संस्कारी ठेवा

"आजी, आजी, आम्हाला तुझी लहानपणची गोष्ट सांग ना!", रात्री जेवण आटोपल्यावर सानिया आणि बिट्टूने अनघा जवळ प्रेमळ हट्ट धरला. अनघाची 'लहानपणची गोष्ट' हा मुलांचा आवडता करमणुकीचा विषय. अनघा आज सकाळीच तिच्या मुलाकडे म्हणजे अंशुमनकडे महिनाभर राहायला आली होती. अनघाच्या कामामुळे, नोकरीमुळे तिला तिच्या गावी राहायला लागत असे आणि अंशुमनला आणि त्याच्या पत्नीला व्यवसायामुळे शहरात राहणे भाग पडले होते .

" माझी लहानपणची गोष्ट? पोरांनो , कित्ती वेळा सांगायची ती गोष्ट? आमच्या वेळची गोष्टच वेगळी होती. तुम्हाला आवडेल पुन्हा ऐकायला?" अनघा नॅपकिनला हात पुसत म्हणाली.
" हो आजी. तू आम्हाला खूप खूप गोष्टी सांग तुझ्या, बाबांच्या आणि बाबांच्या बाबांच्या म्हणजे आजोबांच्या."
"बरं. सांगते. आधी तुम्ही ब्रश करून या. माझी गोष्ट ऐकायची पण नंतर आईचे सगळे ऐकायचे हं." अनघाने मुलांच्या आईकडे, म्हणजे तिच्या सुनेकडे, सहेतुक बघत सांगितले. मुलांना आता गोष्ट ऐकायची घाई झाली होती. त्यामुळे ती काहीही करायला तयार होती.

"आजी , तुम्ही लहानपणी कोणती टूथपेस्ट वापरत होता?" ब्रश करता करता सानियाने विचारले.

अनघा हसली. "सानू, आम्हाला चॉईसच नव्हता. आमचे आई आणि बाबा आम्हाला जे काही आणून द्यायचे तेच आम्ही वापरत असू. आमच्या घरात आम्ही मुले धरून दहा माणसे. तेव्हा काळी टूथ पावडर असायची. टूथ पेस्ट होती पण ती एकच. बिनाका. अनघा लहानपणच्या आठवणीत, हवेत तरंगणाऱ्या पिसासारखी अलगद हरवत चालली. तिला लहानपणचा झोपाळा आठवला. त्याच्या त्या चकचकीत पितळी कड्या. त्याचा कुरकुर लयीत होणारा आवाज. त्यावर बसून घेतलेले उंच उंच झोके. स्वप्नांचे , करमणुकीचे!

"काळी टूथ पावडर? मग आजी तुझे दात एव्हढे व्हाईट कसे झाले?" बिट्टूच्या छोट्या डोक्यातून निघालेला बेसिक प्रश्न. अनघाला पुन्हा हसू फुटले.

"आजी, तुम्ही कोणकोणते व्हिडीओ गेम्स खेळायचात ते सांग ना?" छोटा बिट्टू अनघाच्या खांद्याला हलवत म्हणाला. "स्टुपिड. तेव्हा व्हिडीओ गेम्स नव्हते. आजी, लगेरी खेळायची, सागरगोट्या खेळायची. हो ना?" सानिया ज्ञानी असल्याचा आव आणत म्हणाली.

"मुलांनो, आम्ही लहान असताना व्हिडीओ, मोबाईल, TV कोणाच्याच घरात आले नव्हते. आम्ही एकमेकांना भेटून गप्पा मारत असू. कॉम्पुटर तर तेव्हा आपल्या भारतात आलाच नव्हता. आम्ही मोठे झालो ना तेव्हा आमच्या बाबांनी TV घेतला. तेव्हा दोनच चॅनेल असायची आणि लगेरी नाही लगोरी ".

हे ऐकून सानिया आणि बिट्टूला एकदम मज्जाच वाटली. "मग आजीच्या एन्जॉयमेन्ट चे काय?" सानिया विचारात पडली. अनघाच्या मनात आले, आपल्याला हा प्रश्न तेव्हा कधीच पडला नाही. आपले बालपण इतके आनंदाने काठोकाठ भरलेले की करमणूक, एन्जॉयमेंट आणखी काही वेगळी असू शकते असे कधी वाटलेच नाही. प्रत्येक दिवस हा कॅलिडोस्कोपच्या बदलणाऱ्या नक्षीसारखा देखणा, रंगीत असायचा. भानावर येत ती मुलांना म्हणाली,
"मुलांनो आमचे घर मोट्ठे होते. मोठ्याला खिडक्या. त्यातून थंड हवा आत यायची. घरात, अंगणात, गच्चीत आणि शाळेत कसा वेळ जायचा कळायचेच नाही."

"AC लागायचा नाही कद्धी?" बिट्टूने विचारले. अनघाने त्याला जवळ घेतले.
"नाही बेटा. दिवसभर वारा असायचा. रात्री चांदण्याचा गारवा असायचा. चांदण्यात गच्चीवर गाणी, श्लोक म्हणायला मज्जा यायची. कधी गाण्याच्या भेंड्या लागत."
"व्हॉट इज भेंड्या आजी?" सात वर्षाच्या सानियाने विचारले.
"मला नाही आवडत भेंडीची भाजी," बिट्टू झोपाळलेल्या आवाजात म्हणाला.

"मुलांनो, भेंड्या म्हणजे अंताक्षरी. रात्री माझी आई माझ्या डोक्याला तेल लावायची. त्यामुळे शांत झोप लागायची. नो TV, नो व्हिडीओ. दिवसा शाळेत जायला एकदम फ्रेश. आमच्या डब्यात रोज पोळी, भाजी असायची. शाळेतपण खूप खेळ असायचे. उभा खो-खो, कबड्डी, पकडा-पकडी, साखळी असे खेळ असायचे शाळेत. आजोबांच्या शाळेत लेझीम शिकवायचे."

"आज्जी, मला लेझीम शिकवशील?" सानियाने विचारले. "आणि, आजी, तुम्हाला नूडल्स, वगैरे, केक नाही आवडायचे?"
"सानिया, तेव्हा ह्या पदार्थांची आम्ही नावे सुद्धा ऐकली नव्हती. आमच्या गावात एकच बेकरी होती. त्या बेकरीत खारी, केक, बिस्किटे मिळायची."

"यु मिन दि बेकरी?" सानियाने डोळे मोठे करत विचारले. तिच्या डोळ्या समोर बहुधा काहीतरी भव्य दिव्य आले असावे. मुलांची करमणूक करता करता अनघाची छान करमणूक होत होती. तिच्या लहानपणीच्या आठवणी फेर धरून तिच्या समोर नाचू लागल्या. एकुलत्या एक बेकरीतील केक बनताना येणारा तो वेड लावणारा सुगंध. तिने आताही नाक फुलवून तो सुगंध कल्पनेनेच छातीत भरून घेतला. तिचे बालपण अनेक प्रकारच्या सुगंधाने गच्च भरले होते. पहाटे गच्चीत येणारा मंद प्राजक्ताचा सुवास, त्यानंतर आजीने सुंठ, आले घालून केलेला चहा आणि त्याचा मसालेदार वास, आईने केलेल्या फोडणीच्या पोह्यांचा वास, बाबांनी लावलेल्या टाटांच्या लाल तेलाचा आगळा मंद सुवास, देवघरातील जळणाऱ्या मंद समयांचा आणि त्या पुढेच ओळीत तरल , सुगंधी वास लेवून उभ्या असणाऱ्या उदबत्त्यांचा सुवास. कित्ती कित्ती सुगंधी आठवणी! या सगळ्या आठवणीत लपेटून आपले तारुण्य आणि आता प्रौढपण आले. त्यावेळी आपल्या तरुण पिढीला वेगळ्या, उसन्या, विकतच्या करमणुकीची गरज नव्हती. निखळ मैत्रीच्या सावलीत आणि सोज्वळ स्वप्नांच्या दुनियेत आपले यौवन सुरक्षित राहिले. समाजाची करमणुकीची व्याख्या साधी सोपी होती. करमणुकीच्या वसनाला नैतिकतेची सोज्वळ झालर फिट्ट लागलेली असे. देवळाच्या पायऱ्या निष्पाप भावनेने चढल्या जात आणि गाभारे निष्काम भक्तीने भरलेले असत. लेकी, सुना अगदी सुरक्षित असत. क्वचित काही अनुचित प्रकार घडलाच तर कडक शिक्षा होत असे. अनघा पुन्हा विचारात हरवून गेली.

अचानक… आजूबाजूला जाणवलेल्या शांततेनं अनघा भानावर आली. सानिया आणि बिट्टू शांतपणे तिच्या मांडीवर झोपी गेले होते. पुढली पिढी मागच्या पिढीच्या मांडीवर विश्वासाने विसावली होती. त्या पिढीला आता बदललेल्या, गढूळ वातावरणात शुद्ध संस्कारांची तुरटी लावलेल्या करमणुकीची ओळख करून देणे तिच्याच हातात होते. याची जाणीव तिला नव्याने झाली. त्या जाणिवेच्या ओळखीने तिने ह्यावेळी मात्र, तिच्या कोवळ्या लाख मोलाच्या ठेव्यासाठी आपला मुक्काम वाढवायचे नक्की केले.
- मोहना कारखानीस


1 टिप्पणी: