पाककर्ता सुखी भव


फुरफुरली कुकरची शिट्टी
धगधगली तंदूरची भट्टी
तडतडली कढईत फोडणी
रटरटले रश्याचे पाणी

टरटरला भिवयीवर घाम
धगधगला चेहऱ्यावर जाळ
घळघळले डोळ्यातून पाणी
चट-चटके हातावर दोन्ही

घमघमला भाताचा दरवळ
खुसखुशीत रोटीही आरवळ
जळजळीत तो तवंग खासा
चमचमीत अन रुचकर रस्सा  

सरस स्वाद अन रंग नी वास
भरभर घासामागून घास
गुरगुर डुरडुर ढेकर तृप्त
सरसर होई सारे फस्त

कलकलती ती भूक शमली
रुणझुणती स्तुतिसुमने फुलली
राबराबल्या पाककर्त्यास
कडकडत्या टाळ्यांचा भास

काम धाम धंदा हिशेब फसो  
खिसा भरलेला असो नसो
पोट पोटभर भरलेलं हवं
म्हणून - पाककर्ता सुखी भव !


- जुई चितळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा