सकार हवा, नकार नको

“वसुधैव कुटुम्बकम्” ह्या श्लोकाने ज्ञानदेवांची आवर्जून आठवण होते. ते म्हणतात: 

हे विश्वचि माझे घर, ऐसी मति जयाची स्थिर

किंबहुना चराचर, आपणचि जाहला

इथे ज्ञानदेवांना अभिप्रेत अर्थ हा की अख्खे जगच माझे घर बनून राहिले आहे. त्यात प्राणिमात्र सुद्धा सामावले आहेत. बरे-वाईट, सज्जन-दुर्जन सगळ्यांना समान मानून ते सर्वांचे भले चिंतित आहेत. त्यासाठी मनाचा प्रचंड मोठेपणा त्यांच्याकडे आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांकडे ज्ञानदेवांसारखा मनाचा मोठेपणा सापडणे दुर्मिळच. परंतु बदलत्या तंत्रज्ञानामुळे जग छोटं झालंय, जवळ आलंय. नाना प्रकारचे लोक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे विचारांची खुली देवाण-घेवाण होत आहे.

सकारात्मक बदल
संपर्काच्या कक्षा वाढल्या. देशविदेशातील लोकांची मने जुळली. ही परिस्थिती कुणामुळे निर्माण झाली? हा युगंधर दुसरा तिसरा कोणी नसून इंटरनेट म्हणावा लागेल. आता कोणत्याही वेळी जगाशी आपल्याला हवा तेव्हढा संपर्क होऊ शकतो. लहानपणीच ह्या जादूगाराची ओळख झाल्यामुळे मुलांचे ज्ञान अफाट होत चालले आहे. जातिभेदाच्या, धर्माच्या भिंती कोसळत आहेत. आजच्या तरुणाचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. पूर्वी लोक एखादा अपवाद वगळता एकमार्गी नोकरी करत. काटकसर करून पैसे साठवत. मुलांच्या, तरुणांच्या बुद्धीला एका ठराविक चौकटीत जखडून राहावे लागत होते.

पण मग एक एक करून टेलीविजन, मोबाईल, आणि इंटरनेट आले. ज्ञानाचे भांडार खुले झाले. तरुणांनी आपले नवीन मार्ग चाकोरीबाहेर शोधायला सुरुवात केली. लोकांची मानसिकता बदलली. म्हणूनच म्हटले आहे –

केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार|
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार||

वस्तूंची रेलचेल / दर्शनी बदल
जागतिकीकरणामुळे भौगोलिक सीमारेषा केवळ नकाशावरच राहिल्या आहेत. मनुष्याच्या मनातील सीमारेषा कधीच पुसट झाल्या आहेत. भारतीय लोक नाहीत असा देश सापडणे कठीण आणि जिथे भारतीय, तिथे भारत! आपले कपडे, खाणे-पिणे, राहण्याच्या पद्धती किती बदलल्या आहेत. पूर्वीचे दिवस आठवून बघा. आपले कपडे किती साधे असत. न कुठली फॅशन, न कुठली वेगळी पद्धत. आज आपण देशविदेशीचे कपडे पाहतो. त्या कपड्यात आणि आपल्या इथे मिळणाऱ्या कपड्यात काही फरक आढळतो का? आमच्या लहानपणी फक्त bata च्या चपला आणि बूट मिळत. चांभाराकडे त्याने स्वतः बनवलेल्या चपला असत. आता आपण बाजारात गेलो की अनेक देशातल्या चपलांची झगमगती दुकाने आपल्याला भुलवतात. तीच गोष्ट पिशव्यांची, पर्सेसची.

ह्या वस्तूंची रेलचेल वाढली खरी पण हा बदल केवळ बाहेरील नाही. दुसऱ्याचे ते वाईट आणि आपला तो बाब्या म्हणण्याची वृत्ती हळूहळू बदलली. समाजातील उच्च नीच, जाती-जातीतील भेदभाव नष्ट होत आहेत ह्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.

पोटातून हृदयाकडे
माणसाच्या सुखाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. म्हणून आपण आपल्या खाण्याच्या पदार्थांकडे वळू या. खाण्याच्या पदार्थात विविधता यायला सुरुवात आपल्या राज्याराज्यातील पदार्थांच्या देवाण-घेवाणीने झाली असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. माणसे कामाच्या निमित्ताने दूर जावू लागली पण ते आपले पदार्थ घेऊन! मग मुंबईत ढोकला फाफडा लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. तीच गोष्ट बाकीच्या राज्यांची. आता हे चित्र देशादेशाच्या सीमा ओलांडून गेले आहे. म्हणून तर आज आपल्या ताटात चायनीज, इटालियन पदार्थ हजेरी लावून बसलेले दिसतात.

मुलींच्या / स्त्रियांच्या मानसिकतेत बदल
शिक्षणाच्या / नोकरीच्या बाबतीत “सातच्या आत घरात” ही संकल्पना मागे पडत आहे. आजची स्त्री शिकण्यासाठी, नोकरीसाठी देशाच्या सीमा ओलांडून प्रवास करते आहे. त्यामुळे तिची दृष्टी बदलते आहे. विवाहबंधने केवळ लादलेली न राहता मुक्त होत आहेत. आज माझी मुलगी अमेरिकेसारख्या दूर असलेल्या देशात शिक्षणासाठी एकटी राहत आहे. माझ्याच काय जगभरात अनेक घरात कुटुंबातील एक तरी व्यक्ती परदेशी राहत असलेली आढळून येते.

मात्र कधीकधी हे चित्र भिववणारे वाटते. मोठ्या शहरातून फक्त आई वडील घरात उरले आहेत. वृद्ध घरात राहतात आणि तरुण पिढी शिक्षण किवा नोकरीनिमित्त परदेशी राहते. त्यांनी तिथून परत यावे, मायदेशाची हाक ऐकावी असे मला वाटते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. नवीन कक्षा जोडताना आपली नाळ तोडून चालणार नाही. नवीन चालीरीती शिकताना आपल्या संस्कृतीला विसरून चालणार नाही.

ताई, अक्का, मावशी, आंटी अनेक मिळतील. म्हणून प्रत्यक्ष आईला विसरून कसे चालेल?

- मोहना कारखानीस

1 टिप्पणी:

  1. खूप मोठा विषय , शब्द मर्यादेमुळे घाईघाईत उरकल्यासारखा वाटतो. "वस्तूंची रेलचेल / दर्शनी बदल," "मुलींच्या / स्त्रियांच्या मानसिकतेत बदल" ह्या विषयी आणखी कंगोरे उलगडता येतील कां?

    उत्तर द्याहटवा