'ध्यान' आणि 'योग'चे काळचक्र

ह्या आठवड्यात सिंगापूरला झालेल्या ऑफिसच्या मीटिंगमध्ये एक सुखद आश्चर्य दडलेलं होतं. मीटिंग नेहमी प्रमाणेच होती असं म्हणता येईल, एशिया- पॅसिफिक च्या विभिन्न देशातून आलेल्या सहकर्मींची आपसात विचारपूस, भेटी-गाठी, यजमान देशाच्या मुख्य अधिकाऱ्या तर्फे सर्वांचे स्वागत, नेहमीच खूप व्यस्त असलेल्या अजेन्डाची सर्वांना माहिती आणि जाणीव वगैरे. सगळे आता व्यवसाय संबंधी विषयांवर चर्चा सुरु होणार म्हणून लक्ष द्यायला लागणार तेवठ्यातच आमचा फिलीपिन्सचा एक सहकर्मी उठला आणि व्यावसायिक जगात सर्वत्र अनुभवत असलेली, अमेरिकेने नाव दिलेली VUCA अवस्थेवर बोलण्यात भर टाकली. तो म्हणाला अस्थिरता(Volatility), अनिश्चितता (Uncertainty), जटिलता (Complexity) आणि असमंजसपणा (Ambiguity) ह्या बाबींवर माहिती खूप दिली गेली आहे पण आज मी ह्या अवस्थेवर मात देणाऱ्या ध्यान आणि योगा तंत्राबाबत सांगणार आहे.

मी कानावर पडलेले ध्यान आणि योगा हे शब्द खरेच आहेत ना ह्याची खात्री करत होतो. यूरोप मधील माझ्या मोठ्या कंपनीची मीटिंग ध्यान आणि योगा नी सुरु होणार ही बाब आश्चर्यजनक नक्कीच होती. सुखद आश्चर्याच्या ह्या घटकेत माझं मन मात्र जीवनाची चार दशकं मागे गेलं, त्यावेळी मी प्राथमिक शाळेत होतो, दर दिवसाची सुरुवात ध्यान आणि योग (तेंव्हा योगा शब्द उपयोगात नव्हता) द्वारेच व्हायची. आमच्या पिढीतील जवळपास सर्वच जणं ध्यान आणि योग शिकलेले होते, पण काही वर्षांनंतर आपल्याला आधुनिक आणि पुरोगामी सिद्ध करण्यासाठी त्याला मुद्दाम विसरलो. आणि काही वर्षांपूर्वी जेव्हा दुनियेतील विकसित देशांनी ध्यान आणि योग विषयी फायदे सांगायला सुरुवात केली तेंव्हा आमच्या पिढीत परत ध्यान आणि योग विषयी लोकप्रियता पुनर्जीवित झाली.

आपण आपल्या ह्या प्राचीन आणि आध्यात्मिक तंत्राला कितीही तिरस्कृत केले असले तरीही दुर्लक्ष आणि निष्क्रियता ह्या प्राचीन विज्ञानतंत्राची शक्ती हरपऊ शकला नाही हे विशेष आणि हेच तंत्रज्ञान आजच्या काळातील VUCA वातावरणावर मात करण्यास शक्तिशाली आणि प्रभावशाली ठरत आहे ही बाब खूपच आनंददायी वाटली.

भारताबाहेरच्या लोकांकडून ध्यान आणि योग विषयी फायदेकारक माहिती ऐकून एक विशिष्ट प्रकारच्या समाधानाची अनुभूती होत होती. प्राणायामावर पण चर्चा झाली, श्वासावर नियंत्रण ठेऊन कसे मानसिक ताण, लक्ष केंद्रित करण्याची जास्त क्षमता, संतुलित निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनांनवर चांगले नियंत्रण ह्या सारखे महत्वपूर्ण फायदे होतात असे ठामपणे तो फिलिपींन्स चा सहकर्मी सांगत होता.

मला ध्यान आणि योग विषयीचे कालचक्र पूर्ण फिरल्या सारखे आढळले, जे मी प्राथमिक शाळेत करत होतो ते मी कंपनीच्या मीटिंगच्या आधी करीत होतो. मी खूपच खूष होतो आणि मी पण पुढील सत्रात योग आणि प्राणायाम विषयी सर्वांना प्रशिक्षण देईन हे पण जाहीर केले.

हे सर्व अनुभवून मला असे वाटते की ज्या रित्या व्यवसायातील परिस्थती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे तो दिवसपण आता दूर वाटत नाही जेंव्हा पूर्वी प्रचलित असलेली दुपारच्या जेवणानंतरची "वामकुक्षी" ची परंपरा पण पुनर्जीवित होईल... पूर्ण दिवसाकरिता ऊर्जा मिळण्याच्या हेतून…...ॐ तत् सत् !!

-आशीष गोरे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा