महात्मा

तसा, गांधीजींच्या मी खास ओळखीचा
पीर परायी ओळखणाऱ्याच्या, मी अगदी जवळचा ...

दोस्त जिवलग असे त्यांचा, सहकारी मी
सहपांथस्थ प्रवासी जरी, तितकाच 'सरकारी' मी ...

पहिला त्यांच्यासवे मी, 'सुराज्या'वर चालणारा सुरा
अन व्यवस्थेचा ढिसाळ, गुंतलेला कमजोर दोरा ...

सत्याग्रहाला ग्रहण लागले, अहिंसेचे हात रंगले
स्वदेशीला बाटलीत ओतले, नैतिकतेचे स्वप्न भंगले ...

स्वातंत्र्याच्या नावे देखिले, स्वैराचाराचे नाचते सोंग
शिस्तीचे थडगे बांधून, बेशिस्तपणा करते ढोंग ...

सहवासात त्यांच्या मात्र, प्रश्न येतसे एक मनी
अंत केला नथुरामनेच की, अनुयायांनी ? ...

काय, ओळखलंत का मला ?

अहो, मीच तो 'महात्मा'पण जपणारा खुळा,
गांधीजींना भिंतीवर सांभाळणारा, लहानसा 'खिळा' !

- स्वप्नील सुधीर लाखे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा