आठवणीतील खाऊगल्लीत

काही दिवसांपूर्वी माझी मुंबईला फेरी झाली आणि कॉलेजच्या सख्या भेटल्या. आमची अनेक वर्षांची मैत्री. बोलण्याचा धबधबा यावेळी अखंड कोसळत असताना आमचा मोर्चा कॉलेजच्या दिवसातील खादाडगिरीकडे कधी वळला कळलेच नाही आणि मग झाडून आमचे आवडीचे खवैय्येगिरीचे थांबे आठवायला लागले. 

माहीम, माटुंगा कॉलेज जवळचे हटकून थांबायला लावणारे आमचे जिव्हाळ्याचे फूड जॉइंट्स माझ्या जिभेवर ती जुनी चव घेऊन येऊ लागले. मी आठवणींच्या खाऊगल्लीत सहजच पोचले. त्यावेळी आमच्या मैत्रिणी ह्याच गूगलचे काम बजावत असत. खाण्याचे थांबे अगदी मोजके होते. त्या खास जणांच्या यादीत पहिला म्हणजे माटुंगा , रुपारेल जवळचा अमर जूसवाला, जिथे तासभर गप्पांच्या नादात कसा निघून जात असे कळत नसे. त्याशिवाय कॉलेजच्या गेटला लागूनच असलेले रामकृष्ण उडपीचे रेस्टॉरंट. तिथे पेपर डोसा, पांढऱ्याशुभ्र इडल्या खाताना आलेली मजा कधीच विसरता येणार नाही. दादरच्या पळशीकरांचे थंडगार , केशरी रंगाचे घट्ट पियुष ओठांवर न्यारीच चव आणत असे. अहाहा ! देखणा केशर आणि वेलचीची वेलबुट्टी असलेली शाल पांघरलेला पांढरा शुभ्र खरवस. 

त्याकाळी फ्रॅंकीही नुकतीच कॉलेजच्या कोवळ्या मनावर राज्य करू लागली होती. याशिवाय लाल लसणाच्या चटणीबरोबर खाल्लेला कँटिनमधला गरगरीत टम्म फुगलेला बटाटावडा आमचा फेवरीट. मला वाटते दोन अडीच रुपयाला मिळत असे. तोही त्यावेळी फिगर कॉन्शस नसे. रुईया कॉलेज समोर असलेली आणि त्यावेळी वेलिंगकर कॉलेजच्या बाजूला असलेली चहाची टपरी सर्वच कॉलेजतरुण तरुणींना प्यारी होती. तसा टपरीवरचा चहा मला वाटते अजूनही मुंबईकरांना भुरळ घालत असतो. असा चहा पिऊन कधीही पोट बिघडत नाही किंवा कसलेही आजार होत नाहीत. झालेच तर मनाला एक वेगळीच तरोताजगी मिळते एवढे मात्र खरे! 

त्यावेळी आमचे खर्चाचे बजेट फारतर पाच ते दहा रुपयांपर्यंत पोचत असे. तेही अगदी क्वचितच. बहुतेक वेळा आईने, आजीने पहाटे उठून करून दिलेल्या पोळी भाजीतच आम्हाला स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळत असे.

पोळी भाजी बरोबर मुंबईत त्याकाळी इडली, वडा, डोसा, उपमा या दाक्षिणात्य पदार्थांनी आणि ढोकळा, सुरळीच्या वड्या या गुजराती पदार्थांनी शिरकाव करायला सुरुवात केली होती . या शिवाय आमच्या आयांनी पारंपरिक पदार्थांबरोबर चॉकलेट, केक, सॉस, जॅम या परकीय पदार्थांचे स्वयंपाकघरात हिरिरीने स्वागत करायला सुरुवात केली होती . बोरिवली, कांदिवली, मालाड या विभागात गुजराती मिठाईवाल्यांनी आपले महत्त्व प्रस्थापित करायला सुरुवात केली होती. हळूहळू मुंबईत वाढणाऱ्या खवैय्यांची आवड लक्षात घेऊन पाणीपुरी, भेळपुरी, रगडापॅटिस ही उत्तर प्रदेशातील मंडळीही आपले अस्तित्व लक्षात आणून द्यायला लागली होती आणि 'भैय्या, और एक पानीपुरी देना ना ' ह्या लाडिक आग्रहाची चव आम्हाला कळू लागली . मग त्या भैय्यांचे कधीही न धुतलेले हात असो किंवा महिनोनमहिने न धुतलेला शर्ट असो पण त्याच्या हातची पाणीपुरी खायची मौज न्यारीच असायची.

खाण्याच्या नाना तऱ्हा आणि नाना आवडी लक्षात घेऊन अनेक खाऊ गल्ल्या जन्म घेऊ लागल्या होत्या. त्यातील एक चर्चगेट स्टेशनला लागून असलेली खाऊगल्ली मला अजूनही आठवते. त्यानंतर चर्चगेटच्या ट्रेनमध्ये एक मध्यम वयीन बाई स्टीलच्या चकचकीत डब्यात कांदेपोहे, उपमा, बटाटेवडे, भेळ विकून अगदी कमी पैशात भुकेलेल्यांची क्षुधा भागवत असे. मला वाटते त्यावेळी काही लोकल्सची अशा खास घरगुती शेफची हातमिळवणी झाली होती. उदा. विरार लोकल, अंधेरी लोकल, लेडीज लोकलच्या डब्यात असे घरगुती खाणे चकचकीत स्टीलच्या डब्यात करून आणून विकणारे शेफ किंवा शेफणी माझ्या डोळ्यासमोर अजूनही येतात. मुलुंड येथे तर सकाळी सकाळीच सात वाजता गरमागरम जिलबी आणि फाफडा यांची मोठ्या कढईत उत्पादने चालू होत असत. लोकं इतक्या सकाळीही मोठ्या संख्येने रांगा लावून चवीने खात असत.

मुंबई बरोबरच इतरही शहरातील अनेक चवदार आठवणी अजूनही मनात रेंगाळतात. दिल्लीतील थंडीत खाल्लेले कनॉट प्लेसमधील आईस्क्रीम, पुणे येथील कॅम्प मधील सिझलर्स , बंगलोरचे कामत, गोव्याचे माशांचे झणझणीत सुके, बडोदा येथील ' सम्राट ' गुजराती थाळी, कोल्हापूरची चमचमीत मिसळ या आणि अशा अनेक काही खास जागांना खवैय्येगिरीसाठी भेट दिल्याशिवाय त्या शहरांची ओळख पुरी व्हायची नाही. खरे तर आपल्या घरातील स्वयंपाक घरातून सुरुवात करून संपूर्ण भारत प्रवास करायला बाहेर पडलो तर हा खवैय्येगिरीचा लेख पूर्णच होणार नाही.

या शिवाय लहानपणी आजीच्या हातचा खास माझ्यासाठी केलेला खाऊ आठवला नाही तर मला अपराधी वाटेल. तिच्या गोऱ्यापान लालसर हाताने वळलेले गोल गरगरीत रव्याचे लाडू , मस्त खरपूस भाजलेल्या बेसनाचे नातीवरील प्रेमाचा दाट पाक टाकून वर बेदाणा लावलेले बेसन लाडू, खोबऱ्याच्या वड्या, सीकेपी पद्धतीचे निनावे, तेलाच्या पुरणपोळ्या, आरत्या कित्ती पदार्थांची नावे घेऊ? ही सगळी आजीच्या नावावर जमा असलेली अव्वल क्रमांकाची खाद्य मंडळी आमच्या पोटात गेली. यापेक्षा आणखी काय हवे? 

लहानपणी गावी खाल्लेली खास दारची हिरवीगार, कच्ची, ताजी मंडळीही मला आठवत आहेत. हिरवे राय आवळे, कैऱ्या, गावठी हिरव्या चिंचा , विलायती चिंचा, बोरे काहींना आमच्याकडे 'शेम्बडी बोरे' म्हणत. हे नाव कसे, कोठून आले माहित नाही. त्यावेळी पेस्टीसाईड्स ,जंतुनाशके ह्यांचा अतिरेक झालेला नव्हता. 'ऑरगॅनिक' फूड ह्या शब्दाचा जन्म झालेला नव्हता. ह्या आंबट गोड पदार्थांची चव आजही जिभेवर रेंगाळते . 
आज अनेक देशांच्या वाऱ्या करताना अनेक उपहारगृहात, पंचतारांकित रेस्टॉरंट मध्ये विविध प्रकारची देशोदेशीची व्यंजने खायची सवय झाली आहे. काळानुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार चमचमीत, झणझणीत खाणे कमी झाले आहे. पण अजूनही कधीतरी या खाउगल्लीतून मारलेली एखादी फेरी मनाला एक वेगळेच समाधान आणि आनंद देऊन जाते.

- मोहना कारखानीस


1 टिप्पणी: