स्वातंत्र्य - एक सामाजिक कल्पना

भारतात परत आल्यापासून स्वातंत्र्याच्या कल्पनेवर सतत विचार करत राहण्यावाचून पर्याय उरत नाही असं (जुनंच विसरलेलं परत एकदा) लक्षात आलं. रात्री १०:३० वाजता मोठ्या आवाजात क्रिकेट खेळणारी काॅलेजची मुलं असोत, सिग्नल "सगळेच तोडतात" म्हणून तोडणारे महारथी असोत, लिफ्टच्या भिंतींवर कोरून नाव कमावणारे अजरामर असोत, आपण स्वत: आत्ताच झाडलेल्या रस्त्यावर थुंकणारा सफाई कामगार असो किंवा दुसऱ्यांना सक्तीनं संगीत ऐकवणारे सूरमल्ल असोत, स्वातंत्र्य म्हणजे मला जसं हवं तसं वागता येणं का, हा प्रश्न कायम समोर उभा ठाकतो. स्वातंत्र्याच्या व्याख्येला हात घालण्याचा प्रयत्न ह्या ललित लेखात करणं शक्य नाही. त्यामुळे तो हेतू नाही. एक चार दोन मुद्दे स्वत:च्या स्पष्टतेसाठी मांडून बघणे आणि त्यात सहचिंतकांची मदत घेणे एवढंच साध्य आहे.

मला हवं तसं जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य का? वरकरणी त्याचं उत्तर "हो" असं आहे किंवा असायला हवं. एक आयुष्य. ते मी इतर कुणाकरता आणि कुणाच्या सांगण्यानुसार घालवावं की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याची मुभा मला असलीच पाहिजे. पण या ढोबळ "हो" नी फार गल्लत होते. 

मला समाजात राहण्याशिवाय पर्याय आहे का? आहे की! मी उठून जंगलात जाऊन राहू शकतो आणि माझं माझं पाहू शकतो. अर्थात त्या जंगलात राहण्याची अनुमती तिथल्या सरकारनं मला द्यायला हवी! म्हणजे त्यातही स्वातंत्र्य नाहीच पण न पेक्षा बरं. पण मग रूग्णालय लागलं, वाहतूक लागली, किंवा इतर काही लागलं तर? तेवढ्यापुरतं येईन. म्हणजे स्वातंत्र्य नाहीच. 

समजा मी समाजातच राहायचं ठरवलं तर? समाजाची सोय हवी असेल तर त्यानं होणाऱ्या गैरसोयींना स्वीकारायला हवं. एकत्र राहण्यानं सुरक्षितता, संबंध, भौतिक प्रगती हे फायदे मिळतात त्याचबरोबर एकत्र राहताना माझं वागणं तुला, तुझं मला पटणार नाही हे उघड आहे. त्यामुळे काही नियम, संकेत तयार होणार आणि ते पाळायला लागणार. आणि ते स्वातंत्र्याखाली अमान्य करणं गैर. 

पण मग मला हवं तसं राहता येणारच नाही का? यायला हवं पण ते मी इतरांना भौतिकदृष्ट्या (याची व्याख्या करायला हवी) त्रासदायक ठरत नाहीये ना यावर अवलंबून असावं. मला राहणीमान, विचारसरणी आणि ती मांडण्याचं स्वातंत्र्य हवं तेव्हा त्यानं समाजाला भौतिक इजा पोचणार नाही हे गृहीत असतं. आणि हे नियम आणि संकेत बदलत राहणार आणि त्यानुसार मला बदलावं लागणार हे ही ओघानं आलंच. 

आणि समजा सैद्धांतिक भूमिकेतून आपण सार्वभौम स्वातंत्र्य मान्य केलं तरी आपल्याला आपल्या वैचारिक मर्यादांपासून स्वातंत्र्य मिळतं का? वेगवेगळ्या सामाजिक आणि वैयक्तिक भेदाभेदांत रूजलेल्या आपल्या विचारांमधे आपण कायमच अडकलेलो असतो आणि राहू. मग स्वातंत्र्य म्हणजे काय? 

थोडक्यात माझ्या मते स्वातंत्र्य हे सार्वभौम नसतंच. ती एक सामाजिक कल्पना आहे आणि त्याच चौकटीत ती पहाता, वापरता यायला हवी.

- नितीन मोरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा