जावे तिथलेची होऊनी खावे

आता एवढ्यातच आपण गणपती उत्सवाचे दर्जेदार कार्यक्रम आणि नंतर आरती व प्रसादाचे जेवण अशी सगळी मजा लुटली. अजूनही खमंग खिरापत, मोदक, करंजी ह्यांचा स्वाद जिभेवर रेंगाळतो आहे, तेवढ्यात ऋतुगंधचा “खाद्यसंस्कृती” विषय वाचून तोंडाला अगदी पाणी सुटलं असेल ना?

मग मी पण लगेचच माझी लेखणी (अहो laptop) सरसावली, आणि बसले की लिहायला. आपण सगळे सिंगापूरमधे रहातो, जे वेगवेगळ्या cuisines करता प्रसिद्ध आहे. लोकल, थाय, मेक्सिकन, मलय, मेडिटरेनियन, इटॅलियन, जपानी, कोरियन सर्व प्रकारचे जेवण इथे मिळते. सिंगापूरचे फूड कोर्ट्स, हॉकर फूड खूप लोकप्रिय आहे. अतिशय वाजवी दरात इथे देशोदेशीचे अनेक पदार्थ उपलब्ध असतात. आणि कडक कायद्यामुळे स्वच्छता पण चांगली असते. आपल्याकडे आलेले पाहुणे सुद्धा हे फूड कोर्ट्स पाहून खुश होतात. कारण त्यांच्या करता हा एक नवा अनुभव असतो. खाद्यसंस्कृती अशा खमंग, खुसखुशीत विषयावर जितकं लिहावं तितकं कमी आहे. 

मी आणि माझे यजमान राजीव आम्हाला दोघांना फिरायची, वेगवेगळे देश पाहण्याची खूप आवड आहे. कधी ह्यांच्या कामाच्या निमित्तानी तर कधी नुसती अशी आमची भटकंती चालू असते. अर्थातच आम्ही जिथे जातो, तिथलं लोकल जेवण नक्की ट्राय करतो. जसे आपण नवीन देशाचंपर्यटन करतो, तसं तिथली संस्कृती, जेवण ह्याचा पण आस्वाद घेतला पाहिजे. तिथली फळे, भाज्या सगळं खाऊन बघितलं पाहिजे. प्रत्येक देशाची आपली अशी खासियत असते. फळे, भाज्या ह्यांचे रंग वेगळे, चवी वेगळ्या. कुठल्याही देशातली नुसती प्रेक्षणीय स्थळे न पहाता, तिथल्या लोकांशी गप्पा मारणे, त्या प्रांतातील व्यंजने खाऊन पाहणे हे पण जोडीला हवेच.

लहानपणी पोहे, पुरणपोळी, पातळभाजी वर वाढलेले आपण सगळे, कधी पिझ्झा, पास्तावर येऊन पोचलो, कळलंच नाही. (अर्थात ते कधीतरी बदल म्हणून) व्यक्ती तितक्या प्रकृती, तसे देश तितक्या खाद्यसंस्कृती. प्रत्येक जागचे हवामान, पाणी, तिथली माती, तिथे येणारी पिके ह्यावर तिथले खाणे, पिणे अवलंबून असते. भारतात नाही का दक्षिणेकडे भात, इडली, डोसे खाल्ले जातात तर उत्तरेकडे कडे पराठे, कारण तिथे गहू जास्त पिकतो. दरवर्षी आम्ही मुलाकडे टेक्ससला जातो. मेक्सिको हा तिथला शेजारी देश असल्यानी, मेक्सिकन जेवण तिथे खूप लोकप्रिय आहे. चिपोटले मेक्सिकन ग्रिल आम्हाला सगळ्यांना आवडते. सिंगापूरला सुद्धा कधीतरी बदल म्हणून मेक्सिकन खायला मजा येते. त्यांचे Enchiladas, Fajitas, (ह्याचा उच्चार फजिता नसून फहिता आहे, असं पण एका रेस्टाॅरंट मधे सांगितलं होतं.) Quesadillas, salads छान असतात.

मला तर कुठलाही खाण्याचा पदार्थ त्या जागेची आठवण करून देतो. उदा: स्वित्झर्लंडला खाल्लेली रोस्टी आणि swiss fondu हे आताही इंटरलाकनची, तिथल्या थंडीची, आणि रम्य निसर्गाची आठवण करून देतात. हल्ली सगळीकडे सगळं मिळतं, हे जरी खरं असलं तरी मला नेहमी वाटतं, जो पदार्थ ज्या देशाचा आहे, तो तिथे खाण्याची मजाच वेगळी असते. ह्याला कारण तिथलं हवामान, आणि त्या पदार्थाकरता लागणारे जिन्नस हे ताजे व स्थानिक असल्यानी फरक पडत असावा. 

हल्लीच आम्ही बुडापेस्टला हंगेरियन चिकन पापारिका खाल्लं, छान होतं. तसेच तिथल्या ग्रीक रेस्टाॅरंटचे जेवण पण मस्त होते. लंडन किंवा ऑस्ट्रेलिया म्हटलं की आपोआप ‘फिश एॅंड चिप्स’ आठवतात. तिथल्या थंडीत ते खाण्याची वेगळीच गम्मत आहे. थाय करी-राईस ही सुद्धा बहुधा सगळीकडे मिळणारी आणि चविष्ट डिश आहे.

इतका वेळ आपण दुसऱ्या देशांचे पदार्थ बघितले, पण भारतात सुद्धा खाण्याची प्रचंड विविधता आहे. प्रत्येक प्रांताची आपली चव, आणि आपली स्वतःची खाद्यसंस्कृती आहे. आम्ही खूप वर्षे इंदूरला राहिलो, तिथली कचोरी, सामोसे, गराडू, शिकंजी, अनेक प्रकारच्या मिठाया ह्यांची एक खास चव आहे. दुसरीकडे कुठेही हे पदार्थ खाल्ले तरी इंदूर सारखी चव लागत नाही.

आपण फक्त एक महाराष्ट्र घेतला तरी चवीत किती फरक पडतो. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नागपूर, कोकण कुठेही जा, जेवणाची चव वेगळी. बरेचदा पदार्थ पण वेगळे. आम्ही जेव्हाही पुण्याची ट्रिप ठरवतो, तेव्हा लगेच मित्र, मैत्रिणींबरोबर वैशाली, वाडेश्वरला कधी जायचे हे पण ठरते. तिथला मसाला डोसा, वडा सांबार हे सगळं खाऊन फर्ग्युसन रोड वर चक्कर मारल्याशिवाय मी पुण्याला गेलीये, असा मला वाटत नाही. तसच पुण्याचा वडा पाव, भेळ, बेडेकर मिसळ... यादी न संपणारी आहे. मी अनेक नवीन पदार्थ, काही सॅलड्स घरी करायचा प्रयत्न करते. आपल्या रोजच्या मराठी जेवणात एखादी नवीन डिश जोडून छान फ्यूजन जेवण बनवता येते. विशेषतः वीकेंडला जेव्हा सगळे आरामात घरी जेवतात, तेव्हा असा काही तरी नवीन प्रयोग करता येतो. चला, आता माझी स्वयंपाकाची वेळ झाली, त्यामुळे मी आता उठते, तुम्हाला ही खाद्यसंस्कृती कशी वाटली ते जरूर सांगा.

-मेघना असेरकर


1 टिप्पणी: