तृष्णा

परतीच्या वाटेवर भेटली
करकरीत तिन्हीसांजेची राणी
सोनसळली झाडी ऐकवतात
दडलेल्या पक्ष्यांची वेल्हाळ गाणी

चारी क्षितिज ओलेओलेसे
निवांत ओघळत चाललेले
निश्चल निळ्या तळ्यात
रंग अस्मानी उतरलेले

सांजेची मिटते पापणी
दिवे आकाशात लागलेले
घमघमते बकुळा पानोपानी
काळोखी आसमंत भारलेले

मृगाची रात्र येते मध्यावर
रिमझिम धार उभी कोसळते
विझेना भिजलेली चांदणी
तृष्णेपरी माझ्या राहते...


यशवंत काकड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा