अभिव्यक्ती स्वातंत्र्य

‘आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की स्वातंत्र्य ही एक संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्य विषयीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट करायला आवडत असेल, योग्य वाटत असेल तीच गोष्ट करणे दुसऱ्या व्यक्तीला शिक्षेसमान वाटू शकेल, निरुपयोगी वाटेल. व्यक्ती स्वातंत्र्य, विशेषतः स्त्री स्वातंत्र्य ह्या कल्पना सापेक्ष आहेत. काळानुसार त्या बदलू शकतात. शिवाय मिळालेल्या स्वातंत्र्याचे विचारपूर्वक नियोजन करून उपभोग घेतला तरच त्या स्वातंत्र्याची गोड फळे चाखायला मिळतात. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टींबरोबरच  प्रत्येक व्यक्तीला विशेषतः स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य असणे अत्यंत आवश्यक आहे. लहान लहान गोष्टीतून व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना स्पष्ट होतात…’

अंजूला दुसऱ्या दिवशी महिला दिनानिमित्त कॉलेजमध्ये भाषण द्यायचे होते. ती त्या भाषणाची तयारी करत होती. रात्रीचे अकरा वाजले होते. रात्रीचे जेवण, नंतरचे सगळे आवरून अंजूला मोकळा वेळ मिळायला रोज रात्री साडेदहा अकरा वाजतात. कॉलेजमधील अध्यापिकेची नोकरी, मग सातवीतील तिच्या मुलाचा अभ्यास घेणे आणि शेवटी रात्रीची आवरा आवर ह्या सगळ्याची जबाबदारी तिच्यावर होती. हे सगळे करता करता अंजू थकून जायची. त्यामुळे अलीकडे तिने स्वयंपाकाला एक मध्यम वयीन गरजू बाई ठेवली आहे. ती सकाळचं आणि रात्रीचं जेवण करून जाते. या मावशीबाईंमुळे अंजूला बराच आराम मिळायला लागला आहे. रोजच्या धबडग्यातून वेळ काढून तिला स्वतःचा छंद, आवड जोपासायला वेळ देणे जमू लागलय. पण हे सगळे करताना तिच्या नवऱ्याने घेतलेला आक्षेप तिला मोठ्या हिंमतीने मोडून काढावा लागला. भांडण-तंटे टोकाला न नेता हा निर्णय अमलात आणणे सोपे नव्हते. झाडू, भांडी करणाऱ्या कामाच्या बाईला सहाशे रुपये द्यावे लागतात. शिवाय ह्या स्वयंपाकाच्या बाईला हजार रुपये द्यावे लागतात. दोघींचेही पगार अंजूच्या पगारातून जातात. तरीही नवऱ्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे दिसते. त्याच्या मते जराशी(?) तडजोड केली तर अंजू दोन्ही बायकांना द्यायला लागणारे पैसे वाचवू शकेल. पण त्यासाठी अंजूला मदत करायला त्याच्याकडे वेळ नाही. त्याच्या मोठ्या(?) पगाराच्या नोकरीतून घरची कामे करायला त्याला सवड मिळत नाही. अंजूला तिच्यासाठी किंबहुना त्यांच्या संसारासाठी कामाला बाई ठेवण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यावरून त्यांचे दर महिन्याला पगाराच्या दिवशी भांडण व्हायचे. लग्न झाल्यावर अनेक वर्षे अंजूने कसल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता घरातली सगळी कामे बिनबोभाट करून नोकरीही सांभाळली. आता इतक्या वर्षांनी तिला कामवाली आणि स्वयंपाकीण बाई ठेवून स्वतःसाठी थोडा वेळ काढून स्वातंत्र्य उपभोगावेसे वाटले. कधी भांडून, कधी समजूतीने बोलून तिला ते स्वातंत्र्य मिळवावे लागले.

कमावणाऱ्या स्त्रीची ही अवस्था तर घरात पूर्ण वेळ राहणाऱ्या, अर्थार्जन न करणाऱ्या स्त्रीला तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य किती असू शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकेतील आणि इतर मोठे व्यवहार सोडले तर अगदी लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा तिला नवऱ्याची, वडिलांची, भावाची किंवा मुलाची मर्जी तिची मर्जी नसताना सांभाळावी लागते. उदा. तिने किती वाजता घरी यावे किंवा घरातून बाहेर पडावे, कोणती वस्तू खरेदी करावी वा करू नये, वाहन चालवावे का? किंवा तत्सम पुरुषांना नेमून दिलेली 'तथाकथित' कामे करावीत का? कोणते कपडे घालावे? कोणाशी मैत्री करावी? ही यादी मोठी आहे. तीच गोष्ट कुटुंबातील उर्वरित व्यक्तींना लागू होत नसेल तर या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी अशा स्त्रीने तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांवर कोणतीही तडजोड न करता ठाम राहिले पाहिजे, तसे घडताना हळूहळू दिसत आहे. पण हा बदल प्रथम उच्च शिक्षित घरातून आणि शहरातून मोठ्या प्रमाणात दिसतो. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची अनेकदा खंबीरपणे मदत करू शकते. कुटुंबातील आई, बहीण, सासू, नणंद, जाऊ ह्या एकमेकींना मदत करणाऱ्या असतील तर स्त्रीचे आयुष्य अधिक सुखाचे होते. याउलट कधी कधी कुटुंबात स्त्रीला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतानाही ती स्वतःच दुसऱ्यावर अवलंबून राहणे पसंत करते. अर्थात अलीकडे आपल्या समाजातील स्त्रिया स्वतःविषयी जागृत होऊ लागल्या आहेत आणि अनेक कुटुंबात हे चित्र बदलले दिसत आहे.
माझी एक मैत्रीण बहुराष्ट्रीय कंपनीत वरच्या हुद्द्यावर आहे. तिला भरपूर पगार आहे, दिसायला देखणी, हुशार असलेल्या या मैत्रिणीला तिचा पगार दर महिन्याला तिच्या नवऱ्याला द्यावा लागतो. एरवी तिचा नवरा तिच्याशी कधीही भांडत नाही, समजूतदार(?) आहे. समाजात त्याची प्रतिमा अतिशय उजळ आहे . त्याच्या कंपनीत आणि मित्रमंडळीत तो लोकप्रिय आहे. परंतु बायकोला एकटे फिरण्याचे, स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे त्याच्या दृष्टीने भयंकर पाप आहे. या केसमध्ये बायकोला स्वतःचे स्वातंत्र्य मिळवायला झगडत राहावे लागते किंवा तिच्यावरील या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाचा तरी आधार शोधणे तिला भाग पडते . कोणता कायदा अशा स्त्रीला सरंक्षण देतो याचा मागोवा घेतला पाहिजे.  आपल्या समाजात अगणित बंधनांबरोबरच कधी कधी संस्कारांचे जाळे इतके गुंतागुंतीचे करण्यात आले आहे की त्यांच खरं मूळ जाणून समाजाला स्वतंत्र करणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक व्यक्तीचे  स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असण्याची आवश्यकता मूलभूत आहे. स्त्रियांनी स्त्री सारखेच वागून कृत्रिम पणे बदल न करता स्वतंत्र बाण्याने राहिले आणि पुरुषांनीही त्यांना बदलायला न लावता, एकमेकांबरोबर समानतेने राहिले तरच हे जग सर्वार्थानं वेगळं, अधिक सुंदर, अधिक आनंदमय बनेल.
वरवर क्षुल्लक दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात किती भयंकर असू शकतात. ज्या व्यक्तीला त्याचा सामना करावा लागतो त्या व्यक्तींना किती मानसिक त्रासातून जावे लागत असेल याची नुसती कल्पनाही करणे कठीण आहे. या बाबतीत स्त्रियाच काय लहान मुले, मुली तसेच पुरुषही अपवाद असू शकत नाहीत. म्हणून एकूणच कुटुंबातील आणि पर्यायाने समाजातील प्रत्येक घटकाच्या स्वातंत्र्याच्या कल्पना योग्य दिशेने बदलल्या पाहिजेत.
आणि एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते. विनय हा नावाप्रमाणेच विनयशील मुलगा. लग्न होईपर्यंत त्याचे शिक्षण, नोकरी इतकेच काय त्याने कपडे कोणते घालायचे याचाही निर्णय त्याचे आईवडील घेत. त्यामुळे त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विकास होणे वैगेरे शक्यच नव्हते. लग्नानंतर त्याच्या बायकोने ( जी आईवडिलानीच पसंत केली होती) तो वारसा चालवला. पण गम्मत म्हणजे तिची मनमानी त्याचे आई वडील सहन करू शकले नाहीत. त्यांनीच तिला काबूत ठेवले आणि त्यामुळे बिच्चारा विनय आयुष्यभर सहन कराव्या लागणाऱ्या जाचातून बचावला.

लहान मुलांनाही त्यांचे स्वातंत्र्य प्यारे असते. अनिर्बंध जाचक कायदे , नियम त्यांच्या व्यक्तिविकासावर घाला घालू शकतात. पालकांनी या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या मुलांना वैयक्तिक स्वातंत्र्य दिले पाहिजे. अर्थात त्याचा ते गैरफायदा घेणार नाहीत हे कटाक्षाने सांभाळणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत. भारतातील गेल्या दोन  पिढ्या निवृत्ती नंतरसुद्धा आर्थिक रित्या स्वतंत्र होत चालल्या आहेत. मुलांकडे म्हातारपणाची काठी वेगैरे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू हद्दपार झाला आहे.  मुलगा आणि मुलगी ह्यांच्या स्वातंत्र्याच्या व्याख्याही बदलल्या आहेत. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही पारंपरिक समजूत हळूहळू का होईना हद्दपार होत असल्यामुळे मुलींना आणि मुलांना समान वागणूक मिळताना दिसून येते.  बदलत्या काळानुसार दोघांनाही मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या संकल्पना बदलत आहेत आणि बदलल्या पाहीजेत.

- मोहना कारखानीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा