माझे मन

मला आयुष्य म्हणजे सगळ्या भावभावनांची सरमिसळ वाटते. कधी ते खूप सोपे वाटते तर कधी कधी, “मी आता पुढे काय करणार”, असा प्रश्न पडतो. असे माझा मुलगा एकदा मला म्हणाला. जेव्हा ऋतुगंधचा या महिन्याचा विषय वाचला तेव्हा मी ठरवलं की ह्या विषयाचा आधार घेऊन माझ्या मुलांच्या मनात खरंच काय चाललं आहे याचा मागोवा घ्यावा.

ते एकमेकांना त्यांची स्पेस देतात, कोणावरही आपले विचार लादत नाहीत. कुठलीच जबरदस्ती ते करत नाहीत. ते आयुष्य येईल तसे घेण्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि आपलं लाईफ आपल्या मनाप्रमाणे कसं जगता येईल याबद्दलच्या त्यांच्या कल्पना सुस्पष्ट आहेत. ही पिढी सगळ्या घटनांकडे निरिच्छ भावनेनेही बघते आणि त्याचवेळी आपले मत स्पष्टपणे मांडायलाही मागे पुढे पाहत नाही.

जप, तप, पूजाअर्चा यांचे अवडंबर माजवण्यापेक्षा ते आपल्या आईवडिलांनाच दैवत मानतात; कदाचित भौतिक सोयी सुविधा निरपेक्ष बुद्धीने पुरविणारे साधन अशी त्यांची धारणा असते की काय?

उच्च शिक्षित आणि आर्थिक स्तर उत्तम असणारे पालक उत्तम बालसंगोपन म्हणजे त्यांना सर्व प्रकारच्या भौतिक, अत्याधुनिक सोयी सुविधा पुरविणे असे मानतात. यामध्ये मुलांची भावनिक गरज विचारात घेतलीच जात नाही. याच सोयी सुविधा ज्यावेळी मुलं आणि पालक यांच्यामध्ये विसंवादास कारणीभूत होतात तेव्हा पालक खडबडून जागे होतात.

मुलांचे म्हणणे असे आहे की आईवडील त्यांना “हे करू नको, ते करू नकोस”, हे नुसते सांगतात पण त्याऐवजी काय करावे हे सांगत नाहीत. आमच्या लहानपणी आम्ही हे करत होतो ते करत होतो तुमच्यासारखे वेळ वाया घालवत नव्हतो. पण आपण अनेक गोष्टी विसरतो की आपण एकत्र कुटंबात वाढलो. त्यामुळे आपल्यावर लक्ष ठेवायला कोणी ना कोणीतरी असायचेच. आपल्याला खूप आते, मामे, चुलत भावंडे असत, ज्यांच्याबरोबर आपण खूप काही बोलू शकत असू. आपल्यावर मोठ्या माणसांकडून चांगले संस्कार होत असत. काय खरे काय खोटे हे सांगणारे , मार्गदर्शन करणारे अनेक जण असत. आजकाल त्याची जागा इन्टरनेट , गूगल, फेसबुक यांनी घेतली आहे.

आपण नेहेमीच कामात व्यस्त असतो त्यामुळे घरी आल्यावर मुलांशी बोलण्यात आपल्याला काहीच रस नसतो पण त्यांना आपल्याशी दिवसभराच्या गोष्टी बोलायच्या असतात, खूप काही सांगायचं असतं. त्यांच्या समस्या सोडवण्यात आपली मदत हवी असते. पण आपण बरेचदा दुर्लक्ष करतो. त्यामुळे हळू हळू ते एकलकोंडी बनत जातात आणि आपल्या गोष्टी आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते चुकतात किंवा यशस्वी होतात. पण आपल्यापासून लांब मात्र होत जातात.

मुलांना कायम वाटत असतं की आपण जेव्हा आपल्या पालकांशी बोलतो तेव्हा त्यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांच्या गमती जमती ऐकाव्यात . त्यांच्याशी गप्पा माराव्यात आणि आम्ही तुमच्या पाठीशी कुठल्याही प्रसंगात ठामपणे उभे आहोत असे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा.
खरंच हे सगळे किती बदललं आहे याची आपल्याला कल्पना तरी आहे का?
इंटरनेट मुळे गोष्टींमधला हळुवारपणा संपला आहे. काहीही तुम्हाला माहित करून घ्याचे असेल तर ते लगेच तुम्हाला शोधता येतं.

हे सगळं जर थांबवायचं असेल आणि पुन्हा आपल्या मुलांबरोबर उत्तम नेट (जाळं) विणायचं असेल तर आपण थोडं थांबूया, आपल्या मुलांना आपला वेळ देऊ या. त्यांचं बोलणं ऐकूया. त्यांच्याशी नव्याने संवाद साधुया.

- सौ अनुराधा मिलिंद साळोखे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा