अनोखी मैत्री

नमस्कार मैत्रिणींनो! आजचा ऋतुगंध अंक शरद हा मैत्री विशेषांक आहे. त्या निमित्ताने एखाद्या अनोख्या मैत्रिणीची अचानक ओळख होऊन खुप जवळीक निर्माण होते तसे माझे झाले आहे. त्याने स्वत: मला त्याची आेळख करून दिल्यामुळे, माझ्या आयुष्यात त्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून दिली. अशाच एका वेगळ्या वाटणाऱ्या सख्या सोबती विषयी मी तुम्हाला सांगणार आहे.

नाशिक-पुणे हा आमच्यासाठी नेहमीचाच प्रवास. मला प्रवासात बाहेरचे पदार्थ खाल्ले की त्रास होतो म्हणून मी नेहमी जेवणाचा डबा घरुनच बनवून घेते. घरची गाडी असली की बरे असते, पाहिजे तेथे गाडी थांबवून सर्व सोय करता येते. मला टपरीवरचा चहा खूप आवडतो. पावसाळ्यात प्रवास करताना आलं-गवतीचहा घालून केलेला चहा प्यायला की अंगात तरतरी येते. त्यामुळे पुढचा प्रवास कंटाळवाणा होत नाही. सहसा आम्ही सकाळीच प्रवासाला निघतो, नाशिक पुणे हा रस्ता फारसा चांगला नाही. त्यात खूप वळणं आहेत, त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे जसजसा सूर्य वर येत जातो तसतसे ऊन व रहदारी, दोन्ही वाढत जाते. त्यामुळे पुण्याला पोहोचायला बराच वेळ लागतो. बरोबर शिदोरी घेतली असल्याने रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाच्या सावलीत बसून तेथे छान पैकी जेवण करता येते. मोकळ्या हवेत चार घास जास्त खाल्ले जातात. सकाळी लवकर उठल्याने व प्रवास केल्याने थकवा आलेला असतो, त्यात पोटपूजा झाल्यावर खूप सुस्ती येते. मग तेथेच छान हिरव्या गवतावर आडवे होउन जातो. 

एकदा असेच आम्ही जेवण आटपून थोडी विश्रांती घ्यावी म्हणून चटईवर झोपलो होतो. याच ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा जेवण केलेले आहे. दोन-तीन झाडे जवळजवळ असल्याने त्याची दाट सावली पडलेली असते. उन्हाळ्यात तर येथे खूप थंड वाटते .चटईवर झोपले की वर मोकळे आकाश छान दिसते. सहज आजुबाजुला बघताना बाजूच्या झाडाकडे लक्ष गेले तर ते झाड पूर्णपणे वाळून गलेले दिसले. एखाद्या माणसाच्या हाडाचा सांगाडा दिसावा तशा झाडांच्या फांद्या दिसत होत्या. दोन महिन्यांपूर्वी तर हे झाड चांगले हिरवेगार होते पण आता मात्र पूर्णपणे सुकून गेले होते! "काय झाले असेल याला", मी विचार करत हळहळ व्यक्त करत होते. कितीतरी येणारे-जाणारे वाटसरू याच झाडांच्या सावलीत विश्रांती घेत असत. आता फक्त जळणासाठी या झाडाचा उपयोग होईल असा विचार मनात करत होते. माझ्या मनातले विचार जणू झाडाला समजले तसे झाड माझ्याशी बोलू लागले .

”मी पूर्णपणे वाळून गेलो म्हणून काय झाले? मी तुम्हाला फळं, फुलं, शीतल छाया देऊ शकत नाही म्हणून मी निरोपयोगी झालो असं कसं समजतेस तू? तूझं आणि माझं जन्मजन्मांतरीचं नातं आहे. तुझ्या जन्मापासून मी तुझा सोबती आहे”. मी म्हटलं, “कसे काय?” तसे झाड म्हणाले, "अगं ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी तुला झोपवण्यासाठी जी बाज (पलंग) होती ती माझ्याच या वाळलेल्या लाकडापासून बनवलेली आहे. तुझे लालन पालन करण्यासाठी जो पाळणा बांधलेले होता ती ही माझीच निर्मिती, एवढेच नाही तर तू बाल्य अवस्थेत असताना तुझे मन रमवण्यासाठी बनवलेली खेळणी ही माझ्या पासून बनलेली आहेत”. मी म्हटलं, ”ठीक आहे बाबा, हे सगळं बालपणाचं, नंतर काय?” तसे झाड म्हणाले, ”तू थोडी मोठी झालीस तेव्हा गल्लीमध्ये खेळण्यासाठी जात असत. विटीदांडू तर तुझा आवडता खेळ होता. तो कशा पासून बनतो हे माहित आहे ना तुला? शाळेमध्ये टेबल खुर्ची एवढेच काय, तुझ्या बाईंने रागाने तुला फेकून मारलेले डस्टर ही माझ्याच अवयवापासून बनवले आहे. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, मी आश्चर्याने झाडाकडे बघत होते. तसे झाड माझ्याकडे पाहून हसत म्हणाले, ”बघू नकोस, तुझ्या आयुष्यात माझे अनेक उपयोग आहेत, फक्त हे नेहमी लक्षात ठेव.”

मी लक्ष देऊन ऐकू लागले तसे झाड म्हणाले, ”तू नवरी होऊन बोहल्यावर चढलीस तेंव्हा देखिल मी तुझ्या बरोबर होतोच की”. मी म्हटलं, “चल काहीतरीच काय? मी नवरी होण्याशी तुझा काय संबंध रे?” तसे झाड म्हणाले, ”वा वा, तुझ्या लग्नासाठी जो भव्य मांडव घातला होता तो विसरलीस वाटतं? आणि हो, लग्नानंतर होणारा होम, ते सुद्धा माझ्या मदतीशिवाय होऊच शकत नाही, कारण होमासाठी लागणाऱ्या समिधा माझ्या पासून बनलेल्या आहेत”. आता मात्र हे वाळलेले झाड माझ्या आयुष्यात किती महत्वपूर्ण व उपयुक्त आहे हे मान्य केले. झाड पुन्हा बोलू लागले. ”अगं थांब थांब, इथेच काही तुझी नी माझी सोबत संपत नाही, तर जेव्हा तुला पुढच्या आयुष्यासाठी आधाराची खरी गरज भासेल तेव्हाही मी तुझा दोस्त बनून तुला आधार देईन." झाडाचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यासमोर माझी साठी पूर्ण उभी राहिली आणि तेव्हा लागणाऱ्या काठीची गरजही लक्षात आली. किती विचारपूर्वक बोलत होते हे झाड. आपण कधीच इतका पुढचा विचार करत नाही. माझ्या आयुष्यात या माझ्या 'सोबती' चे अस्तित्व मी मान्य केले. 

शेवटी झाड म्हणाले ,”जेव्हा तुझा अंत होईल त्याही वेळेस तू माझ्याच अवयवापासून बनलेल्या तिरडीवर झोपून तुझा अंतिम प्रवास करशील आणि शेवटी तुझी चिता रचली जाईल, तीही या सुकलेल्या माझ्या देहाची. आता नीट समजलं नं तुला? म्हणूनच म्हणत होतो मी तुझ्या जन्मा पासून शेवटी अंतिमयात्रे पर्यंत तुझा सखा सोबती होऊन तुझी साथ देईन. तुला माझ्या मध्ये सामावून घेईन.” मी त्याचे बोलणे ऐकून त्याला कोपरापासून हात जोडले आणि म्हटलं, ”चुकले माझे, मी तुझ्या अस्तित्वाचा कधी विचारच केला नाही. वाळलेली लाकडं फक्त जळणासाठीच उपयोगी असतात असे मी समजत होते." त्यानं माझं अज्ञान दूर करून हे सर्व समजावून सांगितलं त्या बदल मी झाडाचे हात जोडून आभार मानत असताना माझे पती मला हालवून हालवून उठवत म्हणाले, ”आभार प्रदर्शन झाले असेल तर उठा आता पुढच्या प्रवासाला निघायचे कि नाही?” 

या वृक्षाच्या थंडगार हवेत माझा डोळा लागला होता. माझं स्वप्न भंग झालं आणि मी डोळे उघडून त्या झाडाकडे आदराने पहात राहीले आणि त्याच क्षणी झाड खुदकन हसले !!!


- सौ. प्रतिभा विभुते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा