वाट परतीची

निळसर मोकळ्या आभाळाकडे बघताना अतुलच्या गळ्यात आवंढा आला. खास मनोरुग्णांसाठी असलेल्या 'आधार’ या संस्थेतील त्याच्या आठ बाय दहाच्या खोलीच्या खिडकीतून एवढासा आभाळाचा तुकडा दृष्टीस पडतो. ते स्वच्छ आभाळ त्याच्या मनातील विकृतीची कोळिष्टके सावकाश दूर करते.

पश्चात्तापाचा एक तरंग त्याच्या विद्ध मनाचे नकारात्मक तवंग बाजूला सारत वर येतो. आणि मग त्याला जाणवते, कित्येक वर्षात त्याने कुठे बघितले होते असे स्वच्छ आभाळ? का? आभाळ तर तेच होते . पण ते बघायला नजर लागते. व्यसनाधीन झालेली धुंद नजर तेव्हा नशेत गुंतली होती. ती नशा होती पैशाची, सत्तेची आणि त्या मागोमाग येणाऱ्या सगळ्या व्यसनांची. पूर्वी त्याचे सगळेच चुकत गेलेले. त्या कटू आठवणींनी त्याचे डोळे पाणावले. आणि मग घळघळ अश्रूच वाहू लागले. त्यात पूर्वीच्या केलेल्या चुका, पाप सगळे सगळे वाहून जाऊ लागले.

थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरले. वरती आभाळात इतस्ततः पसरलेले ढग एकटे एकटे. त्याच्यासारखेच. एकेक साथीदार सोडून गेलेले. इतकेच काय त्याच्या पापात साथ देणारे त्याचे हट्टेकट्टे पाय चालेनासे झाले. अतुलला कायमचे जायबंदी करून गेले.

पूर्वी "अतुल, अतुल” करून मागे पुढे करणारे आता कुठे गेले सगळे? काळाच्या ओघात पैसे कमी पडू लागले, पार्ट्या संपल्या तसे एकेक बुडत्या जहाजाला सोडून पळाले. सगळे ****चोर. त्याही परिस्थितीत अतुलला हसू आले. हसल्यामुळे डोक्याला झालेल्या जखमेतून सणसणत वेदना आली. ती वेदना पार कानापासून निघून मस्तकात गेली. पण काळजात उठलेल्या कळेपेक्षा कमीच. आपल्याला काळीज आहे तर… या जीवघेण्या वेदनेने निदान तेवढे तरी नक्की झाले. एरवी माणूस कुठल्या थरापर्यंत अधोगती करून घेऊ शकतो याचा तो मूर्तिमंत जिताजागता पुरावा होता. अशा माणसाला काळीज असते? हो असेल कदाचित!

म्हणून तर ‘उलट्या काळजाचा हलकट माणूस’ असं शारदा म्हणाली होती. त्याच्या तोंडावर सगळी प्राॅपर्टी, कागद मारून गेली. एका क्षणात जणू त्याच्या कानाखाली कोणीतरी सणसणीत ठेवून दिली होती. चांगले केले शारदाने. आपली सगळी मस्ती उतरवली तिने. त्याला वाटले चांगली अद्दल घडली.

आजपर्यंत तो जगला एक बेशिस्त, बेलगाम आयुष्य. मनावर ताबा ठेवायला कधी जमलेच नाही त्याला. मनाची घसरण इतकी झाली की आईचा रात्रंदिन अपमान करताना आपण काय करतोय याची शुद्ध राहिली नव्हती. आईने विनवण्या करत राहण्याऐवजी दोनचार थोबाडीत ठेवून द्यायला हव्या होत्या. त्याच्या अधोगतीला कधी सुरुवात झाली? कधी? पहिला गुटखा खाल्ला तेव्हा? का पहिली सिगारेट चोरून ओढली तेव्हा? का हळूच दप्तरात लपवून ड्रग्स घरी आणले तेव्हा? छे. त्यावेळी अतुलचे बहकणे आईच्या कधी लक्षात आले नाही. आईने ना कधी त्याच्या मनाचा कब्जा घेणाऱ्या विकृतीला ओळखले, ना कधीही ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्याही कुठे लक्षात येत होते? मित्रांच्या संगतीत कधी आणि कुठे बहकलो कळलेच नाही. अर्धवट वय. सगळे कळतंय असे वाटणारे वय! मनाच्या शुभ्र रंगाचा ताबा हळूहळू दुनियेच्या भडक रंगानी बेमालूमपणे घेतला. त्यावेळी वाटले आपण पराक्रमाचे शिखर गाठले आहे. पण आता लक्षात येतेय ती त्याच्या अधोगतीची सुरुवात होती.

अतुलचे डोके जन्मजात तल्लख त्यामुळे चांगले मार्क्स मिळत गेले. सगळ्या अवगुणांवर शाळेत मिळणाऱ्या यशामुळे मखमली आवरण चढत गेले. त्यावेळी या सगळ्या गोष्टींची धुंदी चढत गेली. अतुल हुशार विद्यार्थी. अतुल अजिंक्य. अतुल असा अतुल तसा. त्यातून घरी आई शिवाय दुसरे कोणीच वडीलधारी नाही. आईचा एकुलता एक लाडका, देखणा राजकुमार. पिढीजात श्रीमंती. श्रीमंती ..? अतुल स्वतःशीच कुत्सित हसला. अवगुणांची श्रीमंती . शिस्तीचा अभाव. संस्कारांची वानवा. कॉलेज मध्ये वर्गातील इतर मुले मन लावून अभ्यास करायची. मनाबरोबर शरीराची काळजी घ्यायची. जिमला शरीर स्वास्थ्याची काळजी घ्यायला जातात? तेव्हा हे सगळे हास्यास्पद वाटले होते.

हातात पैसे होते. आजूबाजूला वावरणाऱ्या पऱ्यांची कमी नव्हती. कॉलेजमध्ये सर्वात पहिली कार आणणारा तोच. उंची सिगारेट्स, कधी कधी उंची मद्याचे प्यालेही भरले जाऊ लागले. मग हळूहळू लेट नाईट पार्टीज. तरीही ग्रॅज्युएट झालो प्रथम वर्गातून. मन उंच उंच उडत होते. तारुण्याची, यशाची धुंदी चढली. नजर कधी मायाजालात गुंतत गेली कळलेच नाही. मायाजालात फसलेले मन विकृतीच्या अक्राळविक्राळ विळख्यात घट्ट घट्ट जखडले गेले.

एकीकडे कार डीलिंगचा बिझिनेस जोरात चालला होता. शारदा सारखी सुसंस्कृत तरुणी केवळ आई मुळे त्याच्या आयुष्यात आली. काही महिने छान गेले. पण अतुलचे कलंकित आयुष्य शारदेच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने सुरुवातीला विनवण्या केल्या. मग समजावून सांगितले. पण अगोदरच घसरलेल्या गाडीला ब्रेक लावणे तिला जमले नाही. मग सुरु झाली रोजची वादावादी, धुसफूस आणि भांडणे. त्याचे पर्यवसान झाले घटस्फोटात. शारदा निघून गेल्यावर त्याला जाणवले तिचे महत्त्व पण तरीही त्याचे नाठाळ मन ऐकायला तयार नव्हते.

आणि मग ती जीवघेणी ठोकर बसलीच. बिझिनेस मध्ये अनेक शत्रू तयार होत होते. त्यातीलच कोणीतरी कट करून अतुलवर मारेकरी घातले. त्यादिवशी चिक्कार दारू पिऊ गाडी चालवणाऱ्या अतुलला गाठणे मारेकऱ्यांना सोपे गेले . चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या अतुलला दुनियादारी कळायला आपल्या दोन्ही पायांची आहुती द्यावी लागली. कदाचित आईच्या पुण्याईने त्याचा जीव वाचला. मन मात्र काचेच्या तुकड्या सारखे तडकलेले. आयुष्यभर कधीही न संपणारी वेदना त्याची साथ करणार होती. पोलिसांनी त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात ठेवले. शारीरिक उपचाराबरोबर मनाला उपचारांची अधिक गरज होती. म्हणतात ना 'मन चंगा तो कटोती मैं गंगा! ' अर्थात शरीराच्या आरोग्याबरोबर मनाचे आरोग्य महान!

एक भरकटलेले आयुष्य दोरी तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन झाले होते पण आता वेगाने खाली येतायेता त्याला जमीन दृष्टीपथात येत होती. वाईटातून चांगले होते म्हणतात ते असे. आयुष्यात बसलेल्या जबरदस्त ठोकरीमुळे यापुढे तो त्याच्या आयुष्याला जपणार होता.
त्याच्या शरीराबरोबर त्याच्या मनाचीही योग्य तालीम देऊन तो निगा राखणार होता.

त्याने पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पाहिले. पांढऱ्या ढगांचा एक पुंजका हळूहळू स्थिर होत होता. त्याचेही अस्थिर मन स्थिर होत होते. त्याने त्याच्या दोन्ही हातांकडे बघितले. अजूनही त्याच्या मनगटात शाबूत राहिलेली ताकद त्याला जाणवली. नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटचा श्वास घेताना आईचे त्याच्याकडे आशेने बघणारे पाणीदार, काळेभोर डोळे त्याला आठवले. तिची नजर त्याला पुन्हा योग्य वाटेवर खेचून आणत होती.

"आई, मला माफ कर. मला एक संधी देशील न सुधारण्याची? मला पुन्हा उभे रहायचे आहे. माझ्या दोन्ही पायांवर. ह्यावेळी सत्याच्या, प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्यासाठी. आतून बाहेरून स्वच्छ, निर्मळ होऊन जगण्याची मॅरेथॉन जिंकण्यासाठी मला उभे राहायचे आहे, आई, घेशील न मला पुन्हा जवळ” भावनेने गदगदून येऊन त्याला पुढे बोलवेना. पश्चात्तापाचे अश्रू त्याचे सगळे पाप धुऊन टाकत होते. त्याचे मनोबळ वाढवत होते.

                                                                                                            - मोहना कारखानीस


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा