो कार्यक्रम वाद्यवृंदाचा असो, नाटक असो किंवा एखादे नृत्य असो! मंडळाच्याच नाही तर सिंगापूरच्या इतरही मोठमोठ्या व्यासपीठांवर त्यांची ही कला सादर व्हावी असा प्रयत्न मी ह्यापुढेही करत राहीन. 

गेल्या वर्षी मंडळाचा कारभार अधिक पारदर्शी आणि सुलभ व्हावा, त्याचप्रमाणे कार्यपद्धती अधिक सुसंगत आणि सोयीची व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक काही बदल केले आहेत आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचाही यथायोग्य वापर करून घेतला. या वर्षीही तसेच करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 

मी तुम्हा सर्वांना या वर्षीच्या ममसिंच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित करते कारण तुमच्या सहभागाशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला रंगत येणार नाही. नेहमीप्रमाणे याहीवर्षी मंडळाच्या कार्यक्रमांची सुरुवात 'गुढीपाडवा' साजरा करुन होणार आहे. ह्या कार्यक्रमात 'आम्ही दोघे...आमचे नाते' ह्या फॅशन-शोमधे तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला सोबत घेऊन याल अशी आशा आहे. तसेच ऋतुगंध २०१७ चमूची ओळख करून घ्यायला तुम्ही उत्सुक असलाच. तेव्हा लवकरच भेटूया.



आपली नम्र, 
अस्मिता तडवळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा