पुस्तक परिचय - गॉन गर्ल

निक डन. न्यूयॉर्कमधल्या एका मासिकात नोकरी करणारा एक लेखक. रुबाबदार, हजरजबाबी, पुरुषत्वाच्या प्रचलित कल्पनांप्रमाणे देखणा आणि छानशी विनोदबुद्धी असलेला तरूण. त्याच्याशी बोलताना तो चतुर, सुस्वभावी आणि आत्मविश्वासाने भरलेला वाटतो. ॲमी इलियट. न्यूयॉर्कमध्ये राहणारी, सुंदर, श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आणि स्वतंत्र असलेली आधुनिक तरूणी. तिच्या व्यक्तिमत्त्वात गोडवा आहे, उत्तम संगोपनातून आलेले सुसंस्कार आहेत आणि आधुनिक तरुणीचा आत्मविश्वास आहे.

निक आणि ॲमी एका सामायिक मित्राच्या पार्टीत भेटतात आणि त्यांच्यातल्या आकर्षणाच्या ठिणग्या लगेचच तडतडू लागतात. थोडा काळ चाललेल्या प्रणयाराधनेनंतर व एकमेकांमध्ये मनाने व शरीराने पुरेसे गुंतल्यानंतर ती दोघं लग्नाच्या बंधनात बांधून घेतात.

बदलत्या आर्थिक वास्तवात लग्नानंतर थोड्याच काळाने निकची आणि त्यानंतर काही काळाने ॲमीचीही नोकरी जाते. त्यातच निकला त्याच्या आईला कॅन्सर झाल्याची वाईट बातमी समजते. आईची काळजी घेता यावी म्हणून निक आणि त्याच्याबरोबर ॲमीही निकच्या मूळ गावी म्हणजे मिसूरी राज्यातल्या नॉर्थ कार्थेज नावाच्या गावी जाऊन राहतात. ॲमीच्या भविष्यासाठी तिच्या आईवडिलांनी साठवलेले सगळे पैसे वापरून निक आणि त्याची बहिण मार्गो त्या गावात एक बार चालू करतात. त्यांच्या तिथल्या उपनगरी घरात ॲमीच्या मते मॅकमॅन्शन) ॲमी गृहिणी होऊन राहते. असे काही दिवस व्यतीत केल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवशीच ॲमी अचानक गायब होते आणि सुरू होते एक अंगावर काटा आणणारी गोष्ट.

जिलियन फ्लिन या लेखिकेच्या "गॉन गर्ल" या कादंबरीत ही एका लग्नाची गोष्ट थरारकपणे उलगडत जाते. प्रणयाच्या हलक्या गुलाबी रंगाच्या छटेपासून सुरू होणारी ही कादंबरी हळूहळू गडद होत जाते आणि शेवटी एका साकळलेल्या काळपट लाल क्षणावर येऊन थांबते.

कादंबरीच्या पहिल्या अर्ध्या भागात लग्नापूर्वीचा नुसताच निक; नोकरी गेल्यानंतरचा निक; आईच्या आजारपणाची बातमी समजलेला निक; निकची आजारी आई; स्मृतीभ्रंश झालेले, सतत डोक्यातल्या कोणत्यातरी बाईला शिव्या घालणारे आणि असायलममधून वारंवार गायब होऊन घरी उगवणारे त्याचे वडील ही चित्रं ॲमीच्या नजरेतून वाचकाला दिसतात. ॲमीचे मानसशास्त्रज्ञ असलेले आणि एकमेकांच्या प्रेमात भीतिदायकपणे सतत आकंठ बुडालेले आईवडिल. "ॲमेझिंग ॲमी" या अतिशय लोकप्रिय बालकथामालिकेतून त्यांनी अजरामर केलेले तिचे बालपण; त्यातून कमवलेला बक्कळ पैसा आणि त्यातूनच तिला आदर्श मुलगी बनवण्यासाठी दिलेले धडे; ॲमीच्या मित्र मैत्रिणींबाबतच्या काही विचित्र घटना; लग्नाच्या प्रत्येक वाढदिवशी ॲमीने रचलेला, निकची कसोटी पाहणारा ट्रेझर हंटचा खेळ इत्यादी गोष्टी निकच्या दृष्टिकोनातून येतात.

कादंबरीच्या उत्तरार्धात मात्र या चित्रांमधल्या दिसलेल्या आणि न दिसलेल्याही छटा हळूहळू गडद होऊ लागतात आणि ती चित्रे आपल्यासमोर आणणाऱ्या पात्रांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उमटू लागते.
ॲमी गायब झाल्यानंतरचा पोलिस तपास, शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे वागणे, प्रसारमाध्यमांचा अचरटपणा अशा अनेक गोष्टींमधून समाज, समाजाच्या धारणा आणि त्याचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम मार्मिकपणे अधोरेखित होतो. पण कादंबरीचा मुख्य गाभा आणि शक्तीस्थान म्हणजे निक आणि ॲमीच्या खाजगी आयुष्याचे मर्मभेदी चित्रण. त्या दोघांच्या वागण्याने आणि त्यांच्या विचारांनी वाचकाच्या मनात नेमके प्रश्न उभे करण्याची लेखिकेची हातोटी विलक्षण आहे. निकचा आपल्या वडिलांबद्दलचा द्वेष आणि आपणही कुठेतरी त्यांच्यासारखे असू ही भीती किंवा ॲमीचे अतिआदर्श आईवडिल, त्यांचे सुप्त दडपण आणि सततच्या लक्ष देण्यातून तिच्यात आलेला आत्मकेंद्रितपणा इत्यादी मानसिक जडणघडणींच्या शक्यता ढोबळपणा न येऊ देता लिहील्याने पात्रे खऱ्या माणसांइतकी गुंतागुंतीची होतात आणि त्यांच्या गोष्टीला एक प्रकारची सच्चाई येते. जगातल्या सर्वात आदिम सत्तासंघर्षाचे हे चित्र जितके रोमांचक तितकेच विचारप्रवर्तक होते.

नवरा-बायको एकमेकांच्या इतक्या जवळ असूनही एकमेकांना खरोखर ओळखतात का? एकमेकांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्विकारतात की केवळ आपल्या अपेक्षापूर्तींचं साधन म्हणून पाहतात? व्यक्तीशी लग्न केलं तरी तिचा भूतकाळ, तिचे इतर नातेसंबंध व त्या अनुषंगाने येणारे प्रश्न आपले म्हणून स्विकारतात? मुख्य म्हणजे या सत्तासंघर्षातून बाहेर पडता येणे शक्य आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण करण्यात कादंबरी यशस्वी ठरते.

"What are we? What have we done to each other? Where do we go from here?" ही कादंबरीच्या मलपृष्ठावरील वाक्ये किती समर्पक आहेत ते कादंबरी वाचल्यावरच पुरेपूर समजते.

- निरंजन नगरकर

1 टिप्पणी: