संपादकीय

'ऋतुगंध शिशिर' या अंकात तुम्हा सर्वांचं स्वागत. 'नाती-गोती' मालिकेतील हा शेवटचा अंक. या अंकासाठी आम्ही साहित्य आवाहन करताच, लेखकांमध्ये उत्साहाची एक लाट पसरली. "नाव नसलेली नाती" हा खास विषय तुम्हाला खूप आवडल्याचं तुमच्यापैकी बरेच जणांनी आम्हाला कळवलं. त्याबद्दल तुमचे सर्व प्रथम धन्यवाद! 

नाती गोती मालिकेसाठी, नात्यांची बांधीव गुंफण करा,
ऋतुगंधच्या बेधुंद गंधानी, शिशिराच्या पदन्यासानी,
संबंधातल्या बंधांचा हळू-हळू आढावा घ्या... 

एवढंच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्ही खरोखरच भरघोस प्रतिसाद दिलात. हा अंक एका ठराविक विषयात बांधलेला असूनही कक्षा ओलांडून, कागदावर मन मोकळं करू देणारा आहे. नात्याला नाव असलंच पाहिजे किंवा दोन व्यक्तींमधेच ते बांधलं गेलं पाहिजे, अथवा ते दिसलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे, या सर्व सामान्य कक्षांना ओलांडून, लेखकांनी हा विषय हाताळला आहे. तुम्हाला या अंकात नात्यांचे खूप वेगवेगळे पैलू वाचायला मिळतील. एखाद्याचं 'रात्रीशी' असलेलं नातं, तर एखाद्याचं 'कवितेशी', एखाद्याचं 'पट्टीशी' असलेलं नातं तर एखाद्याचं 'अनोळखी माणसांशी'. याशिवाय वेगळ्या वाटा, आरोग्यम धनसंपदा, पाककृती ही आपली विशेष सदरे तर तुम्हाला वाचायला मिळतीलच. 

तेंव्हा लवकर वाचा आणि अंक कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.



सस्नेह,

ऋतुगंध समिती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा