आरोग्याची गुरूकिल्ली

"आरोग्यम् धनसंपदा" निरोगी व सुदृढ शरीर, हीच तर खरी आपली संपत्ती आहे. ती चांगली सांभाळायची असेल तर आपला दिनक्रम नीटनेटका, संपूर्ण विचार करुन बनवावा. रोज नियमीत व्यायाम व संतुलित आहार याबरोबर पुरेशी निद्रा घेण्याची नितांत आवश्यकता असते.

परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला खूप अनमोल असे शरीर दिले आहे. प्रत्येक अवयवाची किंमत जेव्हा तुम्हाला समजेल त्या वेळी तुम्हीही त्याची काळजी नक्की घ्याल. पण जेव्हा शरीरातील एखादा महत्वाचा अवयव गमावण्याची वेळ येते त्या वेळी मात्र आपल्याला शरीराचे महत्व पटते. अशी वेळ कधीही कोणावर येऊ नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीने "आरोग्याची गुरूकिल्ली" जाणून घेतली पाहिजे.

लठ्ठपणा हा आरोग्याच्याच दृष्टीने नाही तर आपल्या सर्वांना भेडसावणारा एक सामाजिक प्रश्नही झाला आहे. बदलत्या जीवनशैली मुळे मानवी शरीरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपल्या जीवनशैली मध्ये हळूहळू व वेळेनुसार बदल केल्यास आपल्या शरीरावर त्याचे योग्य परिणाम दिसून येतात. "सशक्त आणि निरोगी" रहायचे असल्यास आपल्या दैनंदिन जीवनात "आहार व व्यायाम" या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्यायाम व आहार ह्या दोन गोष्टी म्हणजेच "आरोग्याची गुरूकिल्ली" आहे.

आज बऱ्याच लोकांना व्यायामाचे महत्व पटत आहे. पण आमच्या सारख्या पन्नाशी पार केलेल्या लोकांना मात्र काहीतरी शारीरिक त्रास झाल्याशिवाय व्यायामाचे महत्व वाटत नव्हते. आम्ही लहान असताना सकाळी शाळा असल्यामुळे आपोआपच लवकर उठायचो. शाळेत जाताना अर्धा तास चालत जावे लागत असे. शाळेत जाणे व येणे रोज एक तास चालणे व्हायचे. त्याशिवाय अर्धा तास शाळेत खेळायला मिळायचे. रोज संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मोकळ्या हवेत खेळायचो. त्यावेळी मैदानी खेळ जास्त खेळले जायचे. लंगडी , खो खो, कबड्डी, दोरी उड्या, लपाछपी, लगोरी असे खेळ खेळल्यामुळे चांगलाच शरिरीक व्यायाम होत होता. त्यामुळे आजच्यासारखी स्पेशल व्यायामाची गरज भासत नव्हती. हळुहळू काळ बदलत गेला. वय वाढत असताना विविध सुविधा मिळत गेल्या. परिणामी, शारिरीक व्यायाम होणारे खेळ कमी झाले आणि शरीराला जडपणा जाणवायला लागला. व्यायाम कमी झाल्याने वजन वाढू लागले.

लग्नानंतर, घर, ऑफिस, मुलं, संसार सांभाळतांना वेळ केव्हा निघून जायचा हे समजत सुध्दा नव्हते. जोपर्यंत तब्येत चांगली होती तोपर्यंत काही वाटत नव्हते .पण चाळीशी नंतर मात्र तब्येतीच्या तक्रारी सुरू होऊन, वजन झपाट्याने वाढू लागले. त्या नंतर मात्र मी माझ्या तब्येतीची काळजी घेऊ लागले. आैषधपाणी हा तात्पुरता इलाज होऊ शकतो, हे मला समजले. मग हळूहळू व्यायामाचे महत्व कळायला लागले. निरोगी, दीर्घकालीन, सुदृढ शरीर व उत्तम आरोग्यासाठी योगा क्लास ला जाऊ लागले. वयाच्या ४७ व्या वर्षापासून योगा, हास्य क्लब ला जाणे सुरू केले. त्या नंतर मात्र मी माझा दिनक्रम ठरवून टाकला. सकाळी लवकर उठून सुरवात भरपूर कोमट पाणी पिऊन करते. शक्य असेल तर कोमट पाण्याबरोबर लिंबू व मध घेते. त्यामुळे वजन वाढत नाही. त्यानंतर योगासन, प्राणायाम, चालणे या गोष्टी कटाक्षाने करते. मी नियमीत प्राणायाम केल्यामुळे माझा सर्दीचा त्रास बराच कमी झाला आहे. प्राणायाम केल्यामुळे श्वसनातील अडथळे दूर झाले. जेवढे शक्य असेल तेवढे सुर्य नमस्कार करते, त्यामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते.

दाब उपचार पध्दत म्हणजे तळहातावर चे पॉइंट दाबणे. मी रोज जोरजोरात दोनशे टाळ्या वाजवते. टाळ्या वाजवण्याचे महत्व आपल्या पूर्वजांनाही माहित होते. सर्वांनी ते नियमीत पणे करावे म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याला धार्मिक महत्त्व दिले आहे. भजन, कीर्तन, आरती करताना सर्वांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत हा नियम सर्व जण मान्य करतात. पण रोज सकाळी टाळ्या वाजवा म्हटलं तर घरातील माणसं आपल्याला वेड्यात काढतील. पण रोज टाळ्या वाजवल्यामुळे तळहातावर असलेले पॉइंट दाबले जाऊन ऍक्यूप्रेशरची क्रिया केली जाते. याचा फायदा आपल्या शरीराला होतोच. आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे पॉइंट तळहातावर असल्यामुळे टाळ्या वाजवणे ही ऍक्यूप्रेशरची सहज, सोपी क्रिया आहे.

मी माझे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच दैनंदिन जेवणात सकस व संतुलित आहार घेते. वेळच्या वेळी ताजा व पुरेसा आहार घेतल्यामुळे मला चांगले आरोग्य लाभले आहे. आहारात साखर, मीठ आणि भाताचे प्रमाण कमी ठेवले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीनुसार आहार घ्यावा. म्हणतात ना,"पचेल ते खावे नी रूचेल ते बोलावे" या म्हणी प्रमाणे आपल्या शरीराला पोषक व पचण्यास योग्य असाच आहार घ्यावा. भुकेपेक्षा दोन घास कमीच खावेत. दररोज जेवण झाले की पाच मिनिट वज्रासनामध्ये बसावे. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. आहारा बरोबरच प्रत्येकाने स्वच्छतेवर ही लक्ष द्यावे. खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता ठेवली तरच आरोग्य चांगले राहते. खास करुन स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरले तर पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते. फ्रीजमधले पाणी पिणं टाळावं. जेवण करण्याच्या अर्धा तास अगोदर भरपूर पाणी प्यावे.

जेवण करताना फक्त दोन तीन घोट पाणी प्यावे. जेवण झाल्यावर एक तासाने पाणी प्यावे. असे केले तर याचा आपल्या शरीराला खूपच फायदा होतो. मला ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून मी कोरा चहा घेते. अशा प्रकारे आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर अन्नपचन चांगले होऊन पोट साफ राहते. पोट रोज साफ होणे हेच तर खरे निरोगीपणाचे लक्षण आहे. दररोज जसे शरीराला व्यायामाची गरज भासते तसे मेंदू चांगला राहणं, मेंदूचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी मी रोज ध्यान धारणा (मेडीटेशन) करते. नवीन नवीन गोष्टी करायला शिकते. त्यामुळे मेंदूचे कार्य चालू राहते व बुध्दीला चालना मिळते. यासाठी खेळ खेळणे, कोडे सोडवणे हे रिकाम्या वेळेत करत असते. त्यामुळे स्मरणशक्ती बरोबरच सामान्य ज्ञान वाढते. दररोज आयुष्य सुकर करण्यासाठी व कामातील एकाग्रता वाढवण्यासाठी शरीराबरोबरच मेंदूला व्यायाम करण्याची गरज असते.

शेवटी मानवी मनाला "करमणुकीची" ही नितांत आवश्यकता असते. मनोरंजनातून व्यक्तीला आनंद, मानसिक स्वास्थ्य लाभते, जीवन सुखी समाधानी बनते. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्या. सदा हसत खेळत आयुष्य जगावे. मन टवटवीत असेल तरच आरोग्य चांगले राहते. योग्य व्यायाम व रोजचा दिनक्रम नियमीतपणे पाळून, आपल्या आरोग्याचा दर्जा उंचावता येतो, म्हणून म्हणते "मस्त व्यायाम करा नी स्वास्थ रहा". परमेश्वराने आपल्याला फुकटात खूप अनमोल असं शरीर दिले आहे. त्याचे योग्य रितीने पालन पोषण करा, आनंदी रहा, जगा आणि जगू द्या. या नियमाचे पालन केले तर सर्वांना समाधान मिळेल.

करे योग ,रहे निरोग!

- प्रतिभा विभुते


३ टिप्पण्या: