स्नेहालय

शाळा झाल्यावर पुढे काय? डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलाकार की व्यावसायिक? या यादीत "सामाजिक कार्यकर्ता" हा पर्याय आला तर? आणि तुमचा मुलगा / मुलगी त्यासाठी अडून बसला / बसली तर?! अहमदनगरमधल्या "स्नेहालय" या संस्थेचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी यांनी हेच केलं. "ज्या गोष्टींनी मला अस्वस्थ केलं होतं, त्यांच्यावर काम करण्यासाठी आधी स्वतःच्या पायांवर उभं राहून, स्थिरस्थावर होऊन मग काम करणं मला पटत नव्हतं." त्यामुळे त्यांना बेचैन करणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर काम करणं हेच त्यांनी करिअर म्हणून निवडलं. त्यांच्या आई - वडिलांनी त्यांना चक्क पाठिंबा दिला! 

गिरीशजी शाळा सुटल्यावर गणितांच्या शिकवणीला जायचे. वेळेत पोहोचण्यासाठी चित्रागल्ली या "लालबत्ती"च्या रस्त्यानं शिकवणीला जायचे. तेव्हा आपल्याच वयाच्या मुली धंद्याला उभ्या बघून त्यांना त्रास व्हायचा. एकदा एका मित्राबरोबर ते त्याच्या घरी गेले - तो आपल्याला घरी नेत नाही म्हणून, त्याच्या मागे लागून. आणि त्याची सोळा वर्षांची बहीण, चाळीशी ओलांडलेली आई, आणि सत्तरी ओलांडलेली आज्जी - या सगळ्या वेश्याव्यवसायात पाहून त्यांच्या मनाला बोचणी लागून राहिली. ते कॉलेजमध्ये गेले, तरुणांच्या संघटनांतून काम करत राहिले. पण वेश्यांसाठी काही करण्याचा विचार मूळ धरून राहिला आणि मग शिक्षण संपल्यावर त्यांनी त्याच क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतलं. 

सुरुवात कशी करावी? संस्थेसाठी इमारत बांधावी का? की आधी देणग्या गोळा कराव्यात? या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांच्या मार्गदर्शकांनी दिलेला सल्ला त्यांना कार्याभिमुख करता झाला. "आधी काम, मग बाकीचं." मग त्यांनी त्यांच्या परीनं जो काही खारीचा वाटा उचलणं शक्य होतं तिथूनच सुरुवात केली - ज्या कुणाला मदत लागेल, त्यांना मदत करून. एखाद्या वेश्येला किंवा तिच्या मुलाला छत हवं असेल तर ते त्यांना सरळ आपल्या घरी आणत. त्यांनी १९८८ च्या दरम्यान ह्या कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर ३-४ वर्षातच एका एचआयव्ही पॉजिटीव मुलाला घरी आणून ठेवलं. जेव्हा एचआयव्हीच्या भीतीनं आपले धाबे दणाणलेले होते तेव्हा हा गृहस्थ त्याला नाहक बळी पडलेल्या मुलांना आपल्या घरात थारा देत होता. आणि त्यांच्या आईवडिलांनी त्याकरता त्यांना घराबाहेर काढलं नाही! 

अशा प्रकारचा जगावेगळा निर्णय घेताना सामाजिक दबाव नव्हता का, असं विचारलं, तेव्हा ते म्हणाले, "आपण कधीच सगळ्यांना खूश करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. आपल्या आतला आवाज ऐकावा आणि त्याप्रमाणे करावं. शिवाय ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाचाही भाग असतो. मी मला जे वाटतं ते करणारा माणूस आहे. थोडं नुकसान होतं, पण बव्हंशी भलंच होतं. आपण सगळे काही अंशी पापभीरू लोक. देवावर विश्वास ठेवणारे. त्यामुळे आपल्या मनात एखादा विचार आला की तो देवानंच सुचवलाय असं समजावं आणि पुढे चालावं." 

वेश्यांच्या उन्नतीकरता काम करताना गिरीशजींना त्यांच्या प्रश्नाबद्दल खोलवर विचार करावा लागला, नवी कार्यपद्धती शोधावी लागली. "या क्षेत्रात काम करताना तीन धोके असतात. वेश्यागृहाच्या मालकिणीचा रोष, तिच्या बायका आपण सोडवून नेणार की काय म्हणून. दलालांचा रोष, त्यांच्या मिळकतीवर गदा येणार म्हणून. आणि पोलिसांचा रोष, हप्ता जाणार म्हणून. संघर्षाची भूमिका घेऊन काही साध्य होणार नसतं. त्यामुळे आम्ही दमानं घ्यायचं असं ठरवलं. सुरुवातीला या प्रश्नाकडे मी माझ्या चष्म्यातून बघत होतो. वेश्यांचे प्रश्न म्हणजे मारहाण टाळणे, पोलिसांकडून मदत, आणि घरच्यांनी पुन्हा स्वीकारणं असं वाटायचं. पण त्याला त्या दाद देईनात; 'आम्हांला आहे तसं राहू द्या' म्हणायच्या. 'मग तुम्हांला नेमकी काय मदत हवी' असं त्यांनाच विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की 'आमच्या मुलांसाठी काही करा. त्यांच्या वाट्याला आमचं आयुष्य येऊ नये एवढंच आम्हांला पाहिजे आहे.' मग आम्ही त्यांच्या मुलांसाठी संस्कारवर्ग भरवायला लागलो; अभ्यासिका, नाईट केअर चालवायला लागलो. आणि यातून हळूहळू स्नेहालयची सुरुवात झाली." 



"मग आम्ही वेश्यांनाच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्युक्त करत राहिलो आणि त्या पुढे आल्या तेव्हा त्यांची साथ दिली," गिरीशजी म्हणाले. वेश्यागृहात वेश्यांची एकजूट करणे, त्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव करून देणे, त्यांच्या गरजांबाबत मालकिणीवर, दलालावर दबाव आणण्यात त्यांना मदत करणे अशा स्वरुपाची भूमिका स्नेहालयने घेतली. अल्पवयीन मुली या व्यवसायात आणल्या जाऊ नयेत म्हणून त्या मुली तिशीच्या वेश्यांकरता कशा धंदा मारणाऱ्या ठरतात याची जाणीव करून देऊन त्यांनाच याविरुद्ध आवाज उठवायला लावला. "याबरोबरच, आम्ही त्यांना स्नेहालयच्या विविध उपक्रमांमध्ये सभासद, विश्वस्त करून घेतलं; त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला. त्या नुसत्या गरजू म्हणून हात पसरत नाहीत. मुंबईतल्या बॉम्बस्फोटांपासून चेन्नईतल्या पुरापर्यंत त्या सगळीकडे पैशानी आणि कधी कधी तर स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. " 

"कुणाचा चाकू भोसकून खून झाला तर त्याची बातमी होते पण आपल्याकडे अडीच कोटी लोक एचआयव्हीनी मेले याच्याकडे कोणी लक्ष देत नाही," गिरीशजींनी सांगितलं. लक्ष देणं दूरच, मुद्दामहून दुर्लक्षच केलं जातं हा रोग आणि त्याच्याशी संबंधित सामाजिक अवघडलेपणामुळे. त्यामुळे, १९८९ मध्ये स्नेहालयनं "सन्मानानं मरण" अशी मोहीम हाती घेतली. एचआयव्ही पॉजिटीव रुग्णांना शेवटचे दिवस उकिरड्यावर घालवावे लागू नयेत, हा त्या चळवळीचा हेतू होता. काही रस्त्याकडेच्या झोपड्या आणि एका दुचाकीला जोडलेला गाडा एवढ्या साधनांनिशी त्यांनी रुग्णांना वेदनाशामक सेवा पुरवायला सुरुवात केली. अशी छोटी सुरुवात झालेली ही संस्था आता 'स्नेह निर्माण' नावाचं पुनर्वसन केंद्र, 'स्नेह संवेदना' नावाची शैक्षणिक संस्था, 'स्नेह संस्कार' ही वैद्यकीय संस्था, जनजागरणासाठी 'स्नेह जागृती' असे विविध उपक्रम चालवते. स्नेहालयच्या उपक्रमांची माहितीhttp://www.snehalaya.org/#!what-we-do/c1je3 इथे उपलब्ध आहे. 


ऋतुगंधच्या या अंकाची केंद्रकल्पना "स्वयमेव मृगेन्द्रता" आहे आणि म्हणून तुमची मुलाखत घ्यायची होती, हे सांगितल्यावर गिरीशजी खोट्या विनयाचा आव न आणता म्हणाले, "एक माणूस त्याचा प्रवास सुरु करू शकतो पण इतर त्याच्याबरोबर उभे राहिले नाहीत तर तो पुढे नेणं कठीण असतं. स्नेहालयच्या सगळ्या संघामुळेच हे काम साध्य झालंय. वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे काम करतात. त्यांची बलस्थानं जाणून घेऊन त्यांचा वापर करणे आणि त्यांच्या अक्षम बाबींमध्ये त्यांना न ढकलणे, या भूमिकेमुळे सगळ्यांकडून हातभार मिळवणं शक्य झालं." गिरीशजींची मनुष्यबळ व्यवस्थापनाची दृष्टीही यातून दिसते. 



"स्नेहालयच्या कामानं आम्हांला खूप शिकवलं. आम्हांला काहीतरी भरीव करण्याची संधी दिली. आपण एक अर्थपूर्ण आयुष्य जगतो आहोत याचं समाधान दिलं," असं म्हणताना गिरीशजी 'युवा निर्माण' या प्रकल्पाबद्दल सांगायला लागले. "अनेक तरुण लोक आहेत जे काहीतरी अर्थपूर्ण करण्याच्या शोधात असतात. त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, प्रेरणा दिली पहिजे. आम्ही तरुण मुलांच्या कार्यशाळा घेतो. अशा प्रकारच्या कार्यासाठी आयुष्य कसं असलं पाहिजे याची जाणीव करून देतो, त्यांनी काय तयारी केली पाहिजे हे सांगतो. त्याचबरोबर, कार्यशाळेच्या शेवटी त्यांना एक संकल्पही करायला सांगतो - "मी नाही तर कोण? आणि आत्ता नाही तर केव्हा" आणि त्यांना छोटीशी सुरुवात करायला उद्युक्त करतो." स्नेहालयच्या या कार्यशाळेतून बाहेर पडलेल्या कैक तरुणांनी वेगवेगळे प्रकल्प सुरु केले आहेत. हे तरुण काही सुखवस्तू घरातले नाहीत. पण त्यांनी त्यांच्या गरजा कमी ठेवून आपलं आयुष्य अर्थपूर्ण करण्याची धडपड चालवली आहे. अनंत झेंडे नावाचा एक शाळेतील शिपाई मुलगा आपल्या खर्चानी श्रीगोंदे, जिल्हा अहमदनगर येथे ५० फासेपारधी मुलांना सांभाळतो. संतोष पवार नावाचा एक बदली ड्रायवर ३० एचआयव्ही पॉजिटीव मुलांची खांडगाव, तालुका संगमनेर येथे काळजी घेतो. अजित कुलकर्णी नावाच्या तरुणानं विकलांग मुलांसाठी 'अनामप्रेम' नावाची प्रशिक्षण शाळा उभारली आहे. अशा रीतीनं स्नेहालय वेगवेगळ्या रुपात भराभर पसरतं आहे," गिरीशजी म्हणाले. स्नेहालयाचे विविध १७ सेवा प्रकल्प तसेच स्नेहालयप्रेरीत इतर सेवाप्रकल्प देशातील सर्व लाभार्थींसाठी विनामूल्य आणि अहोरात्र खुले आहेत. १३० कोटींच्या भारत देशात ६५ कोटी युवक - युवती आहेत. त्यांना समाजातील वंचितांच्या उद्धारासाठी प्रेरित केले, तरच आपला देश समर्थ, सुखी आणि हिंसामुक्त होईल, अशी स्नेहालयची भावधारा आहे. 


ह्या कामादरम्यान गिरीशजींना आणखी एक गोष्ट जाणवली ती ही की आपल्याकडे खूप चांगले कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही आणि त्याचं मुख्य कारण आपण नागरिक आहोत. आपण याकरता पुढे येत नाही, सरकारवर दबाव आणत नाही. आपल्याला चांगल्या गोष्टी हव्या असतात पण त्यासाठी आपली भूमिका आपण पार पाडत नाही. आपण स्वयंसेवक व्हायला हवं, साक्षीदार म्हणून पुढे यायला हवं, आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य समाजकार्यासाठी द्यायला हवं. स्नेहालयच्या सदस्यांनी हा वाटा उचलला आणि त्यामुळे हे काम पुढे गेलं. 

स्नेहालयला ऋतुगंधचे वाचक कशा प्रकारे साहाय्य करू शकतील असं विचारलं तेव्हा ते म्हणाले, "आम्हांला माणसं जोडायला आवडतात. तुम्ही लोक भारतात याल, तेव्हा प्रकल्पाला नक्की भेट द्या. तुमच्या मुलांना प्रकल्पावर काम करण्यासाठी पाठवा; त्यांना निश्चितच वेगळी जीवनदृष्टी मिळेल, त्यांचं व्यक्तिमत्व घडेल." आणि वेगवेगळ्या प्रकल्पांना पैशाची गरज कायम असतेच. स्नेहालय १८ वर्षं पूर्ण झाल्याने विविध बालगृहामधून बाहेर पडाव्या लागणाऱ्या एड्सग्रस्त युवकांसाठी एक पुनर्वसन संकुल आणि एचआयव्ही पॉजिटीव्ह रुग्णांकरता सुसज्ज "केअरिंग फ्रेंड्स रुग्णालय" उभारते आहे. कुमारीमाता-बलात्कारित महिला-अनौरस बालकांसाठी नव्या 'स्नेहांकुर' प्रकल्पाची उभारणी चालू आहे. त्यासाठी निधी गोळा करणं सुरु आहे. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचा - राहण्याखाण्याचा खर्च भागवण्यासाठीही निधी उभारला जातोय. अशा कुठल्याही उपक्रमाकरता स्नेहालयच्या संकेतस्थळावरून देणगी देत येईल: http://www.snehalaya.org/#!donate/cb6d


गिरीशजी म्हणाले, "आमच्यावर २६ वर्षांपूर्वी टीकाही झाली. 'आमच्या पैशानी तुम्ही मजा मारणाऱ्या वेश्यांना मदत करणार?' असे काहींनी विचारले. बहुतांश वेश्या त्यांच्या बालवयातच जबरदस्तीने किवा फसवून देहव्यापारात आणल्या आणि वापरल्या जातात. यातून बाहेर पडण्याचे मार्ग सहज नाहीत. देहव्यापाराचे संघटित गुन्हेगारीकरण झाले आहे. हे वास्तव ज्यांना उमजत नाही, त्यांच्या प्रतिक्रिया आजही उथळ असतात. प्रत्येकाचा आपला आपला दृष्टीकोन असतो. आम्हांला हे काम महत्त्वाचं वाटतं. या कामाने आमच्या जीवनाला आशयसंपन्नता दिली याचं समाधान आणि याचबरोबर या कामाने आम्हाला घडवलं, एक चांगला माणूस केलं, हीच आमची कमाई."

1 टिप्पणी: