आई

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: र्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥१॥

आई माझी पहिली गुरु, माझी जन्मदात्री. तिच्यामुळेच आज माझे अस्तित्व आहे. तिचे नाव ‘शांता’. नावाप्रमाणेच ती शांत स्वभावाची. त्यामानाने वडिलांचा स्वभाव तापट, कडक, शिस्तप्रिय होता. आम्ही बहिणी बाबांच्या लाडक्या तर भाऊ आईचे लाडके होते. तसे बघायला गेले तर आई आणि बाबा मुलांचे सर्वस्व असतात. लहानपणी आपल्यासाठी आपले आई-वडील किती कष्ट करतात याची जाणीव आपल्याला नसते. जेव्हा आपण स्वतः पालक होतो तेव्हा आईवडिलांची किंमत कळते. 

माझ्या आईचे वय नक्की सांगता येत नाही पण ती ७५ च्या आसपास असावी असा अंदाज आहे. त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती. शिक्षणाला महत्त्व नव्हते. आई जेमतेम दुसरीपर्यंत शिकली. तिला वाचता चांगले येते, पण लिहिता थोडेफार. लहान वयात आईचे लग्न झाले, त्यामुळे लग्नानंतर घरकाम व स्वयंपाक बाबांनीच करायला शिकवले. तेव्हापासून आई समर्थपणे संसाराचा गाडा ओढते आहे. आई स्वभावाने खूप भित्री होती त्यामुळे आम्ही कधीच तिला कोणाशी भांडताना पाहिले नाही. तिच्या गरीब स्वभावचा काही लोक गैरफायदा घेत असत. चूक असो किंवा नसो ऐकून घेते म्हणून सासरची मंडळी काहीही बोलायची, त्रास द्यायची. पण आईने कधीही त्यांना उलट उत्तर दिले नाही. सर्व काही निमूटपणे सहन करायची. मला समजायला लागल्यावर या गोष्टीचा खूप राग यायचा. मी आईवर खूप चिडायची. तू का नाही बोलत? का अन्याय सहन करते? कधीतरी यांना सडेतोड उत्तर दे. पण नाही. आई म्हणायची आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी हे सगळं सहन केलं पाहिजे. वडिलांची आईवर खूप माया होती. घरात मोठे असल्यामुळे लहान भावंडांची जबाबदारी वडिलांवर होती . घरात जेमतेम पैसा असल्यामुळे आईला खूप काटकसर करावी लागे पण तिने कधीही तक्रार नाही केली. वडिलांना निष्ठेने साथ दिली. आम्हा मुलांवर अनमोल संस्कार केले. आईने दिलेली संस्कार शिदोरी मी जतन केल्यामुळेच मला माझ्या मुलांवर चांगले संस्कार करता आले. आई शिक्षणात अडाणी असली तरी व्यवहारात मात्र हुशार होती. सर्वांशी मिळून मिसळून वागत असे, कोणाचे अडले नडले असेल तर त्यांना मदत करत असे. आमच्या घरी पाहुण्यांची नेहमी ये-जा सुरू असे. अचानक चार पाहुणे आले तरी आई त्यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नसे. आम्ही नेहमी म्हणत, कशाला एवढी दमते गं? चहा पाणी करून पाठवायचे पाहुणे. पण नाही. 'अतिथी देवो भव' असे ती म्हणायची. कधी कोणाच्या रूपाने परमेश्वर आपल्या घरी येईल सांगता येत नाही. 

माझे वडील कामावरून रात्री उशिरा घरी येत असत.आम्ही लवकर जेवण करून झोपत असू. बाबा घरी आले की आम्हाला झोपेतून उठवून जेवणासाठी आग्रह करत असत. आई सांगायची मुली जेवण करूनच झोपल्या आहेत. पण बाबांसोबत चार घास खाल्याशिवाय त्यांचे समाधान व्हायचे नाही. मग भूक नसतानाही आम्ही त्यांच्या समाधानासाठी थोडे खाऊन घ्यायचो. आई चेष्टेने म्हणायची, " मी काही त्यांची सावत्र आई नाही, त्यांना उपाशी ठेवायला ". वडील होते तोपर्यंत त्यांनी आमचे खूप लाड केले. खूप चैन नसली तरी कुठल्या गोष्टीची कमतरता होऊ दिली नाही. आमचे बालपण आनंदात व सुखात गेले. मोठी बहिणी सासरी गेली तेंव्हा पहिल्यांदा बाबांना खूप रडताना पाहिले आणि माझे मन कासावीस झाले. मुलींना सासरी पाठवताना आवडिलांच्या मनाला किती वेदना होतात ते स्वतः आई झाल्याशिवाय समजत नाही. त्यावेळी आईने बाबांना धीर दिला. वेळप्रसंगी आई कणखर बनायची. बाबा आईला म्हणायचे, "या चिमण्यांना असेच पंख फुटतील आणि एक एक करून सर्वजणी आपल्याला सोडून निघून जातील." 

आई घरातील 'मांगल्य' होती तर बाबा 'कर्तव्यनिष्ठ' पालक. दुःखाच्या वेळी आई रडून आपले दुःख व्यक्त करायची. अशावेळी बाबा मात्र त्या बिकट प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचे. आमच्यासाठी आईवडिल हेच आमचे 'दैवत' होते. म्हणूनच त्यांच्याबद्दल अपार माया, सद्भावना आणि आपुलकी आजही माझ्या मनात आहे. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळणे ह्यासारखे 'सुख' जगाच्या पाठीवर दुसरे नाही. तसा मला वडिलांचा सहवास फार कमी मिळाला. अर्ध्यावरती डाव मोडून बाबा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मात्र आई आमची जास्त काळजी घेऊ लागली. वडिलांची उणीव भासू नये म्हणून स्वतःला डोंगराएवढे दुःख झाले असतानाही आम्हा मुलांवर मायेची फुंकर घालत राहिली. भाऊ कमवता होता हाच काय तो तिला आधार होता. बाकी सर्व भावंडं लहान होती. आईने खूप कष्ट करून आमच्या आयुष्याला वळण लावले. आईबद्दल सांगताना माझे शब्द अपुरे पडत आहेत. 

आई म्हणजे काय? आ- म्हणजे आत्मा, ई - म्हणजे ईश्वर! हे दोन शब्द म्हणजे माझी आई. परमेश्वर जसा आपल्याकडून अनेक चुका झाल्या, तरी आपण त्याला शरण गेलो की आपल्याला माफ करतो, तसेच आईही मुलांचे अनेक अपराध झाले तरी त्यांना क्षमा करते. म्हणूनच आईला परमेश्वराच्या ठिकाणी मानले जाते. लहानपणी आई रागावली की खूप राग येत असे. आई भावांचे जास्त लाड करते आणि आम्हाला सारखी रागावते असे वाटायचे, पण आई मनाने खूप हळवी होती. आपल्या मुलांनी सुसंकृत व्हावे यासाठी ती नेहमी झटत असे. आमच्या भल्यासाठी ती रागावत असे, पण आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला आईचा राग यायचा. अशावेळी राग काढायला हक्काचा माणूस आईशिवाय कोण असणार हे मला स्वतः आई झाल्यावर कळतंय. आपण किती वेळा दुखावलं असणार तिला. पण तिने मात्र वेळोवेळी समजून घेतले आणि 'सक्षम व मार्गदर्शक आई' म्हणून सदैव आमच्या पाठीशी उभी राहिली.

माझ्या आईचे जीवन सर्वांची सेवा करण्यातच गेले. आतासारखी त्यावेळी मुलींच्या हातात सत्ता नव्हती म्हणून सासरी आल्यावरही मला तिच्यासाठी फारसं काही करता आलं नाही. एकदा मी माहेरी गेले होते त्यावेळी शेजारच्या काकूंना पणतू झाला होता. त्यांच्याकडे नातवाला मूल झाले की पणजीच्या (म्हणजे वडिलांची आजी) मांडीवर बाळाला घेऊन सोन्या चांदीचे फुल करून त्यांच्या अंगावर उधळतात. या कार्यक्रमासाठी आम्ही तिथे गेलो होतो. कार्यक्रम खूप छान झाला. माझ्या आईला या गोष्टीचे खूप कौतुक वाटले. आमच्याकडे असं कोणी कौतुक करत नाही असं ती सहज बोलून गेली. काकू म्हणाली प्रतिभा तुला नातू झाला की तू आईसाठी असा कार्यक्रम कर. मी ती गोष्ट लक्षात ठेवली. पुढे पाच वर्षांनी मला नातू झाला. त्यावेळी खास आईच्या इच्छेखातर मी हा कार्यक्रम माझ्या घरी केला. आईला खूप आनंद झाला. आपल्या मनातील इच्छा आपल्या मुलीने पूर्ण केली याचे तिला खूप समाधान वाटले. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही मला समाधान देत आहे.

आपण आपल्या आईसाठी काय केले, यापेक्षा आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केले, याचे मोल कधीच होऊ शकत नाही. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमधली अत्यंत सुंदर निर्मिती म्हणजे 'आई ', मग ती कुणाचीही असो. तिचा आदर करा तिला सन्मानाने वागवा. शेवटी माझ्या आईला नमस्कार करते आणि परमेश्वराजवळ तिला उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करून मी आपला निरोप घेते.

- सौ. प्रतिभा विभुते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा