करमणूक...तुमची आमची सेमच असते

सध्याच्या युगात करमणूक नक्की कशाला म्हणावे हा मोठा प्रश्नच आहे. करमणुकीची प्रत्येकाची व्याख्या निराळी. पूर्वी संध्याकाळी जेवणाच्या टेबलवर एकेका पदार्थाची चव चाखता चाखता दिवसभराच्या कामाचा आढावा घेत असत. नवरा त्याच्या ऑफिसमध्ये काय काय झाले ते उत्सुकतेने बायको मुलांना सांगत असे, मुले त्यांच्या शाळा कॉलेजच्या गंमतीजंमती सांगत असत. मुलांना आईच्या हातचे जेवण चाखता चाखता आईच्या दिवसभराच्या कष्टाची जाणीव होत असे. 

पण आताच्या आधुनिक युगात प्रत्येकजण भले बसलेला असतो घरामध्ये एकमेकांच्या जवळ किंवा आपापल्या रूममध्ये, पण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र. कोणाला कोणाचा पत्ताच नसतो कि, दुसऱ्या व्यक्तीचे काय चालले आहे. जेवणाच्या टेबलवर बसून एकत्र जेवणे हे बहुतेक घरात कालबाह्य झालेले आहे. कारण प्रत्येकाच्या घरी येण्याच्या वेळा वेगवेगळ्या, कोणी रात्री ७-७.30 वाजेपर्यंत येईल, कोणी ८.३०-९ पर्यंत, तर कोणी ट्राफिक जाम मध्ये अडकून पार १०.३० - ११.०० पर्यंत पण येत असतात. पूर्वी मुलांकडे पॉकेट मनी म्हणून पैसे देण्याची जास्त प्रथा नव्हती, पण आता सर्वसामान्य घरामध्ये सुद्धा सर्रास पॉकेटमनी दिला जातो, त्यामुळे मुलांच्या खिशात पैसे खुळखुळत असल्याने घरी येतायेता मित्रमैत्रिणींबरोबर नेहमीच नाही तरी बरेच वेळा थोडेफार खाणेपिणे होते, त्यामुळे घरी आल्यावर जेवणाची तशी इच्छाच उरलेली नसते, पण खायचे म्हणून चार घास पोटात ढकलायचे, अशा परिस्थितीत त्या पदार्थाची चव कळणे मुश्कीलच. आईने किती मेहनतीने ते बनवले असेल, ह्याचा विचारही मनाला शिवत नाही. कधी एकदा खाणे संपवून आयपॅड, लॅपटॉप घेऊन विडिओ बघ, फोन घेऊन व्हाट्सअप चॅट कर, फेसबुक वर कोण ऑनलाईन आहे, ते बघून चॅटिंग सुरु कर, ह्याची घाई झालेली असते. आता कोणतीही शंका विचारायला मुलांना पूर्वीसारखी घरातील आजी-आजोबा किंवा आई-बाबा सारख्या वडीलधाऱ्या माणसांची जरुरी नसते. त्यांच्या हाताशी वायफाय, गुगल, याहू, बिंग सारख्या साईट्स आहेत, ज्यावर आरामात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. आरामात गोष्टी, कथा इंटरनेट वर वाचता येतात. 'तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणे' अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांच्या जन्मापासून फोन, आयपॅड त्यांना खेळण्यासाठी उपलब्ध असते. मूल रडायला लागले कि आईबाबा त्यांना आधीसारखे खऱ्या खेळण्यातल्या गाड्या, बाहुल्या देण्यापेक्षा फोनवर एखादा गेम लावून दिला कि ते मूलपण गप्प व आईबाबांना पण आपल्या कामात वेळ देणे सोपे. मधेमधे फक्त त्या मुलाने 'प्या' केले कि तेवढ्यापुरता पासवर्ड घालून दिला, कि गेम पुन्हा सुरु, थोड्या दिवसात ते मूलपण स्वतःच गेम चालू करण्यात एक्स्पर्ट होऊन जाते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत टीव्ही वर एखादा सिनेमा लागला तर आईबाबा मुले सर्व एकत्र बसून काहीतरी चटकमटक खातखात बघत असत, बघताबघता एकमेकांशी त्यातील प्रसंगाबाबत चर्चा करत असत. आता जणू आईबाबांसोबत टीव्ही बघणे किंवा बाहेर सिनेमागृहात घरातील माणसांसोबत जाऊन सिनेमा बघणे मुलांना कमीपणाचे वाटते. त्यासाठी त्यांना त्यांचे मित्रमैत्रिणी हवे असतात. पूर्वी क्लब मध्ये जाणे हे दुसऱ्यांना सांगणे लाजिरवाणे वाटे, पण आता आईबाबाच कौतुकाने आपल्या मुलांचे क्लबिंग आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत असतात. आता लंगडी, पकडापकडी, विटीदांडू, साखळीसाखळी, लगोऱ्या इत्यादी मैदानी खेळ कालबाह्य झाल्यासारखे झाले आहेत. आता मुलांना पत्ते, बुद्धिबळ इत्यादी खेळ खेळायला भिडूची गरज नसते. ते ऑनलाईन पण खेळू शकतात व आजकाल शाळाकॉलेज मधील वर्कशीट्स, परीक्षेचे वेळापत्रक, रिझल्ट सर्व ऑनलाईन समजत असल्याने सर्वांकडे कॉम्पुटर व इंटरनेट कनेक्शन असतेच, म्हणजे तोही प्रश्न नसतो. आता ही गोष्ट पण मान्य करावी लागेल कि, पूर्वीच्या मुलांएवढा वेळ आताच्या मुलांना नसतो. कारण पूर्वी शाळेत ठराविक विषय असत, पण आता भरपूर विषय, मग त्याच्या अभ्यासासाठी वेगवेगळे क्लास लावणे हे सर्रास चालते. बरीच मुले गायन-वादन-नाच ह्यासारख्या गोष्टी पण शिकत असतात. हे सर्व करून आल्यावर त्यांना मैदानात जाऊन खेळण्याएवढे त्राण राहिलेले नसते.

फेसबुक स्टेटस वर आपण कुठे फिरायला गेलो आहोत, त्या ठिकाणाचा स्वतःसहित एक फोटो टाकून सर्वांना कळविणे, ही हल्लीच्या पिढीची मोठी करमणूक आहे. क्षुल्लक गोष्टी सुद्धा फेसबुक वर अपडेट केल्याशिवाय मुलांना चैन पडत नाही. खाण्याचे ताट समोर आले कि, त्याची चव घेण्यासाठी खायची घाई होण्यापेक्षा कोणत्या अँगल ने त्याचा फोटो काढला तर अपडेट मध्ये छान दिसेल त्याची घाई झालेली असते. कोणतीही नवीन गोष्ट पाहिली तर सर्वात आधी फेसबुक किंवा व्हाट्सएप वर कोण अपडेट करते त्याची चुरस लागलेली असते. एकदा अपडेट करून स्वस्थता लाभेल, तेही नाही; थोड्याथोड्या वेळाने आपल्या अपडेट वर किती लाईक्स, कायकाय कॉमेंट्स आल्या ते बघण्याची उत्सुकता असते. ह्या बाबतीत मुलांप्रमाणे मोठी माणसेही तेवढीच गुंतलेली असतात, कारण हे करण्यासाठी फोन किंवा कॉम्प्युटर चे बेसिक नॉलेज असले तरी पुरेसे असते. कुठेही गेले कि त्या स्थळाचे पूर्णपणे निरीक्षण करण्याआधी सेल्फी काढण्यासाठी कुठली जागा छान आहे, त्याचा शोध सुरु असतो. काही वेळेला सेल्फीच्या नादात पाय घसरून जीव गमावल्याचेही ऐकायला मिळते. 

काही ज्ञान मिळविण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करण्याकडे फारच थोड्या लोकांचा कल असतो. यु ट्यूबवर सिनेमा, टीव्ही शोज बघणे, अगदीच झाले तर एखादी रेसिपी बघणे, ह्यातच बऱ्याच लोकांचा वेळ जात असतो. पूर्वीच्या स्थळांची माहिती, वेगवेगळ्या देशांची माहिती, तेथल्या चालीरीती इत्यादीबद्दल फारच थोडे लोक उत्सुक असतात. अगदीच कशाची कधी माहिती हवीच असेल तर तेवढ्या वेळेपुरते गुगल सर्च केले कि, माहितीचा खजिना उघडला जातो. पूर्वी कोणी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली कि, आपण डोळे झाकून विश्वास ठेवत असू, पण आताच्या मुलांना आपण व्हाट्सएप किंवा फेसबुकवर आलेल्या अपडेट्स वरून काही कौतुकाने सांगायला जावे, तर ती मुले लगेच गुगल सर्च करून त्या गोष्टीत कितपत तथ्य आहे, हे शोधून काढतात व कित्येक वेळा आपल्यालाच मूर्खपणा केल्यासारखे वाटते. 

पण इंटरनेटमुळे मुलांची पुस्तके वाचण्याची सवय कमी होत चालली आहे. कारण कोणतीही माहिती शोधायला भाराभर पुस्तके वाचण्याची गरजच उरलेली नाही. आता लायब्ररीमध्ये पुस्तके शोधायला जाण्यापेक्षा तेथे असलेल्या इंटरनेट वर १-२ तासांसाठी तेथील कॉम्प्युटर वापरायला जात असतात. 

अलीकडच्या पिढीतील आजी-आजोबा ह्या फोन, कॉम्पुटर, लॅपटॉप वापरण्याबद्दल हुशार नसतात. कारण एकतर ह्या गोष्टी महाग असतात व त्यांच्या मनात भीती बसलेली असते कि 'कावळा बसायला व फांदी मोडायला' जसा एकच मुहूर्त मिळावा, त्याप्रमाणे त्यांनी कधीतरी हात लावला व वापरायच्या अपुऱ्या ज्ञानामुळे वस्तू बिघडली, तर त्याचे खापर कायमचे त्यांच्या डोक्यावर फुटण्याची भीती, ह्यामुळे ती माणसे ह्या गोष्टींपासून हातभार लांबच राहतात. त्यांना हायफाय म्हणजे टच स्क्रीन चा फोन वापरणे जमत नाही. साधा 'की पॅड वाला नोकिया' सारखा फोन दिला की ज्यात आलेला फोन घेणे व डायरीमध्ये बघून नंबर दाबून फोन लावणे ह्या दोन गोष्टी जमल्या कि त्यात ती खुश असतात. करमणुकीसाठी एक टीव्ही असला व त्यात भरपूरसे चॅनल्स असले कि त्यांना आणखी कशाची जरुरी नसते. अगदीच कंटाळा आला तर जवळच्या देवळात जाऊन बस, बागेच्या कट्ट्यावर समवयस्कांसोबत गप्पा मार, ह्यावर ते खुश असतात. आजकाल भारतात पण बागेमध्ये मोकळ्या जागेत योगा करणे, हास्यक्लब मध्ये जाणे, मित्रमैत्रिणीसोबत बोलत जॉगिंग ट्रॅकवर चालणे ह्या गोष्टीत पण त्यांचे मन रमते. 

सांगायचे तात्पर्य काय कि, प्रत्येकाची करमणूक वेगवेगळ्या गोष्टीत असते. एखाद्याला एखाद्या गोष्टीत आनंद मिळत असेल तर त्या गोष्टीपासून दुसऱ्या व्यक्तीला तेवढाच आनंद मिळेल, हे काही सांगू शकत नाही. 

- प्रतिमा जोशी


२ टिप्पण्या: