बेडी टेक्नोलॉजीची !!

माझ्यासाठी तरी करमणूक म्हणजे कोणतीही अशी गोष्ट जी आपाल्याला सूख देते, जी आपल्या दुःखावर फुंकर घालते. बरेचजण माझ्याशी सहमत होणार नाहीत पण मला वाटतं करमणूक म्हणजे अशी गोष्ट जी आपल्याला एखाद्या अवघड, संकटाच्या प्रसंगी दिलासा, बळ देते. दुःखद प्रसंगी आपले लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मदत करते, आपल्याला उत्साह देते. मग करमणुकीची साधने कोणतीही असोत, एखादा हलकाफुलका सिनेमा बघणे, जुनी आवडती गाणी ऐकणे, आवडीचा खेळ खेळणे, जिमला जाणे इथपासून ते अगदी मेडिटेशन करणे इथपर्यंत. पण आज मला लिहावसं वाटलं ते आपल्या ‘सध्याच्या’ ‘अद्ययावत यंत्र मित्रांबद्दल’. खरतर आपण खूप भाग्यवान आहोत. आपाल्यासमोर आपली जुनी करमणुकीची साधने आणि आधुनिक टेक्नोलॉजीने उपलब्ध करून दिलेली अशी दोन्ही साधने हात जोडून करमणूक करण्यासाठी उभी आहेत. त्यांचा योग्य वापर करायचा सोडून आपण गैरवापर करतो आणि खापर मात्र टेक्नोलॉजीवर फोडतो. 

गंमत म्हणजे ते सुद्धा त्याच नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून! म्हणजे फोनमूळे माणसे कशी तुटतात, प्रत्यक्ष एकमेकांना कशी भेटत नाहीत वगैरे तक्रारी ह्या फोनवरूनच दुसऱ्याकडे करणे चालू असते किंवा फेसबुकवर कसे कोणी कोणी उठसूठ फोटो टाकत असतात असे शालजोडीतले देत असतानाच “अग, माझी ‘लेटेस्ट पोस्ट’ कशी वाटली”, अशी विचारणा करत असतात. मला सांगा, दूर परदेशी असलेल्या आपल्या मुला-नातवंडांशी बोलायचा, त्यांच्या बाललीला बघायचा आनंद स्काईपमुळेच मिळतोना! एखादा आनंदाचा किंवा दुःखाचा निरोप तातडीने फोन, मोबईलमुळेच पोहोचवणे शक्य होते ना? थोडासा भोचकपणा करून दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून पाहायला फेसबुक उपयोगाला येतेच ना? बसच्या रांगेत उभे राहून कंटाळा येतो तेंव्हा मोबईलवरचे गेम्सच आपली त्यातून सुटका करतात ना? अहो तेवढचं कशाला, म्हातारपणी रात्रीची झोप लागत नाही तेंव्हा आपले आजी आजोबा अंधारात उठून एकटेच एखादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणत असलेले आपण कधीतरी जाग आल्यावर ऐकले आहे की नाही? पण आतामात्र आपण लॅपटाॅप किंवा मोबईलवर मस्तपैकी सीरियल, यु ट्यूब असे काहीतरी बघत रात्रीचा एकलकोंडेपणा नाहीसा करू शकतो की नाही? 

तीच गत घरात एकट्या राहणाऱ्या गृहिणींची, वयस्कर लोकांची. टीव्ही म्हणजे त्यांचा दुसरा मित्र बनतो. त्याच्या साथीने जगण्यातील एकटेपणा हलका होतो. अहो एवढंच कशाला, आपली मुले जेंव्हा लहान होती तेंव्हा आपण नाही त्यांना टीव्हीवर एखादे कार्टून लावून द्यायचो आणि पट्कन आपली कामे उरकायचो, म्हणजे टीव्हीचा आपण बेबिसिटर म्हणून सुद्धा उपयोग केलाय. गूगलच्या जोरावर जातोच की नाही जगाच्या पाठीवर कुठूनही आणि कुठेही? अर्थात पुण्याचा अपवाद सोडून! कारण तिथे अजूनही जिलब्या मारुतीला उजवीकडे वळा आणि हलवायाच्या दत्त्ताला डावीकडे असेच चालते.

मग एवढे सगळे आणि आणखी कितीतरी फायदे असताना आपण या नवीन टेक्नोलॉजीच्या करमणुकींच्या साधनांना नावं ठेवयाची हे योग्य आहे का? नावे खरेतर आपण आपल्याला ठेवायला हवीत. आपण आपले ठरवायला हवे की यंत्राच्या आहारी न जाता त्यांचा दुरुपयोग न करता फक्त सदुपयोग कसा करून घेता येईल. त्यासाठी कोणकोणते उपाय आहेत किंवा योजता येतील, ते शोधायला हवे, त्यावर चर्चा, अभ्यास व्ह्यायला हवा. टेक्नोलॉजीच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायांवर चर्चा करायाला हवी. उदाहरणार्थ, मोबईलमुळे डोळे, मेंदू, मान, शरीर यांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय किंवा माणसांच्या परस्पर संबंधांवर होणारे अनिष्ट परिणाम व त्यासाठीचे पर्याय शोधण्यात आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशा गोष्टींवर अनेक ठिकाणी संशोधनेही चालू आहेत. त्याची योग्य ती दखल आपण घेतली पाहिजे, त्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे.

आधी आपण आपली आपाल्याला शिस्त लावायला हवी, मग मुलांना आपोआपच शिस्त लागेल किंवा लावणे शक्य होईल. ही शिस्त कशी अंगीकारायची हे समाजातील प्रत्येक घटकाने मनावर घेतले पाहीजे तरच हळूहळू संपूर्ण समाजाला या टेक्नोलॉजीच्या वाटणाऱ्या बेड्यांमधून, व्यसनामधून मुक्त होता येईल आणि सदुपयोग करून घेता येईल.

म्हणून वाटते, शेवटी करमणूक म्हणजे काय, तर ज्यात गुंतून न पडता, त्याच्या आहारी न जाता, ज्याच्यापासून मनसोक्त निखळ आनंद मिळवता येतो अशा गोष्टी.

- योगिनी लेले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा