स्वातंत्र्याच्या बदलत्या संकल्पना

मी आणि माझी आत्येबहीण निशु आल्याचा चहा घेत, तिच्या घरी मस्त गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात तिची १५-१६ वर्षांची मुलगी रिया हॉलमधे आली, आणि म्हणाली, “अय्या, मावशी तू कधी आलीस?” मी म्हटलं, “अग, झाला थोडा वेळ”. तिनी आमच्याशी जरा वेळ गप्पा मारल्या आणि म्हणाली, “आई, मी फ्रेण्ड्स बरोबर बाहेर जातेय”. तसं निशु तिला म्हणाली, “अगं काय हे तुझे कपडे? जरा नीट तयार होत जा ग. आणि केस पण विंचरले नाहीयेस नीट.” त्यावर रिया फणकारुन म्हणाली, “मम्मा, झालं का तुझं लेक्चर सुरु? तुझ्या कुठल्याही सजेशन्स नको आहेत हं मला.” माय-लेकीमधल्या ह्या संवादामुळे मलाही जरा संकोचल्यासारखं झालं. ते ओळखून निशु म्हणली, “अग, तू बस आरामात. हे आमचं रोजचंच आहे.” खरच, किती कठीण असतं ह्या वयातल्या मुला / मुलींशी संवाद साधणं. आपल्याला ते लहान वाटतात. आणि त्यांना वाटत असतं की, आपण आता मोठे झालोय. त्यांना खूप स्वातंत्र्य हवं असतं, विचारांचं, राहणीचं, आणि खाण्या-पिण्याचं सुद्धा. त्यांना सगळं आपल्या मनासारखं करायचं असतं. आपल्याला त्यांची काळजी असते आणि त्याचा त्यांना कधी कधी राग येतो. त्यांच्याशी जास्ती फ्रेंड्ली व्हावं तरी पंचाईत आणि अंतर ठेवून वागावं तरी प्रॉब्लेम. तारेवरची कसरतच आहे ही.

आमची पिढी तरुण असताना एक बरं होतं की घरातल्या मोठ्या मंडळींना प्रत्येक गोष्टीत आपल्यापेक्षा जास्त कळतं, असा विश्वास ठेवण्यापलीकडे आमच्याकडे पर्याय नव्हता. त्यांना जास्ती अनुभव आहे, त्यांनी जास्त दुनिया बघितली वगैरे वगैरे. कारण तेव्हा गूगल, यू ट्यूब, फेसबुक, व्हाॅट्सएॅप वगैरे मंडळी अवतरली नव्हती. पण आता अगदी उलट झालंय. टेक्नोलॉजीमुळे घरोघरी आई, बाबा किंवा आजी, आजोबा शाळकरी मुलांकडून नवीन गोष्टी शिकताना दिसतात. लहान मुलांचं डोकं तल्लख असतं, अर्थातच नवीन गोष्टी ते खूप लवकर आत्मसात करतात. सध्या मुलांना भरपूर एक्सपोजर आहे आणि टेक्नोलॉजीने सगळं ज्ञान त्यांच्या पुढ्यात मांडलय. मुलांना आपण मोठं होऊन काय करायचं हे सुद्धा खूप क्लिअर माहिती असतं. आणि खूपदा तो choice पण त्यांचा स्वतःचा असतो.

सोशल मिडियाने तर जगात एक क्रांतीच घडवून आणली आहे. जसं लोकांना घरात स्वातंत्र्य हवं तसं सोशल मिडियावरही हवं असतं. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर काय लिहायचं ह्याचं प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. लोकं ते खूप एन्जॉय पण करतात. अर्थातच, त्याच्यावर शेरे मारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य इतरांना असतं. अशा platforms वर कधी कधी चांगलं वाचायला मिळतं. पण खूपदा लोकांची अभद्र, अश्लील भाषा, व hatred वाचताना जग कुठे चाललंय असा विचार मनाला अस्वस्थ करतो.

हल्ली मुली लग्नानंतर नाव, आडनाव बदलत नाहीत. त्याची त्यांना गरज वाटत नाही. फक्त कोणाची तरी पत्नी ही ओळख त्यांना आवडत नाही, कारण त्या मुलांच्या बरोबरीने नोकरी करतात, कमावतात. त्यामुळे त्यांची स्वतःची identity असते. ही सुद्धा एक स्वातंत्र्याची नवीन संकल्पना आहे. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये रोज आपल्या आवडीचं जेवण बनणं शक्य नसे. मग आपल्या आवडीचा पदार्थ, भाजी बनण्याची वाट बघायला लागायची. आता घरी बनलेली आमटी, भाजी मुलांच्या आवडीची नसली, तर मुलं बाहेर जाऊन खातात किंवा बाहेरुन काहीतरी ऑर्डर करतात.

पूर्वी घरात एकच टीव्ही असल्यानी सगळे एकत्र बसून एकच कार्यक्रम बघायचे. आता सगळे आपापल्या टीव्ही, मोबईल, laptop वर आपल्या आपल्या आवडीचे काहीतरी बघत असतात. टेक्नोलाॅजी मुळे आपली प्रगती खूप झाली ह्यात वादच नाही. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एकमेकांशी जुळवून घेणं आता कोणालाही नको आहे. प्रत्येकाला आपल्या choice चं सगळं करायचं आहे. ह्या सगळ्यामुळे आपली समाजव्यवस्था पण बदलत चालली आहे. आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, मग विभक्त कुटुंब पद्धती झाली. आणि आता तर करियरमुळे नवरा, बायको वेगळ्या शहरांमध्ये किंवा वेगळ्या देशांमध्ये राहतात. घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय आणि लहान मुलांमध्ये एकटेपणा, असुरक्षिततेची भावना सुद्धा वाढते आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईटच असतो. जीवनात स्वातंत्र्य असणं ही खूप चांगली बाब आहे पण ते मिळवताना आपण काय गमावतोय ह्याचं भान मात्र ठेवायला हवं.

- मेघना असेरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा