स्वरार्थरमणी


 भारतीय शास्त्रीय संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व! ‘किशोरी अमोणकर’ हे नाव ध्यानी आलं की आपल्या सर्वांना भारतीय शास्त्रीय संगीतातील गान सरस्वती ही प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहाते. 

भारतीय संगीतात अनेक प्रतिभासंपन्न कलावंत जन्माला आले आणि त्यांनी आपल्या गायन कौशल्याने संपूर्ण काळ गाजवला. आज अशा अनेक व्यक्ति  आपल्यामध्ये नाहीत हे संगीत जगताचं दुर्दैव म्हणावं लागेल. किशोरी अमोणकर हे संगीतात चतुरंग शिखर गाठलेलं असंच एक व्यक्तिमत्व. 

प्रत्येक कलाकार काही वैशिष्ट्यांसह जन्माला येतो. किशोरी ताईंच्या संदर्भात तसंच म्हणावं लागेल. गायनाचे बाळकडू आई मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडून मिळाले. अर्थातच शिस्तबद्ध तालीम आणि त्या तालीमीला कठोर पणाने जोपासायचा छंद किशोरी ताईंना लहानपणापासूनच लागला. कलावंत म्हटलं की एक जबाबदारीचं कार्य पार पाडायचं असतं. त्यातच एखाद्या घराण्याच्या आद्य पुरुषाकडून तालीम घेतली असेल तर जबाबदारी जास्तीच वाढते. शास्त्रीय संगीतात घराण्यांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक घराणं म्हणजे एक कुळ. कुळ म्हटले की कुळाची मर्यादा, नियम, चालीरीती सगळंच आलं आणि त्या चालीरीतींना सांभाळणारी व्यक्तीपण तेवढ्याच महत्वाची ठरते. प्रत्येक घराण्याचं आपलं वेगळं अस्तित्व आहे, त्यांच्या प्रतिज्ञा आहेत.

जयपूर घराण्याच्या संदर्भात म्हणायचेच झाले तर भारतीय संगीतातील अत्यंत कठीण, क्लिष्ट गायकी असलेलं हे घराणं. या घराण्यातील गायनशैली आत्मसात करण्यासाठी अत्यंत उच्च प्रतीची कल्पकता लागते. या घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जोड राग. दोन किंवा अधिक रागांचे मिश्रण करुन तयार केलेले राग. या रागांमध्ये संचार करण्यासाठी अत्यन्त उच्च कोटीचा कल्पना विलास लागतो. हे राग गाताना कोणत्याही एका रागाची पूर्ण छटा मांडायची नसून अन्य रागाचे खूप चपळाइने मिश्रण करावे लागते. 

किशोरी ताईंना लहानपणापासूनच गाण्याची गोडी लागली, त्यात आईच्या कडक शिस्तीत राहून तालीम घ्यायची म्हणजे जबाबदारीची जाणीव अत्यंत  अल्पवयातचं होऊ लागली. 

उ. अल्लादिया खां म्हणत की “मोघू, ये लडकी तुमसे भी बडा नाम करेगी!” आणि आद्य पुरुषाच्या या म्हणण्याला किशोरी ताईंनी खऱ्या अर्थाने साध्य केले. 

गाण्यातील गांभीर्य आणि प्रत्येक स्वरावर जीव ओतून प्रेम करणं हे गाण्यातलं मर्म आहे. स्वरांचा जितका सखोल अभ्यास होतो तेवढीच गाण्याची उंची वाढत जाते. कलाविष्कारातील आत्मानंद हाच मुख्य असतो. 

किशोरी ताईंचं गाणं ऐकतांना त्यांनी मिळवलेल्या आत्मानंदाचा भास नेहमीच होतो. स्वरांना आपलसं करुन घेणं आणि मग पाहीजे तसं त्यांच्याशी संवाद घालता येणं ही किमया फक्त सिद्ध गायकच करु शकतात. किशोरी ताईंच्या गाण्यात असलेलं गांभीर्य आणि तेज हे त्यांच्या अनेक अनेक वर्षांच्या विचारांचा परिणाम आहे. 

एकदा किशोरी ताई अत्यंत आनंदाने राग बागेश्री गात होत्या. एक तासाहून अधिक राग गाऊन झाल्यानंतर त्या थांबल्या आणि त्यांना काही उदास वाटू लागलं. त्यांनी उदासपणा शोधण्याचा प्रयत्न केला तर समजलं बागेश्री रागाच्या स्वरामधून प्रत्ययास येत असलेला भाव अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे आणि त्यातून असं समजलं की राग गायन हे भावगायनचं अधिक आहे. स्वरांना बोलकं करणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं हे अत्यंत कठीण काम आहे. किशोरी ताईंना हे लिलया सिद्ध झालं होतं. 

शास्रीय संगीत हे भावगायन आहे. याच उत्कटतेमुळे त्यांनी राग आणि रस या विषयावर विचार करायला सुरुवात केली आणि रससिद्धांताचा सखोल अभ्यास केला. त्यांचे जौनपुरी, काफीकानडा, कौशीकानडा, बहादुरी तोडी हे राग ऐकले की त्यांच्या सखोल वैचारीक पृष्ठभूमीची जाणीव होते. 

किशोरीताई स्वतः म्हणायच्या की मी प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी कमीत कमी २-३ महीने गाणार असलेल्या रागांचा अभ्यास करायला सुरुवात करायची, या अभ्यासाने रागाची ओळख होते आणि प्रत्येक वेळेला गातांना एक नवीन भाव उमटून येतो. असं करतांना हा प्रत्यय सारखा येऊ लागतो की राग ही कधीही न संपणारी अशी वस्तु आहे. ४० वर्ष यमन गायल्या नंतर यमनचे काही कोपरे आणि रेषांना स्पर्श झालेलाच नसतो. त्यामुळे संगीत म्हणजे एक अखंड साधना आहे. गायकाचं मोठेपण तो किती राग गाऊ शकतो किंवा किती ताना घेऊ शकतो यावर नसून तो रागाला, रागातून व्यक्त होणाऱ्या भावनेला किती आत्मसात करतो आणि त्यातून प्रत्येक वेळेला नवीन विश्व उभं करण्याची वाटचाल करतो त्यावर त्या गायकाचा दर्जा ठरत असतो. किशोरी ताईंनी गाण्याचा व गायकीचा अत्यंत सखोल अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी आपली स्वत:ची सिद्ध गायकी निर्मित केली. त्यात बऱ्याचदा असंही दिसून येतं की रागाचे ठराविक रस्ते न वापरता अत्यंत योजक अशा नवीन रस्त्यांचा अविष्कार त्यांनी केला. पण तो कल्पनाविलास इतक्या उच्च कोटीचा होता की अनेक गायकांना तसा विचार बहुतेक करता सुद्धा येणार नाही. 

संगीत कला ही जरी घराण्याच्या साच्यात असली तरी त्यात योजकता, कल्पकता आणि भावनिर्मितीला महत्व आहे, म्हणूनच अनेक राग प्रत्येक घराण्यात गायले जातात ते वेगवेगळ्या कलावंतांकडून ऐकले की वेगळे वाटतात. हे वेगळेपण त्या त्या कलावंतांचं वैशिष्ठ्य ठरतं. संगीतासाठी लागणारी कल्पकता ही मौलिक असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उपजत अंग असल्याशिवाय एखादा कलावंत रागाची मांडणी प्रभावीपणे करु शकत नाही. जयपूर गायकीतील अनेक अनवट राग कलावंतांची परिक्षाच जणू घेतात. त्याच्या कल्पनाविलासाची आणि बुद्धिचीही परिक्षाच असते. लयीचे अनेक गठबंध या गायकीत दिसून येतात. 

म्हणून या घराण्याची संपूर्ण गायकी अत्यंत पेचदार वाटते आणि ही गायकी गात असताना गायकाचा कस लागतो आणि ही गायकी समर्थपणे पेलणं कोणत्याही गायकासाठी आव्हानात्मक असतं. 

किशोरी ताईंनी केलेल्या अनेक वर्षांच्या रियाजातून व विचारातून रागाचा चेहरा अत्यंत स्पष्टपणे दिसू लागतो आणि ऐकणारा त्या भावविश्वात गुंग होऊन बसतो. संगीत ही कला अत्यंत कठीण आहे आणि त्या कलेत प्रत्येक कलावंत स्वतःला पूर्णपणे वाहून घेत असतो. संगीत शिकणाऱ्या आमच्यासारख्या अनेक विद्यार्थांना किशोरी ताईंचं गाणं हे नेहेमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे, आणि आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की किशोरी ताईंसारख्या दिग्गज कलावंतांचं गाणं ऐकण्याचे आणि त्यातून शिकण्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळाले त्याबद्दल परमेश्वराचे  जेवढे आभार मानावे तेवढे कमीच.

आज किशोरी ताई आपल्यात हयात नाहीत पण त्यांचं गायन आणि त्यांची आठवण नेहमीच आपल्या स्मृतीत राहील… 

सहेला रे मिल गाये, सप्त सुरन के भेद सुनाये 
जनम जनम का संग न भुले, अब के मिले तो बिछुडा न जाये


- रविंद्र परचुरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा