विचारातून सुटका

माणसाला कशाकशाचे, कशाकशापासून स्वातंत्र्य हवे असते? परकीय सत्तेपासून देशाला स्वातंत्र्य हवे असते. शास्त्रज्ञांना, कलाकारांना त्यांना हवे तसे काम करता येण्याचे स्वातंत्र्य हवे असते. मुलांना आईवडील व त्यांची शिस्त यापासून स्वातंत्र्य हवे असते तर नोकरी करणार्‍यांना नोकरीच्या जाचक नियमांमधून. प्रत्येकाला कोणापासून, कशापासून तरी नेहमीच स्वातंत्र्य हवे असते. अहो, इतके कशाला, कित्येकदा तर आपल्याला आपल्या स्वतःपासून, आपल्या मनांपासून स्वातंत्र्य हवे असते. त्यावरून एक गोष्ट आठवली ती सांगते.

आम्ही सगळेजण त्यावेळी बारावीला होतो. आमचा सात आठ जणांचा छान ग्रूप होता. त्यात कार्तिक आणि मयुरेश हे अगदी घट्ट मित्र. दोघेही खूप हुशार, कार्तिकला मेडीकलला जायचे होते तर मयुरेशला इंजिनीअरिंगला. दोघांनाही त्यांना अॅडमिशन मिळणार याची खात्री होती. बाकी आम्हा सगळ्यांचे जिथे मिळेल तिथे किंवा मग बी.एस्सी, एम.एस्सीला जाऊन प्युअर सायन्स करायचे ठरले होते. आमची सगळयांची खूप घट्ट मैत्री होती. सगळेजण अभ्यासात एकमेकांना मदत करायचे. सगळ्यांचा अभ्यास अगदी जोरात सुरु होता.

एक दिवस कार्तिक म्हणाला की आपण या अभ्यासाच्या ताणामधून थोडे रिलॅक्स होऊयात का? नाहीतर स्ट्रेसमुळे उगाच नंतर काही प्रॉब्लेम नकोत यायला. आम्हा सगळ्यांनाच ते पटले. खरेच खूप कंटाळलो होतो आम्ही सारखा सारखा अभ्यास करून. मग पूर्ण आठवडाभर दणकून अभ्यास केला आणि रविवारी सकाळीच आम्ही सिंहगडावर जायला निघालो. हवा मस्त होती त्यामुळे आम्ही धमाल गाणी म्हणत, गप्पा मारत सिंहगडावर पोहोचलो. मयुरेशला फोटोग्राफीची आवड होती आणि हट्ट करून तो त्याच्या वडिलांकडून त्यांचा महागडा कॅमेरा घेऊन आला होता.

सिंहगडावर पोहोचल्यावर मग काय, आम्ही वारा प्यायलेल्या वासरांप्रमाणे उधळलो. तेवढ्यात फोटोसाठी एक मस्त लोकेशन मयुरेशला सापडलं. मग काय, आम्ही सगळेजण एकापेक्षा एक पोजेस देत फोटो काढून घेऊ लागलो. आता इथे ग्रूप फोटो तर हवाच, म्हणून आम्ही सगळेजण छान उभे राहिलो आणि ग्रूप फोटोसुद्धा झाला पण मनाला भुरळ घालणारा निसर्ग मयूरेशला अजून टिपायचाच होता आणि ते काही केल्या त्याला जमेना. तो वेगवेगळ्या अॅंगल्समधून, पुढे-मागे जाऊन सगळे प्रयत्न करीत होता पण चांगला शॉट काही त्याला मिळत नव्हता.

इकडे आमची दंगामस्ती चालूच होती. चांगला शॉट, परफेक्ट अॅंगल मिळवण्याच्या नादात सरकत, सरकत मयुरेश कधी कड्याच्या टोकावर जाऊन पोहोचला हे त्यालाही कळले नाही आणि आम्हालाही आणि तेवढ्यात त्याचा पाय घसरला. काही कळायच्या आत मयुरेश खाली पडला. आम्ही सगळेजण धावतच तिथे पोहोचलो, पण मयुरेश कुठेच दिसत नव्हता, आम्ही त्याला खूप हाका मारल्या पण काहीच प्रतिसाद आला नाही. आम्ही खाली उतरायचा प्रयत्न केला पण तेही जमत नव्हते, काय करावे तेच सुचत नव्हते.

तेवढ्यात तिथे गिर्यारोहकांचा एक ग्रूप आला. त्यांना आमच्यावर काय प्रसंग ओढवला आहे याची जाणीव झाली. त्यांनी भराभर आपले गिर्यारोहणाचे सामान काढले आणि दरीत उतरायला सुरुवात केली. बराच वेळ मयुरेशचा काही पत्ताच लागत नव्हता. शेवटी अर्ध्या तासाने मयुरेश सापडला आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. गिर्यारोहकांनी मयुरेशला अलगद वर आणले आणि त्यांच्याच गाडीतून हॉस्पिटलला घेऊन गेले. आम्ही मागे होतोच.

पण ह्या सगळ्यालाच खूप उशीर झाला होता. मयुरेश जिथे पडला तिथे त्याचे डोके एका मोठ्या दगडावर आपटले होते आणि त्या मारामुळे तो तिथल्या तिथेच गतप्राण झाला होता. आम्ही सगळेजण तर अगदी बधीर झालो होतो. नक्की काय झाले होते ह्याचे आकलन व्हायला सुद्धा आम्हाला दोन दिवस लागले आणि मग त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या दुःखाला पारावारच उरला नाही.

होता होता ह्या घटनेला महिना झाला. घरचे, शेजारी, मित्रपरिवार ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही सगळेचजण हळूहळू सावरलो. आम्ही परत स्वतःला अभ्यासात झोकून दिले. जेव्हा जेव्हा एकत्र जमायचो तेव्हा साहजिकच ह्याच विषयावर बोलणे व्हायचे आणि जुनी जखम परत भळभळ वाहायला लागायची, म्हणून का अभ्यासाचे कारण होते म्हणून, पण मग आमचे एकत्र येणे हळूहळू खूपच कमी झाले. परीक्षा जवळ आली म्हणता म्हणता झाली सुद्धा. अपेक्षेप्रमाणे कार्तिकला पेपर खूपच चांगले गेले होते.

सुट्टी सुरु झाल्यावर आता आम्ही परत एकत्र जमायला लागलो होतो. ‘तो’ विषय सोडून आता इतर विषयांवरती गप्पा व्हायला लागल्या होत्या. आयुष्य बऱ्यापैकी नॉर्मलला आलेय, असे वाटायला लागले होते. पण एक गोष्ट आम्हाला खटकायला लागली होती. कार्तिकमधे हल्ली खूपच बदल झाला होता.

तो पटकन कोणावरही चिडायचा किंवा सारखाच कोणावरतरी चिडायचा. आणि चिडला की एकदम ओरडायला, भांडायलाच लागायचा. त्याला कसा बसा शांत करताना आमच्या नाकी नऊ यायचे. दिवसेंदिवस त्याला आणि त्याच्या रागाला आवरणे आम्हाला कठीण जायला लागले होते. ह्या काळजीत आम्ही सर्वजण असतानाच एक दिवस कार्तिक अचानक शांत झाला, बोलेनसाच झाला. आम्ही सगळे जमलो तरी गप्प गप्प रहायचा, सतत कुठल्यातरी विचारात गढलेला असायचा.

शेवटी मी ठरवले, कार्तिकशी ह्या विषयावर बोलायचेच. एकदा तो एकटाच असताना त्याला गाठले आणि म्हणाले, “कार्तिक, मला तुझ्याशी थोडेसे बोलायचे आहे.” आम्ही बोलायला सुरुवात केली तेव्हा आधी तो उडवाउडवीचीच उत्तरे द्यायला लागला. पण माझ्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दलची काळजी, प्रेम, आधार दिसला असावा. मग मात्र तो भडाभडा बोलायला लागला. म्हणाला, “नुपूर, तूच सांग मयुरेश हे जग सोडून गेला असताना आपल्याला जगायचा काही अधिकार आहे का? कुणी दिला हा अधिकार? मला ना आता जगावेसेच वाटत नाही. बिचारा मयुरेश एकटा आहे गं! मला आता नाही जगायचे.” कार्तिक खूप दिवसांनी त्याचे मन मोकळे करत होता. त्याच्या मनाची तगमग सांगत होता.

कार्तिकचे आईवडिल बळजबरीनेच त्याला डॉक्टरकडे आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून सायकायट्रीस्टकडे घेऊन गेले. कार्तिकच्या मनाला मयुरेशच्या अकाली आणि अपघाती निधनामुळे जबरदस्त धक्का बसला होता. “स्प्लिट पर्सनॅलिटी” चे निदान डॉक्टरांनी केले होते आणि आता औषधे पण चालू केली होती.

त्या दिवशी अशीच कार्तिक बरोबर गप्पा मारत बसले होते. त्याच्या चेहऱ्यावर आज बरीच हुशारी दिसत होती. त्याचाही आज गप्पा मारायचा मूड दिसला. मला म्हणाला, “नुपूर, अगं मला काय कळत नाही का की मयुरेशच्या मृत्यूला आपण कोणीही जबाबदार नाही, तो एक अपघात होता? पण मयुरेशचं आयुष्य असे अर्ध्यावरच खुडले गेले गं! त्याची स्वप्नं ही स्वप्नच राहिली. ती आता कधीच सत्यात उतरणार नाहीत. इंजिनीअर झाल्यावर काय काय करायचे बेत केले होते त्याने. ते सगळे सगळे तसेच राहणार आता. एक आयुष्य जगल्याशिवायच संपून गेले. नुपूर, मला हेही कळतंय गं की मी माझे आयुष्य जगायचे थांबवले तरी मयुरेश परत येणार नाहीये! माझ्या ह्या अशा वागण्यामुळे आईबाबांना, तुम्हा सगळ्यांना किती त्रास होतोय, किती काळजी वाटतेय हे कळत नाही का मला? पण काय करू गं? माझे हे दुसरे मन आहे ना ते माझे ऐकतच नाही. मला त्याच्याप्रमाणेच वागायला लावते. ते म्हणते, मयुरेशला एकट्याला सोडू नकोस, मयुरेशकडे जा. इतके पॉवरफुल आहे ते की त्याच्यापुढे माझे काही चालतच नाही. मी कितीही नाही म्हटले तरी तेच जिंकते. नुपूर, मला या माझ्या या दुसऱ्या मनापासून कोणीतरी सुटका मिळवून द्यायला हवीय गं! मला माझ्या ह्या ‘मनापासून’ ‘स्वातंत्र्य’ मिळवायचे आहे!”
-योगिनी लेले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा