संपादकीय: माझे जगणे होते गाणे

ऋतुगंधच्या २०१७ च्या समितीकडून सर्व वाचकांचे मन:पूर्वक स्वागत. ह्यावर्षी आम्ही वेध घेणार आहोत आपल्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीचा. अर्थातच, याचे पैलू अनेक आहेत. तर आपला पहिला, ‘वसंत’, अंक 'करमणूक' ह्या पैलूवर केंद्रित आहे. 

करमणूक म्हटलं की मनात येते "मज्जा, धम्माल!" नाही का? सिनेमा बघणे, सहलीला जाणे, चांगलंचुंगलं खाणे... आणि हल्ली, व्हिडिओगेम खेळणे. तर मंडळी, पाहूया २०१७ आपल्यासाठी करमणूकीच्या कोणत्या नवनवीन व्याख्या सादर करतोय. 

जरा सायकलवरून फिरता फिरता बायकोच्या लाडक्या सवतींशी भेट घ्यायला जाऊ. पाहूया तरी, काय म्हणतात त्या. रस्त्यात थोडं ऊन लागायची शक्यता आहे, हां. तरी घाबरू नका. उन्हात फार त्रस्त झालात तर अमृतांजनच्या डबीतले आइसक्रीम खाऊ घालू की. भेटी-गाठी झाल्या, की घरची वाट धरू. क्षीण घालवायला थोडावेळ कुटुंबाबरोबर बसून साध्या सोप्या क्षणातील निखळ मजा घेऊ. दुपारच्या जेवणाला, आईला/बायकोला ताट-वाट्या घ्यायला मदत करूया. दिवस मावळायला आला म्हणजे आजीला जवळ बसवून तिच्या आयपॅडद्वारे संस्कारांची आठवण करून घेऊ… ! आहे की नाही धम्माल!

पण रसिकजनहो, ह्या सगळ्या मजेची तयारी करताना आम्हाला दोन दुःखद बातम्या मिळाल्या. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर व प्रसिद्ध सिनेतारक विनोद खन्ना यांच्या निधनाच्या. संगीत आणि चित्रपट हे करमणूकीचे अविभाज्य अंग आहेत. म्हणूनच ह्या ज्येष्ठ कलावंतांना आम्ही फूल ना फुलाची पाकळी अशी श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

किशोरीताई कालवश होणं म्हणजे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची भैरवीच! किशोरीताईंना संगीताचा जयपूर घराण्याचा वारसा त्यांच्या माई, मोगुबाई कुर्डिकरांकडून, मिळाला. ही एक कठीण जबाबदारी होती पण ती किशोरीताईंनी अगदी उत्तम रीतीने पार पाडली. त्या घराण्याचे वैशिष्ट्य असलेले 'जोड' रागही रसिकांपर्यंत पोहोचवले. आणि तरीही त्यांना घराण्यांची ‘बंधनं’ मंजूर नव्हती. यामुळे त्यांची बरीच टीकाही झाली.

वयाच्या विशीत, किशोरीताईंनी अचानक आपला आवाज गमावला. आयुर्वेदाच्या मदतीने तो परत मिळाला. पुन्हा कठोर साधनेने त्यांनी सूरही परत मिळवले. सुदैव हिंदुस्तानी संगीताचेच! किशोरीताईंना १९८७ साली पद्मभूषण व २००२ साली पद्मविभूषण ह्या पदव्या सन्मानाने देण्यात आल्या. “इतर काही कलावंतांसारखं तुम्हालाही ‘भारत रत्न’ नको का?”, असं एका पत्रकाराने विचारले असता, त्या म्हणाल्या की साक्षात शंकराचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या ‘गानसरस्वती’ ह्या उपाधीतच त्यांना सगळं मिळालं आहे. किशोरीताईंच्या अभिजात स्वराला आम्ही वंदन करतो.

विनोद खन्ना यांनी शेकडो हिंदी चित्रपट गाजवले. १९६८ साली 'मन का मीत' ह्या चित्रपटात खलनायक म्हणून पदार्पण करणाऱ्या खन्ना ह्यांनी नंतर नायक म्हणूनही बरीच प्रसिद्धी कमावली. सिनेसृष्टीत हा अपवादच म्हणावा लागेल. अशा ह्या मुकद्दर का सिकंदरला ही आमची आदरांजली.


सस्नेह,
ऋतुगंध समिती,
महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर
























३ टिप्पण्या:

  1. अभिनंदन ऋतुगंध समिती! अंक जोरदार झाला आहे! आगामी वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  2. ऋतुगंध वसंत - वर्ष ११ अंक १' वाचला. झकास झाला आहे अंक.. तू मराठीत इतके अंक संपादित केलेले पाहून थक्क झालो. या अंकातील बहुतेक लेख, 'किलबिल' सारंच मला मनापासून आवडलं. या अंकाद्वारे सिंगापूरची छोटी सैरच तू घडवलीस. अंकाचं अंतरंग आणि बाह्यरुपही तेवढंच देखणं आहे. राजश्री लेले माझी फेसबुक फ्रेन्ड आहे. तिनं खरं तर सिंगापूरवरचं एक फोटो फिचरच करायला हवं होतं.

    खूपच सुंदर अंक काढला आहेस तू. I'm proud of you.
    - मुकुंद टाकसाळे


    उत्तर द्याहटवा