खाद्यसंस्कृतीचा वैचारीक प्रभाव

खाणे हा सगळ्याच प्राण्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. मनुष्य जरी नुसतं खाण्यासाठी जगत नसला तरी सरासरी दिवसाचे १२० अधिक मिनिटे आपण खाण्याशी संबंधित विचार किंवा काम करण्यात घालवतो. विचार, मग ते कुठले ही असतील- रेस्टाॅरंट चे रिव्ह्यू, रेसिपी चे व्हिडिओ, आज काय बनवायचे - उद्या काय, त्याची तयारी, ग्रोसरी शॉपिंग, खाण्यासाठी वेळ काढणे, काय खाल्लं किंवा काय बनवणार - खाणार यावर चर्चा, वेग-वेगळ्या क्विझीन वर चर्चा, काय खायला पाहिजे, हेल्थी काय, कुठल्या वयात, कुठल्या रोगासाठी एक ना अनेक विचार. यात मी अजून ‘पिणे’ सामील केले नाहीये. असो, तर या खाण्या-पिण्या वर आपण बऱ्यापैकी वेळ घालवतो. मला असं वाटतं की हे सगळे विचार ज्या केंद्रबिंदू भोवती फिरतात तो केंद्रबिंदू म्हणजे खाद्य संस्कृती. 

कधीतरी चेंज म्हणून आपण एका कोरियन किंवा जपानी रेस्टाॅरंट मध्ये जाऊ पण तो एक चेंज असतो. संस्कृतीमध्ये समाविष्ट होईल असा तो अनुभव नसतो. 

आपण जे अन्न बनवतो त्याचे सादरीकरण करतो, त्या अन्नावर आपले संस्कार झालेले असतात आणि जे आपण खातो त्याचे आपल्यावर संस्कार होतात. असे पिढ्यान -पिढ्या संस्कारांची देवाण घेवाण करून जन्म होतो तो खाद्य संस्कृतीचा. ज्या खाद्य संस्कृतीचे संस्कार आपल्याला लहानपणी पडतात तसे आपण बनतो. एक चायनीज आई आपल्या बाळाला चायनीज जेवण बनवून त्याला चायनीज बनवते. एक झुलू आई आपल्या बाळाला झुलू जेवण खाऊ घालून त्याला झुलू बनवते. त्यामुळे संस्कारीत भाषे इतकेच महत्त्वाचे स्थान जेवणाच्या पद्धती आणि स्वयंपाक घराला आहे. एखादी संस्कृती जर उध्वस्त करायची असेल तर तिथल्या भाषे बरोबर खाद्य संस्कृतीवर मारा करणे पुरेसे आहे. जन्मजात आपल्याला संस्कृतीचे काही ज्ञान नसते. आपले मन आजूबाजूच्या वातावरणाची सांगड घालून मनातील विचार पक्के करत जाते. नकळतपणे स्वयंपाक घराने आपल्या मनावर खूप मोठा ठसा उमटवला आहे. ते स्वयंपाक घर बदलले की तो ठसा बदलला आणि संस्कृती बदलली. निरीक्षण म्हणून बघा - भिन्न संस्कृतीत वाढलेल्यांचे लग्न होतं तेव्हा दोन संस्कृती एका स्वयंपाकघरात राहतात आणि एक वेगळीच संस्कृती जन्म घेते.

सण जसे देवघरात -देवळात साजरे होतात त्याच जोमाने किंवा जास्तच स्वयंपाकघरात साजरे होतात. वेळे अनुसार स्वयंपाक घर सुद्धा आता अत्याधुनिक झालय. जणू काही फॅक्टरीच ती; त्यात भर म्हणून रेडी टू ईट, फास्ट टू कुक पर्याय. हल्ली स्वयंपाकघर कसे सुसज्य आणि अतिशय कार्यक्षम. वेळो वेळी अपग्रेड करणे सुद्धा अगदी मस्ट आहे. अन्न हे जर पूर्णब्रम्ह असेल तर ते जिथे शिजवले जाते ते देऊळच की. पण या देवळाची जेवण बनवणारी फॅक्टरी कधी झाली काय माहित. जेवण बनवणे म्हणजे एक नकोसं असलेलं काम आणि ते कधी एकदा पटकन उरकून बाकीची ‘महत्त्वाची’ कामे करता येतील हेच आपले ध्येय.

आपण अन्न, स्वयंपाक, जेवण, हे सगळं ग्रांटेड घेतोय. काहीच नाही तर टेक-आऊट नाही तर २४ तास डिलिव्हरी आहेच. एकदा का या शरीराला चालवण्यासाठी इंधन ओतलं किंवा बॅटरी चार्ज झाली की झालं, एवढेच ते काम अन्नाचे. पण आता ह्या बदललेल्या खाद्यसंस्कृतीचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. अमेरिकन /मॉडर्न खाद्यसंस्कृती (food-habit-lifestyle म्हणा) आणि वाढते रोग ह्यावर पुन्हा केव्हा तरी. युरोप मध्ये मात्र लोकांनी अजून तिथल्या पद्धती जपल्या आहेत.

तुम्ही कुठल्या युरोपीयन रेस्टाॅरंट मध्ये गेलात की स्टार्टर्स, मेन कोर्सेस आणि डेजर्ट अशी जेवणाची एक लिनिअर पद्धत. सगळी आधीच ऑर्डर द्यायची. भूक असेल त्यानुसार मेन कोर्स सिलेक्ट करतो असं मी म्हटलं तर त्या बाईला विचित्र वाटलं. असं कसं मी सारखी सारखी ऑर्डर घायला येऊ? युरोप मध्ये घरी सुद्धा अशाच लिनिअर पद्धतीने खल्ले जाते. एका वेळेस पानात एकच जिन्नस, तो संपला की मग दुसरा. एका वेळेस त्या डिश चा पूर्णपणे आस्वाद घ्यायचा मगच दुसरी डिश. अशा जेवणाची पद्धत लिनिअर जरी असली तरी आधी काय खायचं आणि नंतर काय ह्यात वेगवेगळ्या राज्यात फरक आहे. युरोपच्या काही भागात आधी मेन कोर्स आणि मग साईड दिशेस घेतात. मीट (मांस) खाऊन झाल्यावर सॅलड आणि मग डेजर्ट असं बऱ्याच भागात प्रचलित आहे. 

अशा कोर्स पद्धतीचे चायनीज वेडिंग डिनर आपण अनुभवलं असेलच. आठ, दहा, कधी तरी तर बारा कोर्स चे जेवण! कोणती डिश किती खायची असा प्रश्न मला नेहमी पडतो. आता समोर जी डिश आहे ती ठीक आहे, आवडली पण जास्त खाल्ली तर नंतर कितीही चांगला पदार्थ असेल तरी खाता येणार नाही. मेनू असतो समोर पण पोटात काटेकोरपणे आठ दहा कोर्स बसवायचे म्हणजे जबरदस्त प्लॅनिंग हवे. कुठली डिश कधी किती खायची हे आधीच ठरवायला हवे. अगदी एखाद्या प्रोटोकॉल सारखे. जरा अंदाज चुकला तर चुकीला माफी नाही. अशा लिनिअर जेवणाच्या पद्धतीत खाणाऱ्याला काहीच स्वातंत्र्य नाही. ज्या क्रमाने एक-एक डिश समोर येते ती त्याच क्रमाने स्वाहा. कधी तरी मला हतबल झाल्यासारखे वाटते. सगळा कंट्रोल जेवण बनवणाऱ्या आणि वाढणाऱ्याच्या हातात. असे असले तरी प्रत्येक डिशचा आस्वाद घेऊन आपण आपल्या अन्नदात्याला सारखी दाद देणे आवश्यक असते. मी दाद दिली नाही तर त्यांना वाटलं की मला जेवण आवडलं नाही. प्रत्तेक कोर्स ला तो म्हणणार बॉन-अपेतीत आणि मी चव घेतल्यावर दाद देणे ही औपचारिकता. ज्या पद्धतीने आपण खातो त्याचा आपल्या विचारांवर फरक पडतो. अशा संस्कृतीत लोकं प्रोटोकॉल पाळणारी असावीत. उगीच जास्त प्रश्न पडत नाहीत. जे आहे तसं आहे. पण जरा काही प्रोटोकॉल चुकला की गांगरून जात असतील. मघाशी म्हटल्या प्रमाणे मी मेन कोर्स नंतर भूक असेल तसं ऑर्डर करतो म्हटलं तर ती म्हणाली सगळे कोर्स आत्ताच ऑर्डर करा, बनवायला वेळ लागतो आणि मी किती वेळा ऑर्डर घायची? खाणाऱ्याला काहीही कस्टमाइझ (सानुकूलित) करायची अजिबात संधी नाही.

इथले किचन आणि शेफ सुद्धा कसे पद्धतशीर. बनवताना अंदाजे काहीच टाकत नाहीत, सगळं कसं मोजून मापून. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्नाची चव बघत नाही. असं जर इटालियन शेफला सांगितलं तर, नोकरी सोडेल ना तो ! प्रत्येक स्टेप ला चव बघितली नाही तर पुढची स्टेप करताच येणार नाही त्याला. चव न बघता जेवण बनवणे एक वेगळेच चॅलेंज नाही का? युरोपमध्ये एखादा शेफ बदलला तरी त्या रेस्टाॅरंट मधली चव खूप बदलत नाही कारण त्या शेफ चा protege अगदी तसच बनवायला शिकतो. भारतातल्या स्वयंपाकघरात तसं नाही, ती त्या घरच्या बाईची खाजगी लॅबोरेटरी. सगळं अंदाजाने बनवल्यामुळे, ती गेली की तिच्या हातची चव सुद्धा जाते. तिचा स्वतःचा प्रोटोकॉल असतो डोक्यात पण तो कोणाला सांगून समजत नाही. तिच्या बरोबर जर मुलगी किंवा सून उभी राहून शिकली तर शक्यता आहे. इथे डिश आणि शेफचे वेगळे वेगळे अस्तित्व नाही. शेफ गेला की ती डिश सुद्धा गेली. फार क्वचित एखादा शागीर्द ही कला आपल्या गुरु-आचाऱ्या कडून शिकतो, कठीण आहे कारण मास्टर-शेफ सगळं अंदाजाने अनुभवाने करतात. मग तो मिसळण्याचा डबा, सगळी क्रियेटिव्हिटी त्या मिसळणाच्या डब्यात बंद. प्रत्येकाच्या हातात हा डबा वेगळी जादू करतो. आता ह्या मिसळण्याच्या डब्याचे महत्त्व सुद्धा कमी होतंय कारण मसाले विकत मिळायला लागल्या पासून, घरी बनवणे बंद झाले. त्यातील ट्रेड सीक्रेट काहीच राहिले नाही. बऱ्याच वेळा मला सगळीकडे एकसारखी चव लागते. असो. 

आता बघूया आपण भारतीयांनी जो ‘थाळी’ नावाचा अविष्कार केलाय त्या कडे. केळीच्या पानावर किंवा तांब्या/स्टील च्या पात्रात बनवलेले सगळे पदार्थ थोडे थोडे वाढून खाणाऱ्यासमोर ठेवले जातात. मग ज्याला जसं हवे तसे, हवे तेवढे, जे आवडेल ते खायचे. बरं खाणारा हवे तसे कस्टमाइझ करून जेऊ शकतो. भाता बरोबर भाजी, कढी, आमटी, ताक, लोणचं, तूप-मीठ… अहो, किती ते पर्याय. बघा शंभर लोकांसमोर एकाच प्रकारची थाळी ठेवली, जरी प्रत्येक थाळीत तेच पदार्थ असतील तरी प्रत्येक जण वेगळी चव घेतो कारण इतके परम्युटेशन-कॉम्बिनेशन शक्य आहेत. ह्या लेव्हल चे कस्टमाईजेशन कुठेच बघायला मिळत नाही. खाणारा तृप्त होणारच. मल्टी-कोर्स जेवण जर लिनिअर पद्धत असेल तर थाळी आहे सायक्लिकल पद्धत. भारतात तसे सगळेच सायक्लिकल जन्म- मृत्यू, पंचांग, आत्मा ह्या सगळ्या कन्सेप्ट सायक्लिकल पण पश्चिमात तसे नाही, तिथे सगळे लिनिअर. म्हणून तर Alexander जेव्हा भारतात आला तेव्हा त्याला कल्चर शॉक बसला. त्याच्या गुरु ने म्हणजे ऍरिस्टोटल ने त्याला शिकवले होते की एकच जन्म आहे, या जन्मात तुला काय जिंकता येईल ते जिंक. म्हणून तो जग जिंकायला निघाला. आणि भारतात ह्या जन्मा शेवटी मृत्यू, मग पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, म्हणून जग जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे महत्त्वाचे. 

-विशाल पेंढारकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा