माझी गॅस्ट्रोनाॅमिकल जर्नी

जन्माला यावं आणि कॅलरीज मोजून, नुसतंच उकडलेले पोषक अन्न आहारात घेत, कायम जिव्हेवर बांध घालत जेवावं, तर मग ते जगणं, माझ्या मते, जगणच नव्हे! ह्याचा अर्थ हा मुळीच नाही की माणसाने विवेक बुद्धि ओलांडून तिन्ही त्रिकाळ फक्त आणि फक्त भूभूक्षितासारखे खातच सुटावे☺ माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, जर चोखंदळपणा दाखवत, पाक कृतींचा थोडा स्वाद घेत, त्यावर कधी मधी खमंग चर्चा करत जर जीवनातला "रसाळपणा" चाखत आयुष्य घालवले तर हरकत नक्कीच नाही, बरोबर की नाही?

सतत कसे बरे दंडक ठेवणे शक्य? अन् जर असे एखाद्याला जमत नसेल तर ते ही मी समजू शकते. कमजोर पाचनतंत्र, शारीरिक व्याधी ह्या सर्वांमुळे ही बर्याचदा बरेच लोकं आयुष्यातील ह्या साध्या सुध्या सुखापासून वंचित रहातात. अर्थातच, तेही कोडं मला अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण अभिनीत सिनेमा पाहिल्याने उमगले… नाहीतर प्रथम मला प्रश्न पडला होता की त्यात अमिताभ बच्चनला सारखा हगवणीचा त्रास असतो तो काहीही खाण्यास घाबरतो, सतत टॉयलेटकडे धाव घेतो.

आता इतका गचाळ विषय डायरेक्टर सुजीत सरकारने निवडलाच कां बरं? ह्याचा अर्थबोध तो सिनेमा पाहुनच मला झाला. असले त्रास असणाऱ्या लोकांबद्दल पूर्ण सहानूभूति ठेवून मी मुद्द्याच्या विषयावर येते.

आता माझ्या सारख्या खवय्ये लोकांना भारतात खाण्याचे बरेच पर्याय मिळतात, पण शाकाहारी असल्याने निदान मला तरी सिंगापूर सारख्या देशात थोडी पंचाईत होते. सिंगापूर सारख्या बहुवांशिक (मल्टिरेशियल) देशात ठीक ठिकाणी असणाऱ्या कोपीटियम म्हणजे फ़ूड कोर्ट्स मधले टिपिकल खाद्य प्रदार्थ, नासी लेमाक, लक्सा, चिकन राइस, यांग -ताऊ-फू, सारख्या जेवणाची ओळख आजवर तरी माझ्या जिभेला झाली नाही. 

आचार्य अत्रे म्हणतात ना, केल्याने देशाटन मनुष्यास येई शहाणपण? तर गेल्या कित्येक वर्षात भारता व्यतिरिक्त, अनेक युरोपियन, आशियाई देशांमध्ये जाणे झाल्याने बऱ्याच देशांच्या खाद्य संस्कृतीचा साक्षात्कार झाला, पण मी खाण्याच्या बाबतीत धाडसी नसल्याने आवड निर्माण झाली नसली तरी माझे खाद्य विश्व समृद्ध होण्यास मदत मिळाली मात्र!

तर आता मीच नाही म्हणत की भारतीय ‘जायके’ उत्तम, तर आता संपूर्ण जगच भारतातील समृद्ध खाद्यसंस्कृतीचे चाहते झाले आहे. उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, चवी कशा तेथील संस्कृती प्रमाणे रंग बदलतात ही विदेशी पर्यटकांना विलक्षण आश्चर्यात टाकणारी गोष्ट आहे. म्हणूनच लहानपणी घेतलेल्या चवी जिभेवर आजही आहेत अन् त्या आठवल्या की भारतातील वेग वेगळ्या शहरात ते खास खाद्य प्रदार्थ, त्यांच्या आठवणी, नव्याने ताज्या न झाल्या तरच नवल.

माझे जन्मस्थान हे ऐतिहासिक ख्यातिचे शहर ‘ग्वाल्हेर’. इथे उत्तरभारतीय बहुसंख्यक; त्यामुळे उत्तर भारतीय जायके, अन् जिभेला लागलेली त्यांची चटक आजही कायम आहे. म्हणूनच, महाराष्ट्रियन असूनही उत्तरभारतीय व्यंजनांकडेच आजही मन वळते.

"ग्वालियर" हे शहर पर्वताने वेढलेले असून उन्हाळ्यात ते उच्चतम तापमान गाठते, तसेच हिवाळ्यात तितकेच गारठते अन् म्हणूनच दोन्ही ऋतूंमध्ये शौकीन खवय्यांना वेग वेगळे खाद्यप्रदार्थ चाखण्याची संधी मिळते व त्याचमुळे नाविन्यही मिळते. भर उन्हाळ्यात रस्त्यावर ठीक ठिकाणी खस लावून गार केलेले उसाच्या रसाचे स्टाॅल, अन् त्यावरची ती गर्दी आजही आठवते.

तहान लागलेली असताना मिळालेले ते लिम्बु, आले, काळं मीठ आणि बर्फ घातलेले उसाच्या रसाचे ग्लास आठवतात तर हे ही आठवते की कसे आॅर्डर करताना लोकं, "बडा गिलास ला, एक अमिताभ गिलास", अन् चक्कं, "छोटा गिलास ला, एक जया भादुड़ी गिलास देना”, असे म्हणत😊
हिवाळयात ग्वाल्हेर हे शहर अन् त्यातला बाज़ार, तील गुड़/शक्कर की गजक, रेवड़ी, आगरा का पेठा, मथुरा के पेढ़े, बरेली की बर्फी, दालमोठ ह्याची रेलचेल घेऊन लोकांना तृप्ति देत असते.

ग्वाल्हेरचा ‘सराफा बाज़ार’ म्हणजे वर्षभर कुठलाही सीजन असो, कायम खवय्यांनी गर्दी केलेला बाजार! चक्क "खाऊ किंवा चटोरा गल्ली" च !
ग्वाल्हेर नंतर अमृतसरी, हिमाचली जायके ते मला माझ्या दिल्ली वास्तव्यात चाखायला मिळाले. 

कनॉट प्लेस येथे "नत्थू” कार्नर मध्ये थाळात, टम्म फुगलेले कुरकुरीत मूंग दालबड़े (राम लड्डू), दही भल्ले, अमृतसरी कुलचे-चने, मावाईमरती, काठीरोल्स, स्टफ पराठे, तवा-सब्जी, तले-आलू , मिर्ची-बोंडा, गोलगप्पे; किंवा "करीम के कबाब” कार्नर वर पुन्हा खवय्ये लोकांची ती भली मोठी रांग पाहून, "भैय्या, एक हमारे लिए भी लगाना", असे म्हणण्याचा मोह फक्त पोटं बिघडलेल्या लोकांनाच टाळता येईल. तर सांगायचे म्हणजे, तो संपूर्ण अनुभव तेथेच उभे राहून घेतला पाहिजे. धक्का बुक्की झेलत, जवळच लुड़बुड करणाऱ्या कुत्र्याला "हट हट" करत, दूर सारत, घामाघूम होत, हिरव्या गार द्रोणात दिलेली तिखट पाणी पुरी (जिला पुचका, गोलगप्पे, पानी वाले बतासे सुद्धा म्हणतात), सुर्र सुर्र करत, मध्येच “ज़रा और एक्स्ट्रा तीखी बनाना भैय्या”, “अब जरा रेग्युलर मीडियम तीखी/खट्टी -मीठी चटनी वाले, गोलगप्पे पिलाओ भैय्या”, असे म्हणत घेतलेला तो अनुभव, ती मजा, त्या पॅक करून घरी नेलेल्या द्रोणाला तर नक्कीच नाही. आता केसरिया रबड़ी चा मोह अशक्य!

केशराचा तरंग, काजू बदाम, पिस्ता इलायचीचा सुवास असलेलल्या रबड़ी चा तो कुल्हड़ हाथात देताना हलवायाने दिलदारपणे वरुन चार चमचे केशरी साय दिली की खवय्यांचे हिशेबी मन लगेच, “पैसा वसूल!” असा शेरा मनापासून देतं… अंतर्मन शांत करत करत हळुवारपणे आपली पावले, खाने के बाद, "बनारसी पान" तो होना ही चाहिये, असे म्हणत, पलिकड़च्या पानभंडाराकड़े वळवतात.

"एक मीठा गुलकंद वाला पान लगाना", अशी ऑर्डर तृप्त मनाने जाते. त्याचबरोबर, “थोडा खुशबूदार बनाना पान, गुलकन्द ज्यादा, सुपारी एकदम बारीक”, अशा कित्येक ऑर्डर ठोकल्या जातात. नंतर, पानवाल्याने चिमटीत धरून दिलेल्या त्या सुवासिक पानाची अलगद घडी करुन ते मसालेदार पान घेत आणि मान तिरकी करत त्या पानाला आपल्या तोंडात अलगद कोपर्यात नीट कोंबत, चारी कडे घोळवत पानातला, गारेगार पेपरमिंटचा तो गारवा तोंडात अनुभवत, अजिबात न चावता, न गिळता इकडून तिकडे तोंडात फक्त ते पान फिरवत, ओठांना रंगवत बसतो.

घेतला वसा टाकायचा नाही... ऊतायचं नाही… मातायचं नाही… अगदी त्याच थाटात, ते पान जास्तीत जास्त वेळ तोंडातच चघळत ठेवणरे तेच खरे पान के शौकीन खवय्ये! 

अन् त्यानंतर जेव्हा आपला त्या अमृततुल्य ब्रम्हांडाशी परिचय होतो... दाट ओळख होते... हलके हलके वाटते डोक्याला, तेव्हाच, "खयके पान बनारस वाला खुल जाए बन्द अकल का ताला", ह्या गाण्यात अमिताभ बच्चन साधा सुधा विडा खाऊन इतका का थिरकतो, ह्याचे गुपित उमगते. 😊 

खरंखुरं 'अतिथी देवो भव' हा तत्ववाद जपणारा उत्तर भारत, आपल्या, “खाओ और खिलाओ” ह्या अस्सल उत्तर भारतीय संस्कृतिमुळेच लखनवी मेहमान नवाजी एवढाच नावजलेला आहे असे म्हटले तरी चालेल !!!
आपली ती जुनी म्हण, “अन्नदाता तथा भोक्ता, पाक कर्ता, सुखी भव”, खऱ्या अर्थाने डोक्यात रूजवत मी आपल्या गॅस्ट्रोनाॅमिकल जर्नीला फुल स्टॉप देत, सर्वांचा आता निरोप घेते. 

शेवटी हे ही म्हणते, कधी मधी, ही "जिभेची चटक" जर नाही पुरवली, तर आयुष्य तसे बेरंगी च बाबा!😢 जीवन जीने का फलसफा, ढंग, सबका अपना -अपना है, खैर… ज़िन्दगी का ये खूबसूरत सफर, जायकेदार और लजीज रहे, बाकी "वक़्त," तो अपनी रफ्तार से गुजरता रहेगा, लम्हे न गुजर जाए, ज़िन्दगी के जायके उठाये बिना. "क्वीन" सिनेमात कंगना राणावत चा विनोदी डायलॉग आठवतो? 
"गुप्ताजी, दारू पिये बिना ही मर गए उससे तो पीकर ही मरते", म्हणूनच मीही म्हणते की, "खाये बिना भी क्या जीना? थोड़ा जी भी लो यारों”, क्योंकि… "आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिन्दगी बिता लो पल जो ये जाने वाला है.
- रुपाली पाठक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा