बागेतला सार्वजनिक नळ

आपल्यापैकी कोणालाही परत लहान होण्याची संधी मिळाली तर अपण, ती उत्साहाने घेऊ. आपलं लहानपण इतकं सुंदर होतं की ते परत जगायला आपल्याला का नाही आवडणार? पण मुळात आपल्याला असं वाटतंच का? मोठं झाल्यावर सगळ्यात जास्त कशाची उणीव भासते? तर ती म्हणजे बेफ़िकीर !! जबादरी नसणे! 

मला आठवतंय की मी लहान असतांना अक्षरशः अनवाणी हुंदडायचे माझ्या भावंडांबरोबर. आईने, "दूध आणतेस का ग??" अशी हाक मारायची खोटी की लगेच पायाला चाकं लावल्यासरखी पळत सुटायचे ! वाणी अगदी गल्लीच्या टोकाशी होता. पैसे सुद्धा द्यावे लागत नव्हते, "तू दिलीपची ना ग?" अस तो विचारायचा. मी "हो" असं जोरात सांगायचे की तो लिहून ठेवायचा. मी दूध घेऊन दडदड़ धावत घरी परत यायचे. 

खेळता खेळता तहान लगली तर बागेतल्या नळाकडे धाव ठोकायची - वाॅटर फाउंटन नाही की फिल्टर नाही आणि घरून आणलेली बाटली… कल्पना करून देखील हसायला येतय! हनुवटीच्या खाली हाताची ओंजळ धरून मनसोक्त पाणी प्यायचो. भाडयाच्या सायकली घेऊन भरभर चालवायचो. ना हेल्मेट ना नी-गार्ड्स ! किती बिनधास्त होतो आपण! भीती माहितच नव्हती आपल्याला.

पावसात भिजणं, चिखलात पकडा-पकडी खेळणं… धम्माल नुसती! ढोपरं फुटायची, हात खरचटायचे पण खेळणं थांबायचं नाही. भांडणंही व्हायची. आणि घरी जाऊन नाव सांगणं वगैरे काही नाही. आपसात भांडायच आणि निस्तारायचं देखील.

अशा आठवणी काढताना मला विचार येतो की आपली मुलं राहु शकतात का अशी बिनधास्त? बेफिकीर? मुळीच नाही. कारण अपण त्यांना राहू देत नाही. भली मोठी लिस्ट देतो “डूज् अॅड डोंट्स” ची. त्यात त्यांना एक पाण्याची बाटली देतो जी त्यांना हरवायची अजिबात सवलत नसते. त्यांना हेल्मेट, नी पॅड्स, एलबो पॅड्स, शूज आणि सॉक्स घालून पाठवतो… वाटतं, मुलं सायकल चालवायला निघालीत की गड जिंकायला?! 

त्यात रोज वेगवेगळे क्लासेस. कधी नाच तर कधी ड्रामा, कधी अबेकस तर कधी आर्ट एंड क्राफ्ट. असं वाटतं किती बंधनं घातली आहेत त्यांच्यावर. त्यात टीवी, मोबाइल्स, आयपॅड्स आणि गेमिंग् हे आहेच. जो कही उरला सुरला वेळ असतो तो त्यात जातो. त्यांना अपण ओरडतो, "किती स्क्रीन टाइम झाला आज!!!" पण आपणसुद्धा त्यांच्या समोर मोबाइल घेउनच असतो हे अपण विसरतो.

आपलं आणि त्यांचं बालपण ह्यात केवढा फरक आहे! आपल्या आई-वडीलांना आपली काहीच काळजी नव्हती का? होती तर! पण ते ओवर प्रोटेक्टिव नव्हते. ते स्वतः वाईट सवाईंच्या आधीन नव्हते. ते खुप सकारात्मक विचार करायचे. हल्ली चालु असलेल्या वाइट बातम्यांमुळे अपण खूप घाबरट होत चाललो आहोत. आपली मुलं मोठी झाली की त्यांना कसल्या आठवणी असतील? त्यांना लाहानपणचे खरे स्वरुप कळेल का कधी? हा विचार अपण करायला हवा.

हे करणे कही फार अवघड नाही. आपल्याला फक्त आपल्या बालपणात डोकवायची गरज आहे. मार्ग आपोआप समोर येईल, स्वच्छ आणि सुन्दर!!!

- अदिती गुप्ते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा