तुम्हीच तुमचे आयर्नमॅन - मिलिंद सोमण, एक मुलाखत

सुपर मॉडेल म्हणून जागतिक कीर्ती मिळवणारे कदाचित पहिले भारतीय म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण ते फक्त एक देखणा चेहरा नाहीत. ते वयाच्या नवव्या वर्षापासून राष्ट्रीय पातळीवरचे जलतरणपटू होते. तसेच लहान वयात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे भारताचे प्रतिनिधित्व केले. २००९ साली आपली पहिली फुल मॅरेथॉन धावल्यानंतर ते पर्यावरण-जागृतीसाठी धावू लागले. २४ तासात ६० कि.मी. अशी सुरूवात करत २०११ साली ते अहमदाबाद ते मुंबई दोन आठवड्यात धावले. मग २०१२ साली ते दिल्ली ते मुंबई हे १५०० कि.मी. चे अंतर ३० दिवसात धावले. यासाठी लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मधे त्यांची नोंद आहे.

मग पन्नाशी साजरी करायला त्यांनी झ्यूरिक ट्रायएथलॉन पूर्ण करून आयर्नमॅनचा मान मिळवला. तसेच, खास स्त्रियांसाठी एक मॅरेथॉन सुरू केली.

अशा तर्हेने ते फिटनेसची परिभाषाच बदलत आहेत. मराठीच नाही तर भारतीय फिटनेसचं तेजस्वी प्रतीक म्हणता येईल अशा मिलिंद सोमण ह्यांची केशव पाटणकर ह्यांनी घेतलेली मुलाखत.

प्र: आपल्या फिटनेसच्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडसं सांगा

उ: फिट म्हणजे सकारात्मकपणे जगणे. वजनं उचलणे किंवा पळणे नाही. आपल्या भोवती सकारात्मकता पसरवू शकणे म्हणजे फिट. सर्वप्रथम मनाला शिस्त लावणं गरजेचं आहे. बाकी सर्व हळू हळू जमू लागतं.

मन हे हळवं किंवा दुर्बळ असतं. शरीर कणखर असतं. शरीरात उत्पन्न होणाऱ्या संवेदना मनात वाढतात व मन आपल्याला भुलवतं. 'आपल्याला नाही बुवा धावायला जमणार'; 'मरणाची भूक लागली आहे'... अपायकारक गोष्टींची लालसा सुद्धा मनातूनच निर्माण होते. पण ह्यावर ताबा मिळवला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शरीर करून दाखवतं. आपल्या शरीराला कायकाय शक्य आहे ह्याची आपल्याला कल्पनाही नसते.

तुम्ही ठरवाल त्यासाठी फिट होऊ शकाल. मग ते मॅरेथॉन धावणं असो वा आठ-दहा तास ऑफिसात काम. पण सर्वप्रथम विचार सकारात्मक हवे. त्याबरोबर लहान-मोठ्या गोष्टीत योग्य निर्णय होऊ लागले की एक समृद्ध सशक्त जीवनाची सुरूवात होते.

प्र: प्रसिद्धीची लाट ओसरू लागली की अनेक तारकांना 'सामान्य' जीवनाला सामोरं नाही जाता येत, मग ह्यातून तुम्ही स्वतःला कसं घडवलतं ?

उ: मी असं मानतो की मी समाजापेक्षा जरा जास्त गतीने विकसित होत गेलो, घडत गेलो. समाज हा त्यातील एकत्रित विचारांनी, मान्यतांनी घडत असतो. वाढत्या जागतिकीकरणाने समाज अधिक जागृक, अधिक सूज्ञ होऊ लागला. हे बदल प्रसारमाध्यमेही टिपू लागली हळू हळू. यादरम्यानच लोक अचानक माझ्या फिटनेसबद्दल बोलू लागले. पण मी कायमच फिट होतो. अनेकांना माहीत नाही की मी वयाच्या नवव्या वर्षापासून राष्ट्रीय दर्जाचा जलतरणपटू होतो. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे मी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मॅरेथॉन धावणं मी १४ वर्षांपूर्वी सुरू केलं. म्हणून मी स्वत:ला 'परत घडवलं' असं म्हणणार नाही.

मन कौर यांच्या उदाहरणातून पण दिसतं की प्रसार माध्यमे बदलत्या काळाचा कसा वेध घेत आहेत. कौर ह्या पंजाबच्या. त्यांनी वयाच्या ९३व्या वर्षी पळायला सुरूवात केली आणि हल्लीच, वय वर्षे १०१ असताना, त्या न्यूझीलॅंड मधील वर्ल्ड मास्टर्स २०० मीटरची शर्यत जिंकल्या! इतकी वर्षे त्या सराव करत आहेत पण आपल्या वृत्त वाहिन्यांना त्या दिसल्या नव्हत्या. परदेशात त्यांची ही मोठी बातमी झाल्यावर आपण भारतवासी एकदम जागे झालो.

प्र: लोकं मॅरेथॉन धावताना किंवा टेनिस खेळताना एकदम कोसळतात व हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावतात यावर तुमचं काय मत आहे?

उ: संतुलित व्यायाम कुणाचाही जीव घेऊ शकत नाही. तुमच्या व्यायामाला संयम हवा. एक टोकाचं उदाहरण घेउया. तुमच्या हृदयात जर ८०% ब्लॉकेज असेल तर मॅरेथॉन वगैरेचा प्रयत्न करूच नये. आधी आपल्या तब्येतीस जे त्रास आहेत ते दूर करावेत आणि मग आपलं वय, परिस्थिती ई. प्रमाणे व्यायामाला सुरूवात करावी.

माझी आई ७८ वर्षांची आहे. तरीही दरवर्षी ऑक्सफॅम आयोजित १००-कि.मी. ची चाल पूर्ण करते. फौजा सिंग यांचं उदाहरण बघा; १०० वर्षे वय असूनही मॅरेथॉन धावतात.

आणखी एक विलक्षण उदाहरण सांगावसं वाटतं. शिवाजी पार्क मैदानात एक गृहस्थ मल्लखांबाचा सराव करत होते. विलक्षण हे की त्यांच वय ५९ होतं व त्यांना स्ट्रोक व अर्धांगवायुचा झटका बसला होता. पण आजाराचा समूळ नाश करायची तीव्र इच्छा होती. सलग तीन महिने ते सराव करत होते व आपलं लक्ष्य साधल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत होते.

रोज अनेकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. पण हे रातोरात होत नसतं. कॅन्सर सुद्धा एका दिवसात होत नसतो. वर्षानुवर्षे अवलंबलेल्या चुकीच्या पद्धीतींमुळे असे मोठे आजार जडतात. मग कारणीभूत चुकीचा आहार असेल, चुकीचा व्यायाम असेल किंवा अगदी चुकीचे विचारसुद्धा! मोठे आजार ज्यांना जडतात त्या व्यक्ती समतोल, सुदृढ आयुष्य जगत नाहीत. आणि नकारात्मक विचार असतील तर ते सकस आहार व नियमित व्यायामाला पुरून उरतात.

हिंदूधर्मात 'कर्म' म्हणतात ते हेच. नकारात्मक आचार-विचार, अयोग्य खाणं-पिणं ह्याचे दुष्परिणाम साचत जातात व एके दिवशी आपल्याला वेठीस धरतात. सुविचार, सूज्ञ आचार हेसुद्धा साचतात व आपलं जीवन आनंददायी करतात. सकारात्मक आचार-विचारांची स्वत:ला शिस्त लावा.

प्र: ताण किंवा स्ट्रेसला कसं तोंड द्यावं? एका १८-वर्षीय तरूणास तुम्ही काय सल्ला द्याल व एका ५८-वर्षीयाला काय?

उ: स्ट्रेस म्हणजे काय? एक परिस्थितीच. पण त्या परिस्थितीला तोंड द्यायला आपण सक्षम नसलो, जर आपण ती परिस्थितीच नाकारत राहिलो तर त्यातून निर्माण होतो स्ट्रेस. अपयशामुळेच नाही तर अनेकांना यशानेही ताण जाणवतो. आपल्या हाती असतं एखाद्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ते.

१८ वर्षांचे असताना आपल्याला शारीरिक ताण सोसवतो पण मानसिक नाही. वयोमानाने, अनुभवाने विचार प्रगल्भ होत गेले की मानसिक ताण सोसायची क्षमता वाढते पण शरीराची ताकद कमी होऊ लागते.

प्र: तुमचं धावणं कस काय सुरू झालं?

उ: जोवर मी मॅरेथॉन धावत नव्हतो तोवर मला धावणं फारसं आवडत नव्हतं. पण मॅरेथॉन करायची इच्छा कायम होती. तेव्हाही मी ४-५ कि.मी. सहज धावायचो. मग एके दिवशी, १४ वर्षांपूर्वी, एका हाफ मॅरेथॉनसाठी नाव नोंदवलं. अनेकांनी सांगितलं की हे काही सोपं नाही, नसत्या व्याधी लावून घेशील वगैरे. पण मी सराव चालू केला. अगोदर ट्रेडमीलवर आणि मग रस्त्यावर. ५, मग ७ मग हळूहळू १० कि.मी. करत, मॅरेथॉनच्या अगोदर १५ कि.मि. सलग धावता येईल असा सराव केला. मॅरेथॉन अपेक्षेपेक्षा सोपी वाटली! जणू साक्षात्कार की आपण २१ कि.मी. धावू शकतो! मला चटकच लागली धावण्याची.

मला आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते. आपण काय करू शकतो याचा शोध तिशी, चाळिशीनंतरच घ्यायला लागतो. लहान असताना आपलं परीक्षण सारख चालूच असतं: पाठांतराचं, मैदानी खेळ कौशल्याचं किंवा हस्तलेखनाचं. आणि हे सगळं आपल्याला फार आवडत नसतं. आपण जमेल तसं या गोष्टी टाळत राहतो. कालांतरानेच आपल्याला जाणवतं की जर आपला विकास व्हायचा असेल तर आपल्या सीमा आपणच तपासायला हव्या.

प्र: हल्ली 'सप्लीमेन्ट्स'ची फार चर्चा असते; म्हणजे प्रोटीन पावडर, एनर्जी जेल वगैरे. तुमचं यावर काय मत आहे?

उ: मला या सगळ्याची गरज वाटत नाही. मला वाटतं आपल्या शरीरात परिस्थितीशी जुळवून घ्यायची विलक्षण क्षमता असते. गरज असते सरावाची, तयारीची. उदाहर्णार्थ मी २१ कि.मी. पाण्याशिवाय धावू शकतो. म्हणजेच शिस्तबद्ध सराव केला की कठीण परिस्थितीशी तोंड द्यायला आपले शरीर तयार होते.

यात काही विचित्र उदाहरणं पण आहेत. अनेक ताकदीचे खेळपटू कोका कोला सारख्या हानिकारक पेयाचे चाहते आहेत. त्या पेयातील साखर व कॅफीन हे त्यामागचे कारण आहे. मला गम्मतच वाटते. मी स्वत: असले कृत्रीम व हानिकारक पदार्थ टाळतो. मॅरेथॉन धावणं हे माझ्यासाठी रेकॉर्ड बनवायचं नाही तर माझी तब्येत ठणठणीत व मन तल्लक ठेवायचं साधन आहे.

प्र: मग आयर्नमॅनमधे जेल्स न घेता तुम्ही टिकलात कसे?

उ: घरगुती रागीचं सत्व व गूळ. बस्स.

प्र: ह्या मॅरेथॉन, ट्रायएथलॉन  स्पर्धा जरा अमानवी नाही वाटत का तुम्हाला?

उ: अजिबात नाही. किंबहुना सरासरी फिटनेसवर, म्हणजे सामान्यांचा जो फिटनेस असू शकतो, अशा पातळीवरच ह्या आधारलेल्या आहेत. जर बहुतांश लोकांनी स्वत:च्या कुवतीची अशी सीमा ठरवली नाही तर आपण सगळेच आयर्नमॅन/ वुमन होऊ शकतो.

हे पहा. आयर्नमॅन ही संस्था नफ्यासाठी काम करते. जर भरपूर स्पर्धक त्यांना गोळा करता आले नाही तर प्रायोजकही येणार नाहीत. ही स्पर्धा अनेक देशातून घेतली जाते. प्रत्येक स्पर्धेला अडीच ते तीन हजार स्पर्धक येतात. यातील ६०% तरी स्पर्धा पूर्ण करून आयर्नमॅनचा किताब मिळवतात. दर वर्षी जगभरात तब्बल ५०,००० आयर्नमॅन तयार होतात! आकडा काही लहान नाही.

सर्वसामान्यांना मॅरेथॉनसुद्धा अशक्य वाटते तर आयर्नमॅन फार लांब राहिलं. आणि हीच भावना मला मान्य नाही. फार आधीपासून आपण ठरवून ठेवतो की आपल्याला अमूक काम जमणारच नाही. मान्य की त्या स्पर्धकांचा फिटनेस उच्चकोटीचा असतो पण याचे कारण आहे वर्षानुवर्षांचा सराव, आणि स्वत:च्या क्षमतेवर कुठलेही मानसिक निर्बंध न लावणे!

आयर्नमॅन म्हणजे ४ कि.मी. पोहोणं, १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२ कि.मी. धावणं. आयर्नमॅनचा किताब मिळवायला पोहोणं ३ तासात, पोहोण व सायक्लिंग ९ तासात व संपूर्ण शर्यत १६-१७ तासात पूर्ण करावी लागते. स्त्री-पुरूष-विकलांग सगळ्यांना नियम सारखेच. कुणालाही कसलीही मुभा नाही. तरीही हजारोंनी लोकं या स्पर्धेला गर्दी करतात. म्हणून मी या शर्यतीला अमानवी म्हणणार नाही.

प्र: तरीही, माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे सगळं पचायला जड जातय.

उ: मी समजू शकतो. पण हेच तर मला पटवून द्यायचयं. आपणच ठरवल आहे की आपण साधारण आहोत आणि साधारणच राहणार आहोत.

आता पहा, आयर्नमॅनचा किताब मिळवणारी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे मॅडोना बुडर एक ८६-वर्षीय स्त्री!
अल्ट्रामॅरेथॉनला माझा एक सहस्पर्धक ६७ वर्षांचा, एक पाय नसलेला माणूस होता. आता मला तुमचं वय माहीत नाही...
... मी ४० वर्षांचा आहे...
... तर ४० या वयात तुमच्याकडे काय कारणं आहेत आयर्नमॅन न बनण्याची?!

बहुतेक लोकं आपल्या कुवतीचा एक चतुर्थांश सुद्धा वापरत नाहीत. तुम्हाला तुमची ५०% कुवत जरी अनुभवायची असेल तर एन्डूरन्स स्पोर्टचा नाद लावा. तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला कायकाय शक्य आहे.


प्र: म्हणजे तुम्ही वर नमूद केलेल्या गोष्टी भारतीय स्त्रियांना अनुभवता याव्या म्हणून पिंकथॉनची सुरूवात केली का?

उ: नाही. पिंकथॉन ही जगातील सर्व स्त्रियांसाठी आहे. अनेक स्त्रियांना धावण्याची आवड/इच्छा असते पण जमत नाही. नुकतचं, इंग्लंडमधील एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की स्त्रिया guilt किंवा दोषभावनेने पळणे किंवा इतर क्रिडांमधे भाग घेत नाहीत. आपण मुलांना, परिवाराला द्यायचा वेळ दुसरीकडे घालवू नये ही त्यामागची भावना. स्त्रियांना यातून बाहेर काढून स्वत:ला समजून घ्यायची संधी म्हणजे पिंकथॉन. त्यांनाही कळलं पाहिजे की त्या काय साध्य करू शकतात. धावण्यावर पुरूषांची मक्तेदारी आहे काय!

आपल्या जगात पुरूषप्रधान संस्कृतीच आहे. ह्याचे परिणाम बायकांवर वेगवेगळ्या पद्धतीने होतात. आपल्याकडे बायकांना रस्त्यावर सुरक्षितपणे धावायची सोय नाही. म्हटलं, त्यांची अशी 'स्पेस' निर्माण करावी... पिंकथॉन.

माझ्या पहिल्या हाफ मॅरेथॉनसारखच पिंकथॉनबद्दल अनेकांनी शंका काढल्या: तेवढ्या बायका येणारच नाहीत धावायला, प्रायोजक मिळणार नाहीत, वगैरे. पिंकथॉन आता भारतातल्या ११ शहरांत पोहोचली आहे. गेल्या वर्षी ८०,००० स्त्रिया यात सहभागी झाल्या होत्या!


प्र: मग सिंगापूर हे बाराव्व शहर होऊ शकेल का?

उ: सिंगापूरमधे उत्तमोत्तम मॅरेथॉन्स आहेत आणि फक्त स्त्रियांसाठीपण मॅरेथॉन्स आहेत.

प्र: पण इथे मिलिंद सोमण नाहीत

उ: मला नाही वाटत सिंगापूरला मिलिंद सोमणची गरज आहे (हसत). पण जर प्रायोजक मिळाले तर नक्की विचार करता येईल यावर!

प्र: मग यापुढे काय? पुस्तक लिहीणार का चित्रपट काढणार?

उ: डबल-आयर्नमॅन पूर्ण करणार !

प्र: एवढ्या व्यापात तुम्ही विश्रांती कशी घेता? 'अनवाइन्ड' कसे होता?

उ: काही विशेष नाही. मी सतत स्वत:शी कनेक्टेड असतो. माझ्या शरीर, मन, अंत:करण व भावनांबद्दल मी कायम सजग असतो, मला जाणीव असते. जाणीवपूर्वक मी अनवाइन्ड करत असतो…


-केशव पाटणकर











८ टिप्पण्या:

  1. Very good interview Keshav. am a fan of Soman, one of the few men i respect. he interests me particularly because i read about running, physical fitness as part of my research on walking, running. he is amazing. and his mother. all very inspiring. best.

    उत्तर द्याहटवा
  2. When I saw him in Ashaji's "Raat Shabanami" in the year 1997, he stole away my heart.
    20 years later, he inspired me to stay fit and healthy. Trying to follow his footsteps and this interview is a booster👌😀

    उत्तर द्याहटवा