षड्रसयुक्त संतुलित आहार (जसा प्रत्येक चेंडूवर षटकार!)

"योग्य आणि संतुलित आहार" ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जे 'ब्रम्हांडी ते पिंडी' या न्यायाने आपण घेतलेल्या आहारातूनच आपलं मन आणि शरीर यांची वाढ होतं असते. तसेच रोगही आहारापासूनच निर्माण होतात. म्हणूनच आहाराचा सर्वांगीण विचार आयुर्वेदात केला आहे.

मागच्या लेखांमध्ये आपण ऋतूनुसार योग्य आहार कसा करावा, आरोग्य राखण्यासाठी दोषानुसार आहारविचार, विरुद्ध आहार म्हणजे काय?, पथ्यापथ्य तसेच आहार्य द्रव्यांविषयी काही समज गैरसमज यांचा विस्तारानी विचार केला.

आयुर्वेदात आहारासंबंधी आणखीन एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती म्हणजे षड्रस. आपल्या आहारात सहाही रसांचा समावेश असणे आरोग्याच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आहे. हे सहा रस म्हणजे - मधुर (sweet), अम्ल( sour), लवण(salty), कटु (pungent), तिक्त (bitter), कषाय (astringent). 

जेवण हे नेहमीच षड्रसात्मक हवे म्हणजे गोड,आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे सहाही रस (चवी) थोड्या थोड्या प्रमाणात का होईना आपल्या आहारात अवश्य असावेत. एकाच चवीचे पदार्थ म्हणजे अतिमधुर, अतिआंबट, अतिखारट, अतितिखट, अतिकडु असा आहार घेणे आपल्या शरीर व मनाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असते. 

आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेल असतं. वरील प्रत्येक रसामध्ये पंचमहाभूतांचं संघटन असतं. त्यामुळे ह्या सहा रसांमधील एखाद्या रसाचा अभाव किंवा एखाद दुसऱ्या रसाचे अतिसेवन केलं तर शरीरातील पंचमहाभूतांचं संतुलन बिघडून वात-पित्त-कफ ह्या तिन्ही दोषांमधील साम्यावस्था नष्ट होऊन आजार निर्माण होतात.

षड्रस पंचमहाभूत व त्रिदोष संबंध


रस
पंचमहाभूत संगठन
दोष प्रभाव
मधुर (sweet)
पृथ्वी + जल
वात ↓ पित्त  कफ
अम्ल (sour)
पृथ्वी + तेज
वात पित्त  कफ
लवण(salty)
जल + अग्नि
वात पित्त  कफ ↑ 
कटु(pungent)
वायु + अग्नि
वात  पित्त  कफ
तिक्त (Bitter)
वायु + आकाश
वात↑ पित्त कफ
कषाय(astringent)
वायु + पृथ्वी
वात  पित्त  कफ



रस
दोषशमन
दोषवर्धक
गोड, आंबट, खारट
वात
कफ
तिखट, कडु, तुरट
कफ
वात
गोड, कडु, तुरट
पित्त
आंबट, खारट, तिखट
पित्त

षड्रसयुक्त संतुलित आहार घेतल्यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष साम्यावस्थेत राहून आरोग्य लाभते. 
प्रत्येकाने आपली प्रकृती आणि शरीरातील दोष स्थिती जाणून घेऊन सहाही रसांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा. आयुर्वेदिक डाॅक्टरही आहाराचे (पथ्यापथ्य) मार्गदर्शन करताना ह्या सहा रसांचा प्रामुख्याने विचार करतात. 
मधुर रस म्हणजे फक्त गोड पदार्थ असा अर्थ होत नाही तर सर्व पिष्टमय पदार्थही मधुररसात समाविष्ट असतात. तेव्हा सहा रस म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया….



रस
कार्य
आहारद्रव्य
अतिसेवनाची लक्षणे
अतिसेवनाने आजार
१. मधुर (गोड)
शरीरातील सर्व धातूंची पुष्टी, इंद्रियांमध्ये प्रसन्नता, शरीरबल वाढून रोगप्रतिकार क्षमता वाढते. डोळे केस त्वचेला पोषक.
दूध, तूप, साखर, मध, गूळ, गहू, तांदूळ, खोबरं, खजूर, केळ, गाजर, पिकलेला आंबा, रताळे , बीट, मनुका,  बेदाणे, साळीच्या लाह्या
कफदोष वाढून शरीरात जडपणा, आळस, झोप येणे, अपचन, भूक न लागणे, शिर:शूल
Obesity, diabetes, high cholesterol, Indigestion, parasites, accumulation of toxins, tumors
२. अम्ल (आंबट)
रुचिकर पाचक, भूक वाढवणारे, सर्व धातूंचे पोषण करणारा.
आवळा, लिंबू, चिंच, कैरी, कोकम, आंबट फळे, दही, अननस, टोमॅटो, आंबाडी, मद्य
अति तहान लागणे, दात शिवशिवणे, पोट छाती व संपूर्ण शरीरात आग होणे
Acidity, acne, anaemia,  vertigo, blood disease, oedema, eye diseases
३. लवण (खारट)
अग्निदीपन, रुचिकर, पाचक, स्रोतसे स्वच्छ करणारा.
मीठ, काळे मीठ, पादेलोण, लोणची, पापड, व्हिनेगर, सोया साॅस
रक्तदोष, सर्वांगास खाज सुटणे, शरीराची आग होणे, अतिशय तहान लागणे, शरीरात पाण्याचे प्रमाण वाढणे
High blood pressure, acidity, skin diseases, urticaria, baldness, greying of hair,  retention of water
४. कटु (तिखट)
पचन सुधारुन शरीरातील आम (toxins) बाहेर काढले जातात. जंतूघ्न, sinuses मोकळे करतो, कफदोषांचा नाश.
आले, लसूण, मिरे, मिरची, कांदे, सुंठ, पिंपळी, मोहरी, हिंग, वावडिंग, ओवा,  मुळा
चक्कर येणे, शरीरात उष्णता वाढणे, घशात जळजळणे, अतिशय घाम येणे, तोंड येणे
Acidity, stomach ulcers, duodenal ulcers, body pain, bleeding diseases
५. तिक्त (कडू)
दिपन, पाचन,कंठ शुद्धि करणारा, कृमिघ्न, शरीरातील साखरेचे प्रमाण व स्थौल्य कमी करणारा.
कडुनिंब, कारले, हळद, जीरे, ओवा, लवंग, मेथी, मसाल्याचे पदार्थ
धातू व बल यांचा नाश होऊन ताकद कमी होते, चक्कर येणे, छातीत जड वाटणे, तोंड शुष्क होणे
Nervous disorders, stifness, , colic pain, headache, general debility.
६. कषाय (तुरट)
कफ, पित्त व रक्तशामक, त्वकप्रसादक, व्रणरोपण, मलावबंध, जीभ जड होते.
सुपारी, कच्ची केळी ,डाळी,  चवळी, मोड आलेली कडधान्ये, चहा, काॅफी
वातवृध्दी, तोंड कोरडे होणे, पोट फुगणे, वेगावरोध
Constipation, bloating of stomach, dryness in body, nervous disorders

ह्या सहा रसांपैकी मधुर रस अतिशय महत्त्वाचा आणि त्यामुळे अधिक प्रमाणात सेवन करावा (मधुररस युक्त द्रव्ये, गोड पदार्थ नव्हे).  त्याखालोखाल आंबट, त्यापेक्षा कमी खारट, त्यापेक्षा कमी प्रमाणात तिखट, आणि कडू व तुरट रस फारच कमी प्रमाणात सेवन करायचा असतो. प्रत्येक रस शरीराला आवश्यक आहे. कोणत्याही चवीचा अतिरेक करू नये.

आहार रसांचा क्रम -

भोजनकालात पोट रिकामे असते म्हणजे वाताची वृद्धी असते. वातवृद्धि कमी करण्यासाठी व आहाराच्या पचनासाठी कफाची गरज असते म्हणून प्रथम मधुर रसाने जेवणाची सुरुवात करावी. तसेच मधुर रस पचायला जड असल्याने सर्वात पहिल्यांदा हे पदार्थ खाल्ल्याने त्याचे पचन व्यवस्थित होते. पोटभर जेवण केल्यानंतर स्वीट डिश किंवा फळे खाण्याने पचनशक्तिवर ताण निर्माण होतो. यानंतर अम्ल व लवणरसयुक्त पदार्थ खावेत. हे दोन्ही रस अग्नेय असल्यामुळे अग्निवर्धन होऊन पचनकार्य सुधारते. जेवणाच्या शेवटी तिखट, कडू, तुरट पदार्थ घ्यावेत त्याने अग्नि प्रदिप्त होतो. तसेच अन्नग्रहणानंतर जो कफ वाढलेला असतो त्याचे शमन होते. म्हणूनच जेवणाच्या शेवटी तुरट चवीचे ताक व जेवणानंतर सुपारी खाण्याची पद्धत प्रचलीत असावी. हा क्रम स्वस्थ व्यक्तिंना लागू पडतो. आजार झालेला असताना डाॅक्टरांच्या सल्ल्याने ह्यात बदल करावेत.

षड्रसाचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आवळा’. आवळ्यामध्ये लवण (खारट) सोडून बाकीचे सर्व रस आहेत. म्हणूनच आवळ्याला ‘पूर्ण आहार’ असंही म्हटलं जातं. खारट रसाची कमतरता कमी करण्यासाठीच आवळा हा मीठाबरोबर किंवा मीठाच्या पाण्यात बुडवून खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे आवळा खाल्ल्यावर सर्व रसांचे ग्रहण होऊन आरोग्य लाभते.

तेव्हा आहारातील nutrition चा विचार करताना आपण षड्रसयुक्त संतुलित आहारही करतो आहोत की नाही याचा जरुर विचार करावा!

- डाॅ. रुपाली गोंधळेकर
M.D. (A.M.),B.A.M.S.


३ टिप्पण्या: