चॉइस आपला आपला

डोंबलाचं स्वातंत्र्य…..
खरं सांगू स्वातंत्र्य वगैरे काही नसतं 
मृगजळ नुसतं….
म्हणतात जंगलातले मृग 
असतात स्वतंत्र, 
चारापाणी निर्मल... 
असत त्यांचं जग कोमल, 
मला अजिबात नाही पटत... 
स्वतंत्र आहेत ते असं नाही वाटत, 
खुट्ट वाजलं की दचकतात, 
वाघोबाच्या दहशतीत जगतात... 
मायावी मृगजळाच्या मागं, 
वर्षानुवर्ष पळत राहतात…. 

असलं कसलं स्वातंत्र्य? 
मनाचे खेळ नुसते…. 
पक्षी आकाशात, 
स्वच्छंदपणे विहरतात म्हणे…..
दाही दिशा बांधून नाही ठेवू शकत, 
त्यांच्या स्वतंत्र मनाला... 
खरं सांगू !
मला हे सगळं, 
वाटतं total बकवास…. 
घालतात आकाशाला गवसणी, 
शोधतात काय? तर कीडा आळ्या मुंगी…. 
Stopwatch घेऊन बसलेल्या, 
कोकलणाऱ्या पिल्लांसाठी... 

माणसाला तर हे चाखायला ही नाही मिळत... 
स्त्री तर स्वतंत्र नाहीचे, 
घाण्याला जुंपलेला पुरुष तरी कुठं स्वतंत्र आहे?
अपेक्षांची दप्तरं वाहणारी मुलं तर सोडाच, 
Retire झालेले आई बाप आहेतच ना सवयीचे गुलाम?
मग कसली आहे धडपड?
कसला लढा? 
कसली चळवळ? 

बऱ्याच विचारांती एकच कळलं, 
गोड बंधनाला, 
रेशमाच्या साखळदंडांना, 
कोणाचं पारतंत्र्य स्वीकारायचं 
याचा choice असतो ना…. 
त्याला लोक स्वातंत्र्य मानतात

- विवेक वैद्य


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा