मानवी सेवा हीच ईश्वरी सेवा

एक उच्च पदवीधर होऊन एखादी चांगलीशी नोकरी शोधायची व कुटुंबाचा भार सांभाळायचा, अशीच सहसा बहुतेकांची महत्त्वकांक्षा असते, पण काही व्यक्ती मात्र यापेक्षा वेगळी आव्हानं घेऊनच जन्माला येतात. एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर त्यात काही नाविन्य नाही पण एखाद्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या हुशारीवर डॉ. बनतो तेव्हा मात्र ते कौतुकास्पद असतं. डॉ. हरीश गोरे व त्यांच्या पत्नी डॉ. सौ वैशाली गंधारे (गोरे) हे खडतर परिस्थितीतून वाट काढत डाॅक्टर झाले. स्वतःचा, कुटुंबाचा त्या बरोबरच गावाचा विकास करत ते समाज सेवेचे व्रत अखंडितपणे करत आले आहेत. मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या ह्या जोडप्याच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणारा हा लेख.

डॉ. हरीश गोरे यांचा जन्म उस्मानाबाद जि. नायगाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणी शाळा नको, खूप भीती वाटते म्हणून नखरे करायचे. घरचे लोक जबरदस्तीने शाळेत पाठवत असत. पुढे शाळेत जाण्याची व अभ्यासाची खूप गोडी लागली. घरात वीज नसल्याने चौकातील लाइट खाली बसून अभ्यास करत असत. मध्यरात्री नंतर चौकातले लाइट बंद झाल्यावर मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून चौथीला शिष्यवृत्ती (स्काॅलरशिप) मिळवली. डाॅ हरीश दिवसभर शेतात काम करून रात्री शाळेत जाऊन अभ्यास करत असत. 

हरीश हे सर्व शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पाचवीला नवोदय विद्यालय, तुळजापूर येथे प्रवेश मिळवला. नवोदय ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असे. येथे सर्व शिक्षण मोफत दिले जायचे. कुटुंब व नातेवाईकांच्या सहकार्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीला उत्तम मार्क मिळाल्याने औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये M.B.B.S. साठी प्रवेश मिळाला. आर्थिक परिस्थिती तुटपुंज्य असून देखील डॉ. हरीश यांनी मोठ्या उमेदीने M.B.B.S. पूर्ण केले. 

या शिक्षणाच्या दरम्यान त्यांना त्यांची भावी आयुष्याची जोडीदारीण मिळाली - तीसुद्धा त्यांच्यासारखीच. प्रतिकूल परिस्थिती असताना प्रामाणिकपणे कष्ट करुन स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे आलेल्या डॉ. वैशाली गंधारे. रोजच्या गाठीभेटी व समविचारी असल्याने डाॅ हरीश व डाॅ वैशाली प्रेमात पडले व पुढे ते विवाहबध्द झाले. लग्नानंतर दोघांनी नोकरी करत करत PG डिग्री पूर्ण केली. डॉ. हरीश यांनी के. ई. एम. मुंबई येथून M.D.पूर्ण केले, तर डॉ. वैशाली ह्यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, पिंपरी पुणे येथून DoRL (E. N. T.) डिग्री प्राप्त केली. 

ह्या कष्टाचं डॉ. हरीश यांना चांगलं यश मिळालं. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये पल्स पोलिओ उपक्रमांत निवड होऊन डाॅ हरीश यांना मिर्झापूर येथे नोकरी मिळाली. हा भाग अतिशय मागासलेला असल्याने अनेक वाडी, वस्तींत जाऊन पल्स पोलिओचे डोस देऊन रुग्णांची तपासणी करावी लागत असे. डाॅ हरीश यांनी इथल्या अशिक्षित व गरीब लोकांत पोलिओबद्दल फक्त जागृकताच पसरवली नाही तर वेळप्रसंगी अनेकांना आर्थिक सहाय्य व मानसिक आधारही दिला. यात त्यांच्या पत्नीची खूप मदत होत असे. तीन वर्षे खूप मेहनत घेऊन काम केल्यामुळे अनेक लोकांशी त्याचे सलोख्याचे सबंध जुळले. 

समाज परिवर्तन घडवून आणायचे असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. डॉ. हरीश व डॉ. वैशाली यांनी स्वखर्चाने अनेक सामाजिक कार्यांची सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये उत्कृष्ट काम केल्यानंतर आपल्या गावची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते पुण्याला स्थाईक झाले. तेथे दोघांनी नवले हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. नोकरी करत असताना संध्याकाळी मोकळा वेळ मिळत असल्यामुळे भाड्याच्या जागेत क्लिनिक चालू केले. स्वतःची प्रगती होत असताना शक्य होईल तेव्हा समाजसेवा करत असत. गरीब मुलांना पल्स पोलिओ लसीकरण सेवा देत असत. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवसाच्या दिवशी नांदेड फाट्यावरील वृध्दाश्रमात व अंधशाळेमध्ये जाऊन मोफत रूग्ण तपासणी व औषधे देत असत. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करून त्यांनी समाजापुढे एक चांगला आर्दश निर्माण केला. बर्याच वेळा अर्थसाह्य कमी पडत असे, पण हेतू चांगला असल्यामुळे मित्रपरिवाराचे सहकार्य मिळाले. परमेश्वराची कृपा व गोरगरिबांचा आशीर्वाद लाभल्यामुळे गोरे दांपत्याच्या कष्टाला चांगले यश प्राप्त होत गेले. 

पुढे नांदेड सिटी, पुणे येथे स्वतः च्या मालकीचे “गोरे मल्टीस्पेशालिटी क्लिनिक” व “स्पंदन मेडिकल” सुरु केले. कुठल्याही सेलिब्रिटीला न बोलवता, थोरांच्या प्रती आदर मानणारे डॉ. हरीश यांनी क्लिनिक चे उद्घाटन आपल्या आई-वडिलांच्या हस्ते तर मेडिकल चे उद्घाटन सासूबाईंच्या हस्ते करून समाजापुढे आणखी एक आदर्श ठेवला. सामाजिक बांधिलकी जपणारे गोरे दांपत्य जेव्हा सुट्टीमध्ये गावी जात असत तेव्हा गावातील लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा व औषधांचे वाटप करत असत.

“इतनी शक्ती हमे दे ना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना ।।

हम चले नेक रस्ते पे हमसे, भूलकर भी कोई भूल हो ना”. अशी परमेश्वराला शक्ती मागणारे गोरे दांपत्य याचे समाज सेवेचे व्रत चांगल्या पध्दतीने सुरु आहे. २०१५ मधे असोसिएशन फाॅर सोशल हार्मनी अँन्ड ॲक्शन पुणे यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप हे आरोग्य शिबीर मेळघाट सारख्या आदिवासी भागात घेतले. आरोग्य तपासणी नंतर गरजू व्यक्तींना पुढील औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यास मदत केली. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या गावाचे नाव पण नायगावच होते. त्यावरून डॉ. हरीश यांना स्वतःच्या नायगावची आठवण झाली व असे आरोग्य शिबीर आपल्या गावात घेण्याची प्रेरणा मिळाली.

अशी अनेक आरोग्य शिबिरं विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राजमाची, लोहगड अशा आदिवासी भागात भरवली. भोर तालुका, खेड शिवापूर, विश्रांतवाडी, नांदेड फाटा, पुणे येथेही उपक्रम राबवले. ऊसतोड कामगार, चतुर्थ श्रेणीकामगार, वैद्यकीय विद्यार्थ्यांवरील ताण, टि. बी.चे रूग्ण, तंबाखू सेवन करणाऱ्या स्त्रियांचे कँन्सर वरील वैद्यकीय शोधनिबंध त्यांनी राष्ट्रीय व जागतिक परिषदेत मांडले. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व जागतिक जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत.

हे सर्व करत असताना ते आपल्या कुटुंबाला व गावाला विसरले नाही. 

आपल्या गावात शौचालये बांधावी यासाठी जनजागृती पसरवली व सहकार्य निर्माण केले. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त असताना पर्यावरणा विषयी लोकांनमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. पती-पत्नींनी प्रयत्न केले. अनेक ग्रामस्थ, मित्रपरिवार व स्वतः आर्थिक मदत करून चारशे झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करून दुष्काळामध्ये ही साडेतीनशे झाडे जगवण्यात यश मिळवले. 

डॉ. हरीश व डॉ. वैशाली स्वतः चे सर्व व्याप सांभाळून अनेक उपक्रमात भाग घेत असतात. पती-पत्नीने सहा कि.मी. मॅरेथाॅन मध्ये भाग घेऊन ती उत्साहाने पूर्ण केली. डॉ. हरीश उत्तम समाजसेवक असून पती, पिता, पुत्र, बंधू या सर्व भूमिका उत्तम रितीने पार पाडत आहेत. २०१७ साली उस्मानाबाद मध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा लोकांचे खूप हाल झाले. आजारी पडले तरी डॉक्टरांकडे जाण्यास व औषधोपचार करण्यासाठी लोकांकडे पैसे नव्हते. आपल्या गावाचे ऋण व कर्तव्य समजून त्यांनी नायगावला आरोग्य शिबीर घेतले. ASHA ही संस्था स्थापन केली.

असोसिएशन फाॅर सोशल हार्मनी ॲक्शन (ASHA) पुणे, नायगाव व्हिजन / ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरढोण, व जि.प. आरोग्य विभाग, उस्मानाबाद. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व आरोग्य प्रर्दशन भरवले. या शिबीराला भरघोस प्रतिसाद मिळाला.

ASHA या संस्थेच्या माध्यमातून व नायगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे शिबिर उत्तम रितीने पार पडले. सातशेहून अधिक रूग्णांची तपासणी केली गेली व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. आज ही डॉ. पती-पत्नीचा गावकऱ्यांना सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या यशाचा आलेख असाच वर वर जावो नी परमेश्वर त्यांच्याकडून अशीच समाज सेवा करून घेवो, हीच ईश्वर चरणी सदिच्छा व्यक्त करून “आई तुळजाभवानी गोरे कुटुंबियांना उदंड आयुष्य देवो” हीच तिच्या चरणी प्रार्थना करून मी आपला निरोप घेते. 

सौ. प्रतिभा विभूते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा