परिवार वार्ता


इंद्रधनु -   कवी अभिषेक धनंजय साने यांचा नवीन काव्यसंग्रह



५ फेब्रुवारी २०१७ रोजी नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सिंगापूर स्थित मंडळाचे सभासद श्री अभिषक धंनजय साने यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन श्री अच्युत गोडबोले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी शहर डोंबिवली येथे साजरा झाला. 

अभिषेक आणि प्रकाशित काव्यसंग्रह 'इंद्रधनु' याविषयीची संक्षिप्त माहिती:
अभिषेक यांस समृद्ध वांगमयीन वारसा त्यांचे आजोबा श्री. शंभूराव साने यांच्या करवी आला. त्यांची विज्ञान आणि बालकथा यांची पुस्तके व शंभराहून अधिक माहितीपूर्ण लेख संग्राह्य आहेत. 
श्री. शंभूराव साने यांचे घरातली शंभराहून अधिक मराठी, इंग्रजी पुस्तके मराठीत संतसाहित्यात डॉक्टरेट पदवी मिळवलेली अभिषेक यांची आई यांमुळे साहित्यीक वारसा वृद्धींगत होत गेला. वयवर्षे ७ असल्यापासून अभिषेक यांनी कविता, कथा आणि लेख यांचे विपुल लिखाण केले आहे.

त्या लिखाणातील निवडक कविता 'इंद्रधनु' नावाने प्रकाशित झाल्या. इंद्रधनुमधे चारोळीपासून दीर्घ कवितांपर्यंतचे लेखन यमक आणि मुक्तछंदाची कास धरुन केले आहे. अभिषेक यांच्या लेखणीची भरारी बालकविता ते राजकारण, महाभारतासारखा पौराणिक विषय ते अस्तित्त्ववाद, विडंबन ते प्रेमकविता, प्राण्यांचे भावविश्व ते वार्धक्य अशा विविध विषयांत आहे.

पुस्तकाची सुरुवात साध्या, सोप्या बालकवितांनी होते. कधी प्राणी क्रिकेट खेळतात तर कधी ससा डॉक्टरांकडे जातो. यानंतरच्या कवितांमधे मात्र जीवनाचे तत्वज्ञान यमकबद्ध कविता आणि चारोळ्यातून डोकावते. कुसुमाग्रंजाच्या कवितेचं केलेलं विडंबन आणि त्यात गुंफलेली प्रेमकविता वाचतावाचता अभिषेकच्या कविता कधी मुक्तछंदात शिरतात हे कळतही नाही. जीवनाला दिलेली विविध रुपके आणि त्यातून उलगडणारे जीवनचक्राचे तत्वज्ञान कुठेतरी मनाला अस्तित्वाची आणि सत्याची जाणीव करुन देते. अस्तित्ववाद आणि सामान्यांचा जीवनातील संघर्ष यावरील कविता मनाला कुठेतरी अस्वस्थ करुन जातात आणि जणूकाही याव्र उतारा म्हणून सहज सुंदर गेय अशा बालकविता येतात, विडंबन, उपहासात्मक कविता तर हसवून जातात. असे विविध रंगांच्या कवितांनी युक्त पुस्तक 'इंद्रधनु' हे नाव सार्थ करते. 

अभिषेक यांचे पुढील काही वर्षात कांदबरी, कॉमिक बुक आणि कविता यांचे प्रकाशन प्रतिक्षेत आहे.

अभिषेक ह्यांच्या पुढील लेखन प्रवासाला मंडळाच्या अगणित शुभेच्छा!


पैंजण आणि मोहर - मोहना कारखानीस यांच्या पुस्तकांचे संयुक्त प्रकाशन

मंडळाच्या सभासद आणि लिहिण्याची खूप आवड असलेल्या सौ. मोहना कारखानीस ह्यांच्या नवीन 'पैंजण' या कथासंग्रहाचे तसेच 'मोहर' ह्या कविता संग्रहाचा सयुंक्त प्रकाशन सोहळा २३ एप्रिल २०१६ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरीवली येथे आयोजीत करण्यात आला. 

मोहना कारखानीस यांचा 'पैजण' कथासंग्रह डिंपल पब्लिकेशने साकारला असून त्यांचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक,  ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. तर, कविता संग्रह 'मोहर' हा भरारी प्रकाशनाने साकारला असून त्याचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांच्या हस्ते झाले. 

सौ. मोहना कारखानीस ह्यांच्या पुढील लेखन प्रवासाला मंडळाच्या अगणित शुभेच्छा!


                                                           वेलनेस मंत्र - डॉ हर्षल अंधारे

आपल्या महाराष्ट्र मंडळाचे सभासद डॉ. हर्षल अंधारे हे सिंगापूरमधे माऊन्ट एलायझाबेथ दवाखाण्यात आपत्कालीन चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.  झी टीव्ही आशिया पॅसिफिक वाहिनीवर 'वेलनेस मंत्रा' ही आठ भागांची मालिका असणार आहे.  ह्या मालिकेत डॉ. हर्षल अंधारे आपल्याला वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक आजारांबद्दल माहिती देणार आहेत. ह्यामधे प्रत्येक आजाराची लक्षणे,  त्या त्या आजाराचे निदान कसे करावे,  कुठला आजार झाला असल्यास कोणता उपचार घ्यावा ह्याबद्दल ते आपल्याला सांगोपांग माहिती देणार आहेत. ही माहिती आपल्या सारख्या डॉक्टर नसलेल्या सामान्य व्यक्तीला अतिशय सोप्या शब्दात आणि सुलभ शैलीत ते विषद करुन सांगणार आहेत. यामधे दमा, लठ्ठपणा,  हृदय विकार,  उच्च रक्तदाब,  बालकांना होणारे आजार, पाठदुखी, पोटदुखीच्या समस्या अशा अनेक आजारांवर डॉ. हर्षल अंधारे आपल्याशी बोलणार आहेत. 'वेलनेस मंत्रा' ह्या मालिकेचा पहिला भाग आपण २९ एप्रिल २०१७ तारखेला संंध्याकाळी ७ वाजता झी टीव्ही आशिया पॅसिफिक ह्या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.  

उर्वरित सात भागांचे वेळापत्रक असे आहे:

दुसरा भाग- ५ मे २०१७, संध्याकाळी ७ वाजता
तिसरा भाग - १२ मे २०१७, संध्याकाळी ७ वाजता
चौथा भाग - १९ मे २०१७, संध्याकाळी ७ वाजता
पाचवा भाग - २६ मे २०१७, संध्याकाळी ७ वाजता
सहावा भाग - ३ जून २०१७, संध्याकाळी ७ वाजता
सातवा भाग - १० जून २०१७, संध्याकाळी ७ वाजता
आठवा आणि अंतिम भाग - १७ जून २०१७,              संध्याकाळी ७ वाजता

डॉ. हर्षल अंधारे ह्यांच्या 'वेलनेस मंत्र' ह्या मालिकेचा आपले सर्व सभासद नक्की लाभ घेतील अशी अपेक्षा. डॉ. हर्षल अंधारे ह्यांना मंडळातर्फे अनेक उत्तम उत्तम शुभेच्छा.

- यशवंत काकड




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा