तुझे नि माझे नाते काय?

आजी आजोबा, उद्यानातलं ते बाकडं, त्या दोघांचं आवडतं होतं. दोन उंच बिल्डिंगच्या मधून का होईना पण तिथून सूर्योदय नीट दिसायचा. पहाटे पाचला उठून, आपापल्या घरून हळू हळू चालत चालत, सूर्योदयाच्या पंधरा मिनिटे आधी दोघेही तिथे येऊन पोचायचे. निशब्दपणे सूर्योदय पाहायचे. मग थोड्या शिळोप्याच्या गप्पा. 'नातवांशी स्काईप कॉल झाला का, मराठीत बोलतात का इंग्रजीत, मुलांची पुढची ट्रिप ठरली का', रोज त्याच गप्पा, वरण भातासारख्या. रोज त्याच असूनही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या. 

खरं सांगू का, जे रोज फक्त वरण भात खातात ना, त्यांना वरण भाताची सवय होते पण त्यातली गोडी कळत नाही. त्याला पाठीवर बिर्हाड घेऊन जग हिंडावं लागत. लोकल डेलिकसीच्या नावावर समोर येईल ते - हे काय आहे, हा कोणता प्राणी आहे, असे चोम्बडे प्रश्न न विचारता - खावं लागत. त्या दोघांनीही आयुष्यभर तेच केलं होतं. त्यांनी गल्फ मध्ये तर तिने अमेरिकेत. एका कॉलोनीतच ते लहानाचे मोठे झाले पण वेस ओलांडली त्याच्या नंतर मात्र आगगाडीच्या रुळासारखे. तसे पहिले तर शेजारीच पण भेटायचं म्हणलं तर अनंतापाशी. दोघांचं आयुष्य कसं चाकोरीबद्ध, पाठ्यपुस्तकासारखं. पैकीच्या पैकी मार्क्स, लठ्ठ पगाराची नोकरी, हेवा वाटेल असं स्थळ, सुबक चौकोनी कुटुंब, कुठे बोट ठेवायला जागा नाही. सगळं इतकं सुरळीत होत गेलं की आपलं काही राहून गेलंय, मनाच्या एका कोपऱ्यात काही अनुत्तरित प्रश्न आहेत, काही किनारे नसलेले समुद्र आहेत या सगळ्याकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. 

“तुला आठवतं खूप वर्षांपूर्वी एकदा आपण बालीच्या समुद्र किनाऱ्यावर भेटलो होतो”, त्याने विषय बदलायचा म्हणून काहीतरी विचारलं. वाढणाऱ्या रहदारी कडे पाहत ती म्हणाली, “१७ मे. आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस होता. मी मुलांना खेळवायला बीचवर आणलं होतं. माझा नवरा मसाजला गेला होता. ऑरेंज बर्मुडा मध्ये विदुषकासारखा दिसत होतास.” तिला सगळं काही आठवत होत. विनोद छोटासा होता पण दोघे डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसले. अश्रुंवर काही लिहिलेलं नसतं, ते सुखाचे आहेत की दुःखाचे. आपापल्या इंटर्प्रिटेशन वर असतं. दोघांनाही माहिती होतं की वरवर कितीही हसत असले तरी हे अश्रू आनंदाचे नाहीत. सगळं आयुष्य गेलं होतं चुकीचं काही 'न' वागण्यात का बोलण्यात. पण जे बरोबर होतं ते बोलायचं राहून गेलं होतं, त्याचं काय? तिला अमेरिकेत एम. एस. ला ऍडमिशन मिळाली तेंव्हा तो फुलांचा गुच्छ घेऊन तिला भेटायला गेला होता, ओठावर स्मितहास्य आणि मनात एक प्रश्न घेऊन. पण विचारायला जमलंच नाही. 'ती परत आल्यावर विचारू', असं त्याने ठरवलं पण ती परत आलीच नाही आणि जेंव्हा आली, तेंव्हा आडनाव बदलून. मग त्यानी पण एका मुलीला स्वतःच्या आडनावाची भूल घातली आणि एकमेकांकडे पाठ फिरवून त्या दोघांनीही आपापल्या जोडीदाराचे संसार उत्तमपणे केले. मुला बाळांना मार्गी लावले. आयुष्याच्या संध्याकाळी मात्र होऊ नये ते झाले. सावली सारखे बरोबर असणारे जोडीदार चटका लावून निघून गेले. मग परदेशात मन रमेना म्हणून दोघंही आपापल्या घरी आले, ते ही परत न जाण्यासाठी. 

“मी काय म्हणत होतो,” घसा खाकरत हातातली काठी सावरत तो विचारू लागला, “तू आणि मी इतक्या जवळ जवळ राहतो. ते ही एकटे एकटे. दिवस जाता जात नाही गं. कधी एकदा सकाळ होते आणि सूर्योदय पाहायच्या निमित्याने तू भेटशील असं होऊन जातं गं”. आता काहीतरी महत्वाचे बोलायचे होते म्हणून उगाच इकडे तिकडे बघून म्हणाला, “तू असं का नाही करत, तू माझ्या घरीच राहायला का नाही येत? कायमची."

तिने चमकून त्याच्याकडे पहिले आणि विचारले, “काय बोलतोस? बरा आहेस ना?”

“मुलं काय म्हणतील असंच ना?” तो उद्गारला. 

“Obviously”

"मला ना, 'तू माझ्याशी लग्न करशील का?' असं विचारायचं होतं, तू अमेरिकेला निघाली होतीस तेंव्हा. विचार केला 'तुझे आई-वडील काय म्हणतील' आणि सोडून दिलं. मग बालीला अचानक भेटलीस तेंव्हा 'माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील का?', असं विचारायचं होतं. तुझ्याशी खूप खूप बोलायचं होतं, 'तू खरंच सुखात आहेस ना?', असं विचारायचं होतं. तेंव्हा 'तुझा नवरा काय म्हणेल', असा विचार केला. मग ते ही राहून गेलं. आता मला 'तुझी मुलं काय म्हणतील', असा विचार करायचा नाहीये. तू फक्त चल.”

आता तिच्या गालावर ओघळलेले ते अश्रू, दुखाश्रु ही होते आणि आनंदाश्रू ही !

“मग का नाही विचारलंस? मला पण तेच हवं होतं. पन्नास वर्ष लावलीस एवढा साधा प्रश्न विचारायला.” 

आणि मग सगळे बांध फुटले. त्याने तिला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवला. आयुष्यात पहिल्यांदा. बराच वेळ तसाच गेला. मग तिने स्वतःला सावरले. कोणाचाही हात पाठीवर नसताना स्वतःला सावरायची सवय तिला होतीच, जन्मभराची. आता तर आवडता हात पाठीवर होता. दोघे शांत झाले, तशी ती उठली आणि चालायला लागली. स्वतःच्या घराकडे. 

त्याला तसाच हताश बसलेलं पाहून म्हणाली, “घरी आलं आहे की नाही? आणि पोहे? फक्कड आल्याचा चहा टाक आणि पोह्याची तयारी करून ठेव. आलेच बॅग घेऊन.” 

आयुष्य उलटून गेलं होतं पण खूप काही बोलायचं राहून गेलं होतं. आता उरलेलं आयुष्य होतं, ते फक्त आणि फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी.


- विवेक वैद्य



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा