ऋणानुबंधाच्या गाठी

माणसाच्या आयुष्यात रक्ताच्या नात्यांबरोबरच ऋणानुबंधानेही अनेक नाती जोडली जातात. आपल्या पूर्वजन्मीच्या संचितानुसार हे ऋणानुबंध जुळत असतात, असे म्हटले जाते. आपल्या सानिध्यात आलेल्या अशा अनेक व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, गुण, कर्तृत्व, म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, आपल्या मनावर खोलवर बिंबत जाते. त्या व्यक्तिमत्त्वाची आपल्या मनावर खोलवर छाप पडते आणि हळूहळू त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनातील आदरभावना दुणावत जाते.

आपल्यापैकी कित्येकांना हा अनुभव नक्की आला असेल. माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती म्हणजे माझे सासरे, डॉ. चंद्रकांत पाटील. त्यांच्याबद्दल काही लिहिण्याचा माझा हा प्रयत्न!

प्रेम आणि विश्वासाने आजी-आजोबांनी उभारला कल्पवृक्ष,
त्या कल्पवृक्षावर बहरलेल्या रत्नातील तुम्ही एक रत्न

शीतल, संयमी स्वभाव तुमचा, नावाला सार्थ,
समाधानी वृत्ती अन् अगणित परमार्थ, 
कर्तव्य परायणता, कर्तबगारी, प्रगल्भ बुद्धिमत्ता,
दुर्मिळ व्यक्तिमत्त्व, जिथे कुठल्याच गुणाची नाही कमतरता

पैशांच्या मोहात गुरफटलेल्या डॉक्टरांचं म्हणे जाळं असतं,
पेशंटच्या आर्थिक परिस्थितीनुसार फी आकारणारे तुम्हीच फक्त, 
स्वतःच्या सुखासाठी धडपडणाऱ्या, सर्वसामान्यांच्या जगात,
परहिताने सुखी होणारे, असे असामान्य क्वचितच आढळतात

नवरा-बायकोच्या जोड्या, म्हणे, देव स्वर्गात ठरवतात,
भूतलावर त्या साकारायला मात्र, कोणी देवस्वरूप लागतात,
तुम्ही जुळवलेल्या जोड्यांमधली, आमचीही एक जोडी,
तुमच्या उपकारांची, दाद द्यावी तेवढी थोडी

मन मोठं किती असावं, याचं तुम्ही प्रमाण झालात,
दिल्या वचनाला जागायला, जणू भूमीवर अवतरलात,
परिवार, संबंधितांचे उपकारकर्ते झालात,
कोणताही त्याग, सहज, हसत-हसत स्वीकारलात

म्हणे जगात परमेश्वर म्हणून एक शक्ती असते,
आपल्या पाप-पुण्याचा ती हिशोब ठेवत असते,
सदैव रिक्त असेल तिथे तुमच्या पापाचा घडा,
अन् पुण्य ओसंडून वहात असेल, त्याचा नाही तुटवडा

भल्या माणसाची कसोटी पहायची, भगवंताला म्हणे हौस असते,
त्यामुळेच तर अशा देवमाणसांची ओळख जगाला होत असते,
नास्तिक नाही मी, पण देवापेक्षा तुमच्यावर आमची जास्त श्रद्धा,
तुमचे देवपण अनुभवले अबाधित, प्रसंगी देवाकडे नव्हते माणूसपण सुद्धा

तुमच्या सुखी दीर्घायुष्याची, करतो आम्ही प्रार्थना,
तुमचे शुभाशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, हीच आमची कामना,
अजून एक प्रार्थना, आम्ही आमच्या मुलींसाठी करीत आहोत,
आमच्या मुली होण्यात काहीच विशेष नाही, त्या तुमच्या नाती म्हणून ओळखल्या जावोत!

                                - सोनाली पाटील





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा