कविश्रेष्ठ केशवसुत


कविश्रेष्ठ केशवसुत
आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत (कै. कृष्णाजी केशव दामले ) यांचा जन्म ७ ऑक्टोबर 1866 या सुदिनी झाला. जन्मस्थान कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात असलेले मालगुंड हे गाव. काही वर्षांपूर्वी कोकण सहलीनिमित्ताने गणपतीपुळेजवळ असलेल्या मालगुंडला भेट देण्याचा योग आला. तेथे कविवर्य केशवसुत स्मारकाला ही भेट देण्याची संधी लाभली. तेथील अंगणात केशवसुत काव्यशिल्प स्फटिकाच्या फलकांवर कोरून लिहिण्यात आले आहे. त्यांच्या लोकप्रिय झालेल्या कविता तेथे वाचायला मिळाल्या व तो अनुभव खरोखरीच अद्वितीय असा होता. महाराष्ट्राला तसेच भारताला लाभलेल्या एका प्रतिभावान कवीच्या स्मृतीत शासनाने प्रस्थापित केलेले स्मारक पाहून विशेष आनंद झाला.
वरील ठिकाणी आणखी एक दुर्मिळ अशी वस्तू हाती लागली. ती म्हणजे "केशवसुतांची कविता' या काव्य-संग्रहाची हस्तलिखित यथामूल आवृत्ती. या संग्रहात एकूण १०३ कविता आहेत. जवळ जवळ सव्वाशे वर्षांपूर्वीचे लिहिलेले स्वयं केशवसुतांच्या हस्ताक्षरातले काव्य या संग्रहात आहे. शेवटच्या पानावर "मोडी' लिपीत त्यांनी लिहिलेली यादी देखील आहे. केव्हा एकदा साऱ्या कविता वाचून काढू असे झाले. तशा आपल्या लहानपणी शाळेत पाठ्यक्रमात व बालभारती, कुमारभारतीतल्या त्यांच्या कवितांशी आपण सारे परिचित आहोतच.
एक अष्टपैलू व अत्यंत गहन अशी प्रतिभा लाभलेले असे थोर कवी अशी थोडक्यात केशवसुतांची ओळख करून देता येईल. त्यांच्या गाजलेल्या कविता - जसे "तुतारी', "स्फूर्ती', "नवा शिपाई' तसेच "झपूर्झा' वगैरे अन्य बऱ्याच कवितांना मराठी साहित्यात अमर स्थान लाभले. यात आश्चर्याजोगे काय असणार? त्यांचे "समग्र केशवसुत' "हरपले श्रेय' हे दोन काव्य संग्रहही सुप्रसिध्द आहेत.
केशवसुतांच्या कवितांची नावेच आपल्याला त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात थेट घेऊन जातात. "खिडकीकडे मौज पहावयास', "उगवत असलेल्या सूर्यास', "प्रियेचे ध्यान', "कविता आणि कवी', "दुर्मुखलेला', "मुळा-मुठेच्या तीरावर', "मजुरावर उपासमारीची पाळी', "दिवा आणि तारा', "स्वप्नामध्ये स्वप्न', "रुष्ट सुंदरीस', "सुंदरी दर्शन', "नवा शिपाई', "उत्तेजनाचे दोन शब्द', "एका विद्यार्थ्याप्रत', "स्फूर्ती' आणि "तुतारी' ही काही शीर्षकेच जणू त्यांच्या कवितांची झलक सांगून जातात.
"कविता आणि कवी' या कवितेत केशवसुत लिहितात:
अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहात मोठे? पुसतो तुम्हाला
करुनिया काव्य जगात आणणे
न मुख्य हेतू तदीय मी म्हणे
करुनी ते दंग मनात गुंगणे
तदीय हा सुंदर हेतू मी म्हणे !


"अढळ सौंदर्य' कवितेत ते सृष्टीची ओळख पटवून देत म्हणतात:
म्हणुनी कथितो निःशंक मी तुम्हाते
असे सुंदरता अढळ जरी कोठे
तर करी ती सृष्टीत मात्र वास
पहा, मोहिल सर्वदा ती तुम्हास !
स्वातंत्र्यातुर झालेल्या "एका भारतीयाचे उद्गार' असे वदून सांगतात
देवा ! केव्हा परवशपणाची निशा ही सरून
स्वातंत्र्याचा द्युमणी उदया यावयाचा फिरून
केव्हा आम्हा सुटुनी सहसा पंजरातुनी देवा
राष्ट्रत्वाला फिरुनी अमुचा देश येईल केव्हा?
केशवसुतांच्या कवितेत प्रेमरसाचा ही प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. "मुळा-मुठेच्या तीरावर' या काव्यात म्हटले आहे:
मुळा-मुठेच्या हिरव्या सुंदर या तीरावर, खिन्न अशी
इकडे तिकडे स्फुंदत सुंदरी ! वद मजला तू का फिरशी ?
"रुष्ट सुंदरीस' या कवितेतले बोल असे:
नादी लावूनी वेडा केले, ज्याला तू सुंदरी
रुष्ट कशी होऊन बससी आता त्याच्यावरी ?

"सुंदरीदर्शन' ही कविता त्या सुंदरीचे दर्शन आपल्याला असे देते:
हे सौंदर्य तुझे बघून सुभगे! आनंद होतो मला
आलेख्यी लिहिण्या मला गवसला उत्कृष्ट हा मासला
अत्यंत उत्तेजन प्रदायी असे काव्य केशवसुतांचे वैशिष्ट्य म्हणायला यत्किंचितही संदेह वाटणार नाही
"स्फूर्ती' या गाजलेल्या कवितेचे बोलच असे सुरु होतात:
काठोकाठ भरू द्या पेला फेस भरभर उसळू द्या
प्राशन करिता रंग जयाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या
"नवा शिपाई' आपल्याला सांगून जातो:
नव्या मनुतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
केशवसुतांच्या हस्तलिखितात काही स्फुट विचार स्वहस्ते लिहिलेले असे :
विश्वाचा विस्तार केवढा ?
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा !
काय निराशा असे बरे ?
बुजगबाहुले जगातले
मूर्ख भिउनिया त्या गेले
सुज्ञ बघे तद्रूप खरे !

दिवा आणि तारा या कवितेत ताऱ्याचे दिव्याला वदन असे :
तेजाने वरुनी दिव्या ! खुलविसी मानवी चेहरे
आत्मे उज्ज्वल आंतले पण गड्या ! होतात माझे करे
काही सोप्या शब्दात मांडलेल्या काव्यात "घड्याळ' ही त्यांची कविता सांगते :
गडबड घाई जगात चाले
आळस डुलक्या देतो पण
गंभीरपणे घड्याळ बोले
आला क्षण गेला क्षण !
केशवसुतांची सर्वात अधिक गाजलेली कविता "तुतारी' हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. या कवितेच्या पंक्ती "हरिश्चंद्राची फॅक्टरी' या लोकप्रिय मराठी चित्रपटात बरेचदा ऐकायला आपल्याला मिळतात. एक-दोन कडवी येथे लिहिल्याविना राहवत नाही :
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज लागुनी !
जुने जाऊ द्या मरणालागुन
जाळुनी किंवा पुरुनी टाका !
सडत न एका ठाई ठाका
सावध ! ऐका पुढल्या हाका !
"झपूर्झा' नावाच्या आणखी एका कवितेत, वरून दुर्बोध परंतु मर्मभेद सांगणारी अवस्था अशा प्रकारे केशवसुत मांडतात:
हर्षखेद ते मावळले
हास्य निमाले, अश्रू पळाले
कण्टक-शल्ये बोथटली,
मखमलीची लव वठली
काही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला, तिमिर हरपला
काय म्हणावे या स्थितीला
झपूर्झा गडे झपूर्झा !
केशवसुतांच्या हस्तलिखितात आणखी एक गोष्ट लक्ष्यात आली ती म्हणजे त्यांचे इंग्रजी हस्ताक्षर ! अत्यंत सुरेख इंग्रजी हस्ताक्षरात त्यांनी काही कविता लिहिल्या आहेत. शेक्स्पिअर व इतर काही इंग्रजी कवींचा उल्लेखही आपल्याला त्यात सापडतो. ते वाचताना व तसेच मराठी कवितांतील कठीण शब्दांचा वापर पाहून त्या काळातील शिक्षणप्रणाली बद्दल माझा आदर शतपटीने वाढला.
‘To a Poet’ या कवितेत ते लिहितात :
Whenever dark clouds split apart
to drink sweet lunar liquid ray
Whenever high dreams wing up my heart
to tread bright heaven's milky way !

तसेच ‘The Waves’ या सुंदर काव्य पंक्ती अश्या
They dance upon the sunlit sea
they frisk and play and do not mind
the world so full of misery
but move on with the sportful wind !

अजूनही अशा बऱ्याच कवितांचे बोल इथे नमूद करावे वाटतात पण सारे सदर लेखात समाविष्ट करणे शक्य नसल्यामुळे, काही विषय अथवा साधे प्रसंग कसे केशवसुतांना काव्य लिहिण्यास प्रेरित करून गेले हे मात्र आवर्जून सांगावेसे वाटते. शाळेत एका "मुलास झोडपणाऱ्या पंतोजीस' ते रोष युक्त कवितेने झोडपतात, रस्त्यावरून चालताना खिडकीतून ऐकू आलेले सतार वादन ऐकून ते "सतारीचे बोल' ही कविता लिहितात. "मयुरासन आणि ताज महाल' अशी एक कविताही त्यांनी लिहिली. धुमकेतूबरोबर कवीची तुलना करीत "धुमकेतू आणि महाकवी' लिहिली. मास्तरांनी वर्गात दुर्मुखलेला म्हटले म्हणून खिन्न होऊन "दुर्मुखलेला' ही कविता लिहिली. आणखी अशा खूप काही कविता. वयाच्या ३९ व्या वर्षीच केशवसुतांना देवाज्ञा झाली, पण या अवधीतच त्यांनी इतके अमर काव्य रचले. अजून दीर्घ आयुष्य लाभले असते तर आणखी किती लेखन आपल्याला लाभले असते हा विचार मनात तरळून जातो.
मराठी काव्यसाहित्यातल्या जवळ-जवळ सर्व प्रकारच्या वृत्तांमध्ये केशवसुतांनी काव्य रचले. शार्दुल विक्रीडित, भुजंगप्रयात, सुनीत, दिंडी, ओवी, श्लोक, शिखरिणी, मालिनी, साकी वसंततिलका व मंदाक्रांता या सर्व वृत्तांमधुन आशयपूर्ण कविता त्यांनी मराठी साहित्याला दिल्या. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रूढी भंजन, स्वातंत्र्य प्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार या मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या चिरंतन मुल्यांचा त्यांनी कवितेतून उद्घोष केला.
कविवर्य केशवसुतांची आणखी एक कविता जिच्यावर काही कालानंतर प्राध्यापक प्र. के. अत्रे उर्फ केशवकुमार यांनी गंमतीपर विडंबन लिहिले, ती कविता "आम्ही कोण ?' आपल्याला परिचित आहेच. या कवितेच्या काही पंक्ती अशा :
आम्ही कोण म्हणून काय पुससी ? आम्ही असू लाडके
दिक्कालातून आरपार अमुची, दृष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथील पहा ! आम्हापुढे ते फिके !
अश्या थोरात्म्याचे चरणी, महा-प्रतिभावान, थोर कवी महाराष्ट्र-पुत्रास आमचे त्रिवार वंदन, शतकोटी प्रणाम !
नंदकुमार देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा