आज - उद्या


आयुष्य झालीये एक
इन्श्युरन्स पॉलिसी
न पाहिलेल्या उद्याच्या 
निर्वाहाची! 

माझा आज पुरा पुरा 
उद्यासाठी बांधील आहे 
न दिसणाऱ्या वेशीवरती 
टांगला धुरकट कंदील आहे 

आज फुलली फुलं मी
न हुंगता भरून ठेवतो 
आज केसाला वेणी नको 
पण उद्या प्रेताला हार ठेवतो 

चाकोरीच्या पिलावळीनं
माझाही घेतला बळी 
दूरच्या भेसूर भविष्याकरता 
आजचे श्वास दाबले गळी 

प्रॉबॅबलिटीची घालून भीती
करून टाकतात षंढ 
दूरचा सतत दाखवत अंधार 
आज करतात अंध 

पण एका कहाणीचे
अंत वेगळे नसतील काय? 
तुला जो रुचेल तो शेवट 
मला गोड वाटेल काय? 

कधी कधी झापडं काढून
नीट बघून घ्यावं आपण 
आपले आजचे ओले श्वास 
कशासाठी आहेत तर्पण? 

आजचे श्वास उद्या पुन्हा
माघारी येणार नाहीत 
आजचे तारे उद्या पुन्हा 
चांदगीत गाणार नाहीत 

आजची मैफल तुझ्यासाठी
तुला हवा तो आळव राग 
सोड झूठ प्रहराची चिंता 
मुक्त फुलू दे नवे स्वराग!



नीतीन मोरे


२ टिप्पण्या: