बसंत बहार

इथे बसंत बहार या रागाची चर्चा नाही किंवा बसंत बहार या चित्रपटाचीही नाही. १९९० च्या दशकात HMV कंपनीने बसंत बहार या नावाने ३ कॅसेट्स काढल्या. त्यात महाराष्ट्रातील ३ वसंत नावाच्या संगीतकारांची उत्तमोत्तम गाणी समाविष्ट केली होती. ते संगीतकर होते वसंत प्रभू, वसंत पवार आणि वसंत देसाई.

वसंत प्रभू 

मुंबईत आयुष्य गेलेले वसंत प्रभू यांनी अनेक प्रतिभावान मराठी कवींच्या काव्याला स्वर दिले आणि कवितेचे गीतात रूपांतर केले. पण खरी प्रसिद्धी मिळाली ती पी. सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी ह्या त्रिकुटाला. ह्या तिघांनी १९५० च्या दशकात अनेक अजरामर गाणी दिली. काही उदाहरणे देतो:


कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला


आली हासत पहिली रात

प्रभूंनी फक्त पी. सावळाराम यांच्याच गीतांना चाली दिल्या असे नाही तर कुसुमाग्रज, भा. रा. तांबे, वा. रा. कांत अशा अनेक कवींच्या काव्याला स्वरसाज चढविला आहे. पण एका गीताचा उल्लेख येथे टाळणे अशक्य आहे. कवी बी यांचा चाफा नावाचा कविता संग्रह १९५० च्या दशकात गाजला. त्यातील ‘चाफा बोलेना’ ही कविता लतादीदींच्या वाचनात आली आणि त्यांना वाटले या कवितेला चाल लावून घेऊन आपण म्हणावी म्हणून त्यांनी संगीतकार श्रीनिवास खळे यांना कविता दिली आणि चाल लावण्याची विनंती केली. काव्य वाचल्यानंतर खळे म्हणाले, “याला चाल लावणे मला जमणार नाही”. तीच कविता यशवंत देव यांना दिली त्यांनीही नकार दिला. जेव्हा वसंत प्रभूंना कविता वाचायला दिली तेव्हा त्यांनी सांगितले कवितेच्या काही कडव्यांनाच चाल देता येईल. अशा तर्हेने एका अजरामर गीताचा जन्म झाला. शब्द होते:
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

वसंत प्रभू हे अतिशय प्रतिभावान होते आणि संगीता खेरीज ते नृत्य दिग्दर्शन पण करत असत. व्यसनामुळे त्यांच्या जीवनाचा अंत फारच लवकर झाला. अन्यतः आणखी काही वर्षे जगून त्यांनी आपल्या अभिजात संगीताने रसिकांचा आनंद द्विगुणित केला असता.

वसंत पवार - एक जगावेगळे व्यक्तिमत्त्व

यांनी कोल्हापूर या कलानगरीत आपले बहुतेक आयुष्य व्यतीत केले. हे उत्तम सतारवादक होते तसेच चित्रपटात स्टंटमॅन म्हणून पण काम करत असत. जेव्हा संगीतकार म्हणून बढती मिळाली तेव्हा त्यांनी बरीच गीते लोक संगीतावर आधारित अशी बांधली. काही उदाहरणे: 
अरे संसार संसार

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा

सोळावं वरीस धोक्याचे

खास करून सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या गदिमा आणि जगदीश खेबुडकर यांच्या लावण्या गाजल्या. अर्थात वसंत पवार फक्त लावण्या आणि लोकगीतं करीत असे नाही. चित्रपट कथेच्या मागणीवर संगीत देत असत. त्यांनी शास्त्रीय बाजाची आणि भक्तिगीते पण केली आहेत. काही उदाहरणे:

घन घन माल नभी (राग मिया मल्हार)

एकवार पंखावरुनी फिरो (भक्तीगीत)

पण एका गीताचा उल्लेख टाळणे अशक्य आहे. शांता शेळके यांच्या एक विराणीला त्यांनी स्वरसाज दिला आणि ती विराणी गायली आहे माणिक वर्मा यांनी. चाल ऐकल्यानंतर माणिकबाईंना एवढी आवडली त्यांनी वसंत पवार यांना १००रुपये (त्या काळात १०० ही भेट देण्यासारखी रक्कम होती) भेट दिले. 

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा

काही अभिजात कलाकारांना व्यसनाचा शाप असतो तोच शाप वसंत पवार यांनाही होता. व्यसनाने त्यांचाही शेवट बराच लवकर केला. महाराष्ट्र एका अभिजात संगीतकाराला मुकला.

वसंत देसाई

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे संगीतकार होते वसंत देसाई. प्रभात सारख्या संस्थेत त्यांनी उमेदवारी केली. तिथे पडेल ते काम केले आणि १९४० च्या दशकात संगीतकार म्हणून उदयास आले. व्ही शांताराम यांचे संगीतकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी दिली. काही उदाहरणे: 
घनश्याम सुंदरा

बलसागर भारत होवो

लटपट लटपट चालणं


चित्रपटाखेरीज त्यांनी काही नाटकांनाही संगीत दिले. यांची नाट्यगीते पण तेवढीच लोकप्रिय झाली 

शास्त्रीय संगीत असो किंवा लोकसंगीत असो, कथेनुसार वसंत देसाई योग्य संगीत देत असत. लोकांना नेमके काय आवडेल याचा त्यांना अंदाज होता म्हणून त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली. 

वसंत देसाई जेव्हा कार्यरत होते तेव्हा ते हिंदी चित्रपट सृष्टीच्या राजकारणात कधीच पडले नाहीत. सरळ स्वभावाचे वसंत देसाई इमानेइतबारे संगीत देत राहिले. निर्व्यसनी असलेले वसंत देसाई यांचा अंत मात्र इमारतीच्या लिफ्ट आणि दरवाजात सापडून अतिशय भयानक असा झाला. त्यांचे संगीत हे अजरामर आहे आणि कित्येक पिढ्या ऐकले जाईल.

संदर्भ
१. लता मंगेशकर - लेखक राजू भरतं 
२. वसंतलावण्य - लेखक मधू पोतदार

- शैलेश दामले



1 टिप्पणी: