महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता


दिवाळी २०१५

महाराष्ट्र मंडळाने या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दोन दर्जेदार नाटके सादर केली. बालनाट्य "बे एके बे" आणि मोठ्यांचे गूढरम्य नाटक "बेचकी."

बालनाट्य "बे एके बे"

बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर बालनाट्य सादर केले गेले. ममंसिं परिवारातील आठ उत्साही मुलांचा त्यात धमाल सहभाग होता. रमा कुलकर्णी यांचे दिग्दर्शन तर दिग्दर्शन साहाय्य नलिनी थिटे व विशाल पेंढारकर यांचे होते. नेपथ्य कौस्तुभ राव यांचे तर ध्वनीसंयोजन व संगीत अक्षय अवधानी यांचे होते. प्रकाश योजना सांभाळली विनय पराडकर यांनी. रंगभूषा पाहिली राजश्री लेले आणि मीनाक्षी मांढरे यांनी. सर्व बालकलाकारांच्या आईवडिलांचाही यात मोलाचा सहभाग होता.


बेचकी


यावर्षी ममंसिंने प्रथमच सादर केले एक गूढ (suspense) नाटक. नेहमीपेक्षा वेगळा पण अगदी वर्षानुवर्षांच्याच जोशाने एक दर्जेदार व नेटका प्रयोग सादर झाला. सात गुणी सभासद कलाकारांचा त्यात सहभाग होता. दिग्दर्शन होते अमित जोशी यांचे. संयोजन स्वप्नील लाखे व पुष्कर प्रधान यांचे. नेपथ्य साहाय्य होते लीना बाकरे, ज्योती जोशी, प्रीती तेलंग, अनंत शिंदे, सिद्धार्थ देशपांडे यांचे. ध्वनीसंयोजन व संगीत अक्षय अवधानी यांचे होते. प्रकाश योजना सांभाळली शुभेन फणसे यांनी तर रंगभूषा पहिली राजश्री लेले आणि मीनाक्षी मांढरे यांनी.

रुचकर अशा दिवाळी फराळाच्या वाटपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सालाबादप्रमाणेच दोन्ही नाटकांना रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. साधारण ३५० प्रेक्षकांनी हजेरी लावली. 



- नलिनी थिटे




बारा गावचे पाणी


रविवारी १० जानेवारीला ग्लोबल इंडियन शाळेत दुपारी २.३० वाजता वाचनालय दिवस आणि "बारा गावचे पाणी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेळ जगतातील प्रसिध्द पत्रकार सुनंदन लेले यांनी बारा गावचे पाणी हा कार्यक्रम सादर केला. वेदश्री जठार यांनी श्री लेले यांची नेटकी ओळख करून दिली.

"बारा गावचे पाणी" हा सुनंदन लेले यांचा कार्यक्रम खूपच आनंद देऊन गेला साऊथ आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ह्या तीन देशांच्या संदर्भात त्यांचे अनुभव त्यांनी कथन केले. उत्कृष्ट फोटो आणि ओघवती भाषाशैली यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. एकूण ९० मिनिटांच्या ह्या कार्यक्रमात ६० स्लाईड दाखवण्यात आल्या.

क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि पत्रकारितेनिमित्त केलेल्या पर्यटनात अनुभवलेले अनेक रोचक प्रसंग ऐकताना वेळ कसा गेला समजलेच नाही. सिंगापूर क्रिकेट संघाचे कॅप्टन चेतन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

समारोप कौस्तुभ राव यांनी केला. मंडळाच्या अध्यक्षा मंजिरी कदम यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे वाचनालय स्वयंसेवकांचा सत्कार केला गेला. यानिमित्ताने श्री लेले यांच्या हस्ते स्वयंसेवकांना एक छोटीशी भेट मंडळातर्फे देण्यात आली. एकूण ६३ लोकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.




- राजश्री लेले


आजीव सभासद सभा 

१० जानेवारी २०१६ रोजी आजीव सभासद सभा घेण्यात आली. २३ आजीव सभासद उपस्थित होते. ममंसिं अध्यक्षा मंजिरी कदम यांनी सभासदांचे स्वागत केले आणि सभेची रूपरेषा मांडली. जनसंपर्क अधिकारी नलिनी थिटे यांनी २०१५ च्या कार्यकारिणीनी केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. उपाध्यक्षा अस्मिता तडवळकर यांनी वर्षभरातील आर्थिक व सभासदांची आकडेवारी मांडली. निवडणूक आयोगाचे नियोजन करण्यात आले. भविष्यातील उपक्रमांबद्दल चर्चा करण्यात आली.

- अस्मिता तडवळकर




वाचनालय पुस्तक तपासणी (Library Stock Taking )



१७ जानेवारी २०१६ रोजी वाचनालय पुस्तक तपासणी करण्यात आली. सतरा सभासदांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. 



ऑडीट

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) ही प्रमाणित संस्था असल्याने आपल्याला दरवर्षी आपल्या जमाखर्चाचे ऑडीट सरकारला सादर करावे लागते. यावर्षी ममंसिंच्या जमाखर्चाची बाजू स्मिता अंबिके यांनी सांभाळली आणि ऑडीटर्स होते अमृत जोशी आणि अमोल करमळकर. ऑडीटचे काम ९५% झाले असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होईल.


- मंजिरी कदम




आगामी कार्यक्रम


  • घरगुती वस्तू वापरून विज्ञान व संक्रांती हळदी कुंकू
  • वार्षिक सर्व साधारण सभा