उणीवेतून जाणिवेकडे

दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या काळात इंग्रजी शिक्षणाला मिळालेल्या प्राधान्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावत गेला. संस्कारातही अमुलाग्र बदल होत गेले. चालीरिती बदलून जुन्याबरोबर नवे विचार स्वतंत्रपणे वावरू लागले. प्रगतीच्या वाटा रुंदावल्या. ह्या सर्वांमध्ये आपली मुळं, आपले विचार, साहित्य, परंपरा, जीवनशैली सर्व मागे पडत गेले. समाजानी उत्साहाने नव्याचे स्वागत केले. 

पण म्हणतात ना ‘नव्याचे नऊ दिवस’. अजून काही नवीन उदयास आलं की त्याचा स्वीकार सहज केला जातो आणि नवं आधीचं जुनं होतं. आपणही हसत हसत त्यात रुळत जातो. आपल्याला जाणीवही होत नाही की काहीतरी सुटतयं. ही प्रक्रिया अव्याहतपणे वर्षानुवर्ष सुरुच असते.

आज नवीन पिढी पूर्णपणे पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळली आहे. त्यांचं राहाणं, खाणं, संगीत आणि इतर आवडी-निवडी. सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांमुळे प्रत्येकाला स्वातंत्र्याचं महत्त्व पटतंय. ह्या वातावरणात प्रत्येकाला प्रत्येकाची वेगळी स्पेस दिली पाहिजे ह्याची जाणीव पण असते. 

जुन्या चालीरिती, विचारांना आज जागा नाही ह्याला कारण काय? नीट विचार केला तर जाणीव होते दोष ह्या पिढीचा का आधीच्या पिढीचा? वर्षानुवर्ष चालत आलेले संस्कार हळूहळू मागे का पडत गेले? सोयिस्करपणे त्याला वेगळं वळण कसं मिळालं? कधी सामाजिक बंधनांमुळे तर कधी स्वतःच्या सोयीसाठी तडजोड करत गेलो आणि ती करताना आपल्या चुकांची जाणीवही झाली नाही. पण ही परिस्थिती सर्वत्रच आहे असे म्हणता येणार नाही. आजही अपवाद सापडतात.

सतत पुढच्या पिढीला आधीच्या पिढीने दोष दिला आहे. पण त्याचं मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न करुन खरेखुरे प्रयत्न कोणी केलेत? जर ते केले गेले असते तर फूल ना फुलाची पाकळी यश हाती लागलं असतं. 

विचारांचे, संस्कारांचे आदान प्रदान करण्याची प्रक्रियाच निकामी ठरली. मोठ्या व्यक्तींच्या धाकात ठेवण्याची/राहाण्याची प्रथा. खूप चांगली प्रथा पण ती प्रथा पाळताना समाजाच्या बदलत्या रुपाकडे कुणीच लक्ष दिलं नाही. स्त्रीयांवर अनेक बंधने होती, त्या बंधनांचा सहज स्वीकार न झाल्यामुळे कोंडमारा झाला आणि जशा वाटा मिळत गेल्या तशा ढाच्यात त्या ढळत गेल्या. ह्याला जबाबदार कोण? आज स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे, त्याला थांबवावसं वाटतं पण मार्ग सापडणं कठीण होऊन बसलंय. खरोखरचं जे मार्ग आहेत त्यांची अंमलबजावणी करणं सध्याच्या सामाजिक परिस्थितीत शक्य नाही. 

प्रत्येक पक्षाच्या शरीर रचनेप्रमाणे त्याची आकाशातील भरारीची क्षमता ठरते. हे सूत्र मनुष्याला लागू नाही का? जुन्या रुढी परंपरा नकोत, हे मान्य आहे पण मग नव्याचा जो स्वीकार केला जातो त्याचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करायचे? प्रत्येक व्यक्ती पूर्ण प्रयत्न करते की आपल्याकडून योग्य तेच पुढच्या पिढीकडे पोहोचले पाहिजे, जेणेकरुन नव्याबरोबर जुने अलगद स्वीकारले जाईल. 

स्वातंत्र्याची उंच भरारी मारताना त्याची डोर ज्या चक्रीला गुंडाळली असते त्यांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे आणि हे ज्या क्षणास जाणवेल त्या क्षणापासून आपल्या सर्व गोष्टींचे जतन का व कसे केले पाहिजे ह्याची जाणीव झाल्यावाचून राहाणार नाही.

- नंदिनी नागपूरकर





1 टिप्पणी: