हिंदु सणांमधील आहार व त्यामागील शास्त्र!

सर्वांना २०१८ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

जानेवारी महिना सुरु झाला की सगळ्यांनाच संक्रांतीचे वेध लागतात. हळदीकुंकू, काळ्या साड्या, तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्यांची तयारी सुरु होते. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला”, असं म्हणत सगळ्यांमधली आपुलकी, प्रेम आणखी वाढावी हा त्या मागचा उद्देश. 

भारतातच नाही तर भारताबाहेरही आपण भारतीय सण आनंदाने, उत्साहाने साजरे करत असतो. प्रत्येक सणाच्या दिवशी होणारे खास खाद्यपदार्थ हे तर आपल्या सणांच खास वैशिष्ट्य. म्हणजे संक्रांतीत तिळगुळ, गुढीपाडव्याला कडुनिंब, चैत्रगौरीला वाटलेली डाळ - कैरीचं पन्हं, रामनवमीला सुंठवडा, नारळीपौर्णिमेला नारळी भात, कोजागिरीला मसाले दूध तर दिवाळीला चकली- शंकरपाळे. प्रत्येक सण आणि त्यातील आहार याचा आपल्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. 

आपलं आरोग्य टिकवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतुप्रमाणे आपल्या आहार विहारात बदल करणे अतिशय गरजेचं असतं. म्हणूनच ऋतुत होणाऱ्या हवामानाचा विचार करुन आपल्या शरीरातील वात- पित्त-कफ ह्या तिन्ही दोषांचे साम्य टिकावं ह्यादृष्टीने आपल्या सर्व सणांमधील आहाराचं महत्त्व आहे. तेव्हा आपल्या सणांमधील प्रथा पाळत असताना त्यामागचं आयुर्वेदिक शास्रही समजून घेऊया.

*मराठी नववर्ष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा. ह्या दिवशी कडुनिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे, तसेच कडुनिंबाच्या कोवळ्या पानांमधे हरभऱ्याची डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ इत्यादी मिसळून चटणी तयार केली जाते.

कडुनिंब- कडुनिंबाची पाने कडू असतात पण हे एक बहुउपयोगी औषध आहे. कडुनिंब पचायला हलका, कफ पित्ताचे शमन करणारा, अग्नि प्रदिप्त करणारा, तहान शमवणारा, खोकला- ताप-अरुचि ह्या सर्व विकारांवर व पोटातील जंत दूर करण्यास उपयुक्त. योग्य प्रमाणात सेवन केल्यास श्रमांमुळे आलेली अशक्तता भरुन काढून शरीराची शक्ति वाढवतो. रक्तातील toxins बाहेर काढून सर्वप्रकारचे रक्तदोष दूर करतो. कडुनिंबाची पाने तुपासह किंवा आवळ्या बरोबर समभाग घेतल्याने अंगावर पित्त उठणे, फोड येणे, खाज येणे इ. त्वचारोग नष्ट होतात.

म्हणूनच आपल्या परंपरेत फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच ह्याचे सेवन करायचे असे नसून ह्या दिवसापासून वर्षभर ह्या बहुउपयोगी कडुनिंबाची आठवण ठेवावी असे सूचित केले आहे. 

*गुढीपाडव्यानंतर येते रामनवमी. रामनवमीचा प्रसाद म्हणून सुंठवडा (सुंठ व साखर) दिला जातो. ह्या काळामध्ये कफव्याधी अधिक आढळून येतात. सुंठ तिखट आणि उष्ण आहे, साखरेमुळे सुंठीचा तिखटपणा कमी होतो. ह्या दोघांच्या मिश्रणाने कफाचे शमन होण्यास मदत होते. 

*तसेच चैत्रगौरीच्या हळदीकुंकवास कफघ्न असे चटपटीत हरभरे, वाटली डाळ आणि उष्णता कमी करण्यासाठी कैरीचे पन्हे दिले जाते.

*वर्षा ऋतु सुरु होण्याच्या आधी येणारा सण म्हणजे आषाढी एकादशी! या काळात भूक मंदावलेली असते म्हणून उपवास/लंघन करावे. राजगिरा, वरीचे तांदूळ असे पचायला हलके पदार्थ खावेत म्हणजे वातव्याधींचे शमन होण्यास मदत होते व पचनशक्ती सुधारते. 

*नंतर वर्षाऋतुमध्ये चातुर्मास पाळला जातो. पावसाळयात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. मांसाहार पचायला जड असतो. 

तसेच शाकाहारही ह्या काळात नीट पचत नाही म्हणून शरीर स्वास्थ्यासाठी श्रावण महिन्यात उपवास किंवा हलका आहार घ्यावा असे सुचविलेले आहे.

*त्यानंतर गणपती येतात. त्यावेळी पावसाचे प्रमाण अनियमित असते. कधी भरपूर ऊन तर कधी मुसळधार पाऊस त्यामुळे पित्त प्रकोपाचा काळ असतो म्हणून तुपाबरोबर खोबरं व गूळ घालून तयार केलेल्या उकडीच्या मोदकांना विशेष महत्त्व आहे.

*अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला आयुर्वेदामध्ये आरोग्यदायी पौर्णिमा असं म्हटलं जातं. शरद ऋतु म्हणजे October heat, शरीरातील पित्त वाढवणारा काळ. या काळात पित्त प्रकोप होऊन पोटदुखी, अपचन असे पोटाचे विकार होतात. 

कोजागिरीला चांदण्या रात्री वेलची, जायफळ, केशरमिश्रीत मसाला दूध घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे पित्तप्रकोप कमी होतो. मसाला दूध चंद्राच्या शीतल किरणांत ठेवावे त्यामुळे दुधाची पित्त शमविण्याची शक्ती वाढते. 

*त्यानंतर थंडी सुरु झाली की येते दिवाळी. या काळात निसर्गत: भूक चांगली असते, जाठराग्नी प्रदीप्त असतो. अशावेळी पौष्टिक आहार शरीराला मिळाला तर शरीराचे उत्तम पोषण होते. 

त्यामुळे दिवाळीचा फराळ हा तळलेला असतो. चिवडा, लाडू, चकली, करंजी, शंकरपाळे, अनरसे, चिरोटे, कडबोळी असे तेलकट, तूपकट, पचायला जड, स्निग्ध पदार्थ दिवाळीत खाण्यास हरकत नाही. 

*हेमंत ऋतुच्या शेवटी व शिशिर ऋतुच्या सुरुवातीला येते मकरसंक्रांत. थंड बोचरा वारा या ऋतुत जाणवत असल्याने थंडी कमी करणारे, उष्ण पदार्थ सेवन केले जातात. तसेच शरीराचे बल उत्तम असते त्यामुळे तिळगुळ, गुळाची पोळी साजूक तूपाबरोबर हे पदार्थ पथ्यकर असतात. 

तीळ- तीळ हे उष्ण व स्निग्ध असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करुन थंडीपासून संरक्षण करतात. तीळ हे वातकफनाशक, पचनशक्ति- रोगप्रतिकारशक्ति व स्मरणशक्ति वाढवणारे आहेत. यांतील कॅल्शियम हाडांसाठी चांगले तर आहेच तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. रोज तीळ चावून खल्ल्याने त्वचा, दात व केसांचे आरोग्य सुधारते. तिळाचे तेल गरम करुन मालीश केल्याने त्वचा स्निग्ध राहून हाडे, संधि व पेशींना बल प्राप्त होते. सांधेदुखीमधे याचा चांगला उपयोग होतो. तिळाच्या तेलाने oil pulling ही करावे.

गूळ- गूळ हा उष्ण असून कफदोषाचे शमन करतो, तसेच शरीरातील हिमोग्लोबीन लवकर वाढवतो, शरीरातील धातूंची झीज लवकर भरुन काढतो, रक्तशुध्दी करतो व पचनशक्ती सुधारतो. गूळ हा साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साजूक तूपाबरोबर गूळ खाल्ला असता उष्ण पडत नाही म्हणूनच गुळाची पोळी तूपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. 

*शिशिर ऋतुत येणारा सण म्हणजे होळी. ह्या काळात पचनशक्ती चांगली असते, त्यामुळे पचनास जड व शरीराचे बल वाढवणारी पुरणपोळी केली जाते. चणाडाळ व गूळ उष्ण, रुक्ष व कफनाशक असल्याने हितकर आहेत पण पुरणपोळी बरोबर साजूक तूप घ्यायला विसरु नका. 

अशाप्रकारे आपल्या सणांमधील आहारामागे बदलते ऋतुमान व आरोग्याचा खूप खोलवर विचार केलेला आहे. तेव्हा सण साजरे करताना त्या सणांमधील आहाराचाही नि:शंकपणे आनंद उपभोगावा.

सर्वांना हे नवीन वर्ष आरोग्यदायी जावो ही सदिच्छा ! 

- डाॅ. रुपाली गोंधळेकर
M.D. (A.M.) B.A.M.S.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा