संपादकीय

नमस्कार, मंडळी! २०१५ चा "ऋतुगंध वर्षा" आपल्या हाती देताना आम्हांला खूप आनंद होतो आहे. तुम्हांला आठवत असेलच की २०१५ ऋतुगंधचे अंक हे संस्कृत सुभाषितांवर आधारित असणार आहेत. ह्या अंकासाठी आपली केंद्रकल्पना आहे हे सुपरिचित सुभाषित –

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्

"वसुधैव कुटुम्बकम्" हा व्यापक विचार आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. समस्त पृथ्वीला आपलं कुटुंब मानायचं म्हणजे नेमकं काय? त्यातलं नेमकं आपल्या आवाक्यात काय आहे आणि आपण त्यातलं किती करतो हा विचार आवश्यक आहे, नेहेमीच होता. सद्य युगात ह्याची जास्त गरज आहे आणि याचं कारण जग जवळ आलंय. एक अर्थव्यवस्था कोलमडली की तिचे परिणाम दूरवर जाणवतात. बहुतेक ठिकाणी आता विविध देश, धर्म, वंश, भाषांचे लोक एकत्र नांदताना दिसतात. त्यांना एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं, समजावून घ्यावं लागतं, मदत करावी लागते. आपला-परका याच्या पारंपरिक व्याख्या या नव्या जगात निकामी आहेत. विविध धर्म, प्रांत, भाषा, वंश यांची सरमिसळ असलेल्या आर्यावर्ताकडे या क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची संधी आहे. भारतातलं सध्याचं चित्र फारसं आशादायक नसलं तरी आपल्या पहिल्या अंकाच्या केंद्रकल्पनेनुसार आशा ठेवणं काहीच गैर नाही.

म्हणून या अंकात "वसुधैव कुटुम्बकम्" चा मागोवा घेणारं साहित्य आम्ही तुमच्या भेटीला आणतो आहोत. काही वैचारिक लेख आहेत - या संकल्पनेच्या विकासाचा शोध घेणारे किंवा सिंगापुरात विश्वकुटुंब कसं वसलंय हे सांगणारे, काही आशेचा किरण दाखवणारे आणि काही कोरडे ओढणारे. कथा आहे, कविता आहेत, पुस्तक परीक्षण आहे. आपल्या प्राचीन संकृतीच्या जगव्याप्तीचा शोधही आपण चालू ठेवतो आहोत.

ह्या अंकाचं विशेष म्हणजे जगभर प्रवास करून आपल्या गायनानं रसिकांना मोहिनी घालणाऱ्या पं. संजीव अभ्यंकरांची मुलाखत! त्यांच्या अनुभवातून या संकल्पनेचा एक वेगळा चष्मा आपल्याला पाहायला मिळेल.

वर्षा अंक आहे - त्यामुळे कांदाभजी आणि गरमागरम चहा घेत अंक जरूर वाचा आणि प्रतिक्रियाही नक्की कळवा. म्हणजे आम्हांला पुढचे अंक आणखी नेटके करता येतील.


आपली,
ऋतुगंध २०१५ समिती


ऋतुगंध २०१५ समिती 

नीतीन मोरे - संपादक 
जुई चितळे - सहसंपादक 
राजश्री लेले - जनसंपर्क 
अस्मिता तडवळकर - ऋतुगंध, ममंसिं संयोजक 
प्राची वर्तक - मुखपृष्ठ, मांडणी व सजावट 
वेदश्री जठार - मांडणी व सजावट 
यशोवर्धन जोशी - साहित्य संयोजक 

*** लेखांत व्यक्त झालेली मते ही पूर्णपणे संबंधित लेखकांची आहेत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तसेच संपादक समिती त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही.

४ टिप्पण्या:

  1. सिंगापूरच्या पन्नासाव्या वाढदिवशी, हा पहिला ऋतुगंध कट्टा वाचताना मन आनंदाने भरून आले. सिंगापूर प्रमाणेच हा कट्टा पन्नास वर्षे ताजा तवाना आणि सतत काळाच्या एक पाउल पुढे टाकणारा राहो!
    हे कल्पना जरी नवी नसली, तरी, ती आपल्या नेतृत्वाने ती फळास नेणारे नितीन, आणि अथक श्रमांनी प्रत्यक्षात आणणारे यशोवर्धन आणि फुलांच्या पाकळ्या, कलाबुते, रेशीम, इत्यादी सजावट जोडून सुंदर बनविणारी चमू ह्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
    ऋतुगंधचे यश असेच वर्धित होवो!

    उत्तर द्याहटवा
  2. डाव्या बाजूला जी अनुक्रमणिका दिसतेय, त्यातच लेखकाचे नांव सहज देता येईल. कसे?

    उत्तर द्याहटवा
  3. अंकात आलेल्या लेखांवर कोणी प्रतिक्रिया दिली, तर किमान त्यां लेखकाला आपोआप कळेल अशी व्यवस्था झाली तर उत्तम!

    तसेच आलेल्या प्रतिक्रियांची एकूण संख्या अनुक्रमणिकेत लेखकाच्या नावासमोर दिली तर उपयुक्तता वाढेल.

    उत्तर द्याहटवा