फिटनेसचे रहस्य

१९९४ मध्ये भारताने मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या स्पर्धा जिंकल्या आणि तेव्हापासून भारतीयांची मानसिकता पूर्ण बदलली. बॉलीवूड सिनेमा, TV सिरीयल पासून ते घराघरातल्या महिलांना आपण "बारीक" दिसण्याची नितांत गरज भासू लागली. पूर्वीचे सिनेमे पाहिले तर त्यात हिरो अथवा हिरोईनच्या आईची भूमिका करणाऱ्या निरुपा रॉय, सुलोचना इत्यादी नट्या पोक्त/ पांढऱ्या केसांच्या,व्यवस्थित तब्येतीच्या दाखवल्या जायच्या.कॉटनच्या साड्या, काळ्या पांढऱ्या केसांचा सैलसर अंबाडा अशी त्यांची वेशभूषा असायची.अगदीच राणी माँ वगैरे असेल तर सिल्कची साडी आणि मोत्याची माळ आणि फॅशनेबल अंबाडा. केसांची एक बट मात्र हमखास पांढरी असायची. त्या वास्तविक वाटायच्या आणि त्यांच्या तश्या वेष किंवा केश भूषेत कोणाला काही गैर देखील वाटायचे नाही. उलट त्यात, हे केस अनुभवाने पांढरे झालेत किंवा तत्सम संवाद असायचे.

हल्लीचे सिनेमे किंवा TV सिरीयल बघितल्या तर त्यातल्या आया पाहून त्या आया आहेत का हिरो हिरोईनच्या छोट्या बहिणी अशी शंका येते. त्यांना बघून महिला वर्गाला देखील आपण आहोत त्या वयाचे न दिसण्याची मानसिक गरज भासू लागलेली आढळते. पूर्वी बायका वय सांगायच्या नाहीत. आता खरे वय सांगून आपण कसे त्या वयाचे दिसत नाही असे दाखवून देण्याची फॅशन आली आहे.

आता हे करणे काही सोपे नाही. मग त्यासाठी व्यायाम डायट करणे क्रमप्राप्त आहे. मग तसे करण्याला "फिटनेस" असे एक गोंडस नाव देण्यात आले. खरे तर फिटनेस म्हणजे निरोगी लवचिक शरीर कमावण्याचा उपाय अशी व्याख्या असायला हवी. पण ती फक्त "वेट लॉस" पुरती मर्यादित झाली आहे. जो तो आपले वजन घटवण्याच्या मागे लागलेला दिसतो.

आता तुम्ही म्हणाल त्यात गैर काय आहे? त्याचे उद्दिष्ट जोवर सुदृढ शरीर हे असले तर त्यात काही गैर नाही.पण झटपट बारीक होण्यासाठी अर्धवट माहिती वरून अचानकपणे कुठलेतरी फॅड डायट करणे किंवा अचानक खूप व्यायाम करणे (आणि लवकरच तो सोडून देणे) असे करण्याने शरीराला उपाय कमी आणि अपायच जास्त होत असतो.

पार्टी मध्ये तळलेले सामोसे, गुलाबजाम अश्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारत लोक जेव्हा एकमेकांना, "तुमचे बरे आहे, तुम्ही कितीही खाल्ले तरी तुमच्यावर ते दिसत नाही. आमचे वजन सामोस्याच्या नुसत्या वासाने पण वाढते”... किंवा तत्सम गप्पा मारताना दिसतात तेव्हा मला त्यांना ओरडून सांगावेसे वाटते की एक तर त्या चविष्ट सामोस्याचा आनंद घ्या किंवा इतके अपराधी वाटत असेल तर खाऊ नका पण मधला प्रकार करू नका.

आता मला सांगा की अश्या गप्पांमध्ये कुठेतरी फिटनेस म्हणजे निरोगी शरीर असा मतितार्थ दिसतो का? फक्त वजन घटवण्याबद्दल विचार करतात मंडळी.

एखाद्या लग्न समारंभात मिरवण्यासाठी किंवा एखाद्या जुन्या जीन्स मध्ये फिट होण्यासाठी व्यायाम करण्यापेक्षा फिट राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.

तर लोक हो माझी अशी कळकळीची विनंती आहे की सुदृढ निरोगी शरीर कमावण्यासाठी चांगले पोषक अन्न खा, हलका पण नियमित व्यायाम करा आणि निरोगी जीवनशैली आचरणात आणा. त्याचे उत्तम परिणाम शरीरावर नक्की दिसतील. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदी राहायला शिका. आनंदी राहणारी माणसे कायम फ्रेश आणि तरुण दिसतात. त्यांना तसे दिसण्यासाठी फार भारी कपडे, दागिने असे काही घालावे लागत नाहीत. त्यांचा सस्मित चेहरा सांगतो त्यांच्या फिटनेसचे रहस्य.

                                                                                                                        - विनया रायदुर्ग


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा