संपादकीय : बालक-पालक

“तू माझ्या बर्थडे पार्टीला यायचं नाहीस!” “तुला पण मी बोलावणार नाही” 

माझा ५ वर्षांचा मुलगा कुठल्याशा कारणावरून त्याच्या ‘बेस्ट फ्रेंड’शी भांडला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे परत एकत्र, जणू काही झालच नाही! किती सोपं, सरळ आणि छान आहे असं वागणं.

मित्राच्या नवीन सायकलवर “एक राउंड” मागणं, कुणाचा नवीन बाॅल झाडीत गेल्यावर सगळ्यांनी खो-खो हसणं, पण पुढच्या क्षणात सगळ्यांनी मिळून बाॅल शोधायला लागणं. कोणाची वाॅटर बाॅटल तुटल्यावर आपली देऊ करणं, बर्थडे पार्टीला, “मला आणखी केक हवा आहे”, आणि त्यानंतर, “माझं रिटर्न गिफ्ट कुठाय”, असं बिन्धास्त विचारणं. मस्सत मोकळा आनंद…. पण वयाबरोबर मात्र अहम पण वाढतो आणि हा आनंद हरवतो.

पालक, शिक्षक म्हणून आपले प्रयत्न प्रामाणिकपणे पार पाडतात, बहुतेक वेळा. मग, मुलांना घडवताना, नकळत, आपण स्वत:ला एक ‘दुसरा डाव’, ‘सेकंड चान्स’ देत असतो. केलेल्या चुका ह्या वेळेला - म्हणजे आपल्या मुलांकडून - होऊ नये, चुकलेल्या संधी ‘ह्या वेळी’ मिळवी... सगळ्यांनाच आपली मुलं खेळात पुढे, संगीत/नृत्यात पारंगत, तांत्रिक दृष्ट्या माहितगार पण टीव्ही-टॅब आपण सांगू तेवढाच वापरणारी, सूज्ञ, शिस्तशीर, चिटिंग न करणारी, बर्थडे पार्टी किंवा स्लीप ओव्हरला गेली तर अगदी समंजसपणे वागणारी... हुश्श! श्वास लागला... इतके सर्वगुणसंपन्न रोबोट्सतरी बनतील का कधी?!

ह्याचबरोबर आपण दुसरं टोकंही गाठतो - मुलांसाठी सर्व गोष्टींची सोय करण्याचं, त्यांचे अनाठायी लाड करण्याचं: “हा फक्त अमुकच खातो, तिला हे अजिबात खपत नाही”, असली कौतुकं सर्वांसमोर केली की मुलांना नेमकं तसंच वागण्याचा परवानाच मिळतो. असुरक्षितता कमी करणं चांगल पण मुलांना जर भविष्याची अजिबात चिंता राहिली नाही तर माणूस म्हणून त्यांचा विकास होणार नाही.

प्रश्न व समस्या असंख्य आहेत. पण सगळीच उत्तर शोधण्याचा हट्ट नको. थोडे प्रश्न त्यांचे त्यांनाच सोडवू द्या. मुलांना स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम बनवूया, आयतोबा नाही. अभ्यास, खेळ, नृत्य, कला सगळ्यांचा अनुभव देऊ... ओझं नको. त्यांचं हे बालपण परत येणार नाही. त्याचा त्यांना भरपूर आनंद घेऊ द्या. 

पालक, आजी-आजोबा, शिक्षक म्हणून मुलांना वळण लावता लावता आपणच त्यांच्याकडून शिकत राहुया. साध्या सोप्या क्षणात आनंद शोधू. अहम थोडा बाजूला ठेऊन मन हलकं करूया. चला नव्याने लहान होऊया... त्यांच्यासोबत नव्या जगाशी नव्याने परिचय करुन घेऊया…

- सस्नेह ऋतुगंध समिती २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा