संपादकीय



नमस्कार, मंडळी!

नवीन वर्षाच्या खूप, खूप शुभेच्छा! २०१६ चा पहिला ऋतुगंध तुमच्या हाती देताना आम्हांला खूप आनंद होतो आहे. 

गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्I
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा:II"

ही वर्तमानाची महती गाणारी ह्या अंकाची केंद्रकल्पना. भौतिकशास्त्रानं वेळ हा आभास आहे असं कितीही सांगितलं तरी आईन्स्टाईन म्हणतो त्याप्रमाणे भूत-भविष्याचा हा आभास आपल्या मनावर इतका खोल बिंबलेला आहे की निव्वळ वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं आपल्याला अशक्य आणि गैर वाटतं. भौतिकशास्त्राच्या काळ या परिमाणात न शिरता एवढं आपण निश्चितच पाहू शकतो की भूतकाळ ही वर्तमानाची आठवण आहे आणि भविष्य हा येणाऱ्या वर्तमानाचा अदमास. ह्याउपर त्यांना गोचर रूप नाही. भूत आणि भविष्याला त्यामुळे स्थान आणि महत्त्व नाही असं नाही. पण वास्तव हे वर्तमान, आणि त्यामुळे आठवण आणि अदमास यात न बुडता वर्तमानात तरता येणं गरजेचं. 

घडून गेलेल्या गोष्टींच्या दु:खात, पश्चात्तापात किंवा सुखाभिमानात आपण अडकून पडतो, आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करतो. आठवण ही कृतीवर शिरजोर ठरते. एकेकाळी कित्येक शास्त्रांत प्रगत असलेला भारत आज पिछाडलेला दिसतो याचं कारण गतवैभवाचं अतिरंजन तर नव्हे? याउलट पुढे काय वाढून ठेवलंय या चिंतेनंही मनुष्य हातपाय गाळून बसू शकतो. "ब्रिज ऑफ स्पाईज" चित्रपटातला रशियन गुप्तहेर जसा "Are you worried?" ला "Will it help?" उत्तर देतो तशी भूमिका आपल्याला स्वीकारता आली तर काय बहार! 

वेगवेगळ्या तत्त्वज्ञान शाखा याचा पुरस्कार करतात आणि हे प्रभावीपणे कसं करता येईल हे ही सांगतात. ध्यान हे त्यातलं एक तंत्र. दलाई लामा आणि स्टॅनफर्ड विद्यापीठानी एकत्र येऊन केलेल्या संशोधनातून पुढे आलेल्या निष्कर्षातून असं दिसतं की ध्यानधारणेनं मेंदूत नवीन न्यूरल नेटवर्क्स तयार होऊ शकतात आणि असलेली नेटवर्क्स जास्त वेगानं आणि संयोजनानं काम करू शकतात. थोडक्यात वर्तमानसन्मुख राहून आपल्या मेंदूचा (मन म्हणा हवं तर) पुरेपूर वापर करून आपण दर्जेदार आयुष्य जगू शकतो. 

ह्या अंकात म्हणूनच वर्तमानावर चिंतन करणारे लेख, निबंध, कथा, कविता आपल्या इतर सदरांबरोबर तुमच्या भेटीला येत आहेत. नववर्षाचं स्वागत वर्तमानाभिमुख होऊन करू या आणि भविष्याला जागरूकपणे घडवू या. 

नेहेमीप्रमाणेच साहित्यिकांना आणि आम्हांला तुमच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर कळवा!

तुमची,
(भूतकाळी नाव असलेली पण वर्तमानातली)
२०१५ ऋतुगंध समिती

1 टिप्पणी:

  1. छान! भूतकाळातले नाव असलेल्या वर्तमानातल्या ऋतुगंध समितीचे अजून एक दर्जेदार अंक प्रकाशित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा