बदलते रिश्ते

“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” असं तुकारामांनी म्हटलंय, ते दुसऱ्या अर्थाने होते. पण वयाच्या कुठल्याही वळणावर लहानपण सगळ्यांनाच आकर्षित करते. प्रत्येक वर्षाच्या प्रवासानंतर तो टप्पा आणि त्या कागदी नावा, अधिकाधिक दूर जातात. त्यांच्या पाणरेखा मात्र अधिकच रेखीव बनत जातात. त्या पुढे इतक्या स्पष्ट होतात की पैलतीर दिसायला लागल्यावर अनेकांच्या बाबतीत ते लहानपणच पुन्हा जगायला मिळाले की काय असे वाटते.

आई-मूल हे जगातील सर्वोच्च घट्ट नातं, ह्याबद्दल दुमत नाही. लहान मुलाला ह्या जगात आणल्यावर पहिल्यांदा दर्शन होते तेव्हापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोघेही एका अदृष्य नाळेनी जोडलेले असतात. कधी व्यवहारांच्या पिळांनी अनेक गाठी ह्या नाळेला बसल्या असे जगाला भासत असते. जगालाच काय, पण एखाद्या अस्वस्थ क्षणी दोघांनाही असे वाटू शकते की आपण दुरावलो तर नाही नां! मात्र अशी वेळ येतेच जेव्हा नात्यांची भक्कम ओढ जाणवते! तेव्हा मात्र सगळ्या गाठी विरघळतात आणि ही अदृष्य नाळ सुतासारखी सरळ होतेच! नाळेच्या एका टोकाला आई तर दुसरीकडे मुल असते. पैलतीर दिसू लागल्यावर बरेचदा आई व मूल ह्यांनी जागांची अदलाबदली केली की काय असा भास होतो.

तुम्ही पलंगावर पडून होतात. स्वत: उठून कुठेही जाण्याची तुमच्यात ताकत नव्हती. कंटाळा आला की कधी हातपाय हलवून, कधी उगाच गोड हसून, तर कधी चक्क रडून तुम्ही तिचे लक्ष वेधून घेतले असेल. ती हातातील सारी कामे सोडून लगेच तुमच्या जवळ आल्यावर तुम्हाला जग जिंकल्याचा आनंद झाला असेल! लहानपणी तिने तुम्हाला चमच्याने दूध पाजले असेल. तुम्ही ते न पिण्यासाठी आक्रस्ताळेपणा केला असेल. तिने जबरदस्ती पाजल्यावर बळेच थुंकून टाकले असेल. पण तरीही बिलकुल न रागावता तिने निदान दोन घोट तरी बाळाच्या पोटात जावे म्हणून प्रयत्न केले असतील! तिने आठवणीनी वेळेवर डायपरचा पुरवठा घरात ठेवला असेल. तुमचा डायपर चुकून ओला राहिल्यावर तुम्ही हक्काने तिला बोलावून घेतले असेल. डायपर बदलल्यावर तुम्ही कधी उगाच तो ओढून तिला सतावले असेल. पुढे तुमचे प्रमोशन डायपर कडून पॅंटीपर्यंत झाल्यावर तिने आनंदाने तेही काम निभावले असेल. पाळण्यातून बाहेर पडून तुमची पावले आता बाबागाडी चालवीत असतील. तेव्हा तुमच्या प्रत्येक चालीकडे तिचे बारीक लक्ष असेल. तुम्ही समोरच्या खोलीतून माजघरात न अडखळता आल्यावर, तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचा आनंद तिला झाला असेल. आम्ल प्रतिक्षिप्त झाल्यामुळे तुमच्या जठरातील आम्ल घशापर्यंत येऊन इजा पोहोचवित असेल. रडून नव्हे तर त्या आम्लाने घशाला केलेल्या छोट्या बोचांनी तुमचा आवाज घोगरा झाला असेल. तेव्हा जबरदस्तीने तुम्हाला बसलेल्या स्थितीत ठेवून, तिने औषधांबरोबरच तुमच्या विव्हळण्यावर मायेची फुंकर घातली असेल. तुम्हाला पलंगावर जबरदस्तीने पडून रहावे लागल्यावर दगडी पाटीवर तुम्ही काढलेल्या रेघोट्यांना तिने “एक उत्तम चित्र” म्हणून सगळ्यांसमोर उत्साहाने मिरविले असेल. हे आणि असे कित्येक सुखदु:खाचे क्षण आईने तुमच्याबरोबर जगले असतील.

देव न करो पण कदाचित तिच्या संध्याकाळी तिला घास भरवायाला लागले, तिची स्वच्छता करावी लागली, ती वॉकर घेऊन चालताना लक्ष ठेवावे लागले, अंथरुणावर खिळली असताना गाणी, गोष्टी सांगाव्या लागल्यास, अगदी सतत डोळ्यात प्राण ओतून देखभाल करावी लागल्यास....बदलते रिश्ते करीत असलेली मागणी पुरविणार? पैलतीरापर्यंत पोहोचल्यावर तिला यातले सगळे किंवा काही क्षण कदाचित नाळेच्या टोकांची अदलाबदल करून जगावे लागलेच, तर हे बदलते नाते आईच्याच समर्थपणाने निभावण्याची शक्ती तुमच्यात आहे? तिने जशी अतीव आनंदाने आणि निःस्वार्थीपणे स्वत:ची शक्ती पणाला लावून तुमच्या वाटचालीत साथ दिली, त्याच्या एक दशांश तरी तुम्ही देऊ शकता? हा एक तीक्ष्ण प्रश्न आहे.

लहानपणी इडापिडा टळावी, तुम्हाला नजर लागू नये म्हणून आईने इवलीशी जिवती तुमच्या गळ्यात बांधली असेल. ती जिवती आता कदाचित तुमच्या जुन्या सामानात बांधून पडली असेल. आईवरच्या कविता वाचून फेसबुकवर यांत्रिक लाईक्स देताना एकदा तरी जीवनाच्या ह्या तीक्ष्ण प्रश्नाचे उत्तर शोधल्यास, त्या जिवतीकडून एक खराखुरा लाईक तुम्हाला नक्कीच मिळेल!

- अरुण मनोहर 

 

२ टिप्पण्या: