बांडुकल्या त्या कपड्यांमधली

बांडुकल्या त्या कपड्यांमधली
तरुणी गोजिरवाणी
अर्ध्यावरती स्कर्ट संपला
वरुनी मच्छरदाणी

माझ्यामधला तिला बघूनी प्रेमभाव हो जागा
चटकन उठुनी तत्परतेनी दिली बसाया जागा
बसता बसता हसली बघुनी दोन खळ्या पाडोनी

राणी होती बघत एकटक स्मार्टफोनचा चेहरा
ह्या राजाचा श्वास कोंडला पोट आत घेताना
धांदलीत त्या उशीरा कळले स्टेशन जाय निघोनी

तिला बघूनी माझा होई जीव वर खाली
का दैवाने मम जन्माची घाई इतुकी केली
ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते बसलो मूग गिळोनी

का राणीचे हसले डोळे साॅमरसेट येताना
हात हलवुनी उतरुनी गेली बघुन कुणा तरुणाला
“थॅंक्यू अंकल!” शब्द तिचे ते डसती अजुनी कानी...


भवान म्हैसाळकर





४ टिप्पण्या: