यदा यदा हि…

१८ मे २०१५. नेहमीप्रमाणेच बातम्यांसाठी टीव्ही चालू केला. पहिलीच बातमी होती ‘के. ई. एम. मधील नर्स अरुणा शानभागचा मृत्यू.’ मन उदास झाले, भूतकाळात गेले. आज त्या घटनेला ४२ वर्षे झाली. हा एवढा दीर्घ काळ त्या एवढ्याशा जीवानं अनंत यातना भोगल्या. तीच अरुणा शानभाग - एक परिचारिका; दुःखी जीवांच्या अहर्निश सेवेचं असिधाराव्रत घेतलेली कोमल हृदयाची एक सेवाभावी स्त्री! स्वतःचं दुःख बाजूला सारून इतरांच्या दुःखावर वात्सल्याची फुंकर घालून त्यांच्या वेदनेचा दाह कमी करणारी ममतेची मूर्ती. कारवारमधील हळदीपूर या छोट्या गावातून ती स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली आणि के. ई. एम. सारख्या मोठ्या इस्पितळात नर्स म्हणून दाखल झाली. सगळ्याच पीडितांना आपलं मानलं; ना जात, ना धर्म, ना रंग, ना रूप, ना श्रीमंत, ना गरीब - कसलाच भेदभाव केला नाही. "हा माझा तो परक्याचा ही खुज्या मनाची मोजणी| विशाल ज्यांचे हृदय तयांना धरा कुटुंबासारखी||" या परिवारातीलच ती एक होती. 

पण पदरी काय पडलं? एका कामपिपासू सैतानाच्या लग्नाच्या मागणीला नकार दिला म्हणून माणूस एवढा क्रूर होऊ शकतो? त्या नराधमाने कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळला; तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्याच इस्पितळातील एका डॉक्टरबरोबर तिचं लग्न ठरलं होतं. वैभवशाली सुखी जीवनाचं उत्तुंग स्वप्न तिनं फुलवलं होतं. त्या स्वप्नाची २७ नोव्हेंबर १९७३ च्या रात्री राख झाली. मान आवळल्याने तिच्या नसा बंद झाल्या आणि तिची शक्ती, वाचा, दृष्टी, संवेदना कायमच्या गेल्या. एक अचेतन शरीर राहिलं, फक्त ४२ वर्षे! २४ वर्षे ती जगली आणि ४२ वर्षे अनंत मरणे मरत राहिली. बलात्कारी सोहनलाल फक्त ७ वर्षांची सजा भोगून परत आला आणि सुखलोलुप जीवन भोगू लागला. या ४२ वर्षाच्या दीर्घ काळात नर्सेस, डॉक्टर आणि इतर अनेक जणांनी न कंटाळता तिची सेवा केली. 'वसुधैव कुटुम्बकम्' म्हणणाऱ्यांना हा नियतीचा शाप असावा. नाही तर ज्ञानदेव, महात्मा फुले, सावित्री बाई, महर्षी कर्वे यांच्या पदरी अवहेलनेचं दुःख का आलं असतं? 

आपण म्हणतोय जग बदलले आहे. वर्षानुवर्षे विशाल भासणारे विश्व मानवाच्या अद्भूत चमत्कारांनी छोटे झाले आहे. कोसो मैलांचं अंतर बोटाच्या चिमटीत आलंय. पण खरंच जग बदललंय का? कशात बदल झालाय? माणसाच्या प्रगल्भतेत, त्याच्या आचरणात, का कृतीत? खरं म्हणजे एवढ्या अफाट शोधांनंतर माणूस सुखी व्हायला हवा होता. कुठं आहे सौख्य? कुठं आहे आनंद? कुठं आहे शांती? सगळं भोगून देखील माणूस अतृप्तच आहे, अशांत आहे आणि दुःखी देखील कारण चंगळवादी ग्राहक संस्कृतीत आपली वैश्विक शांतीची संस्कृती केंव्हाच लोप पावली आहे. सांस्कृतिक, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. पैसा मिळविण्याच्या हव्यासापायी व्यक्तिगत स्वार्थ फोफावल्याने कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. मुलांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असणारी विवाह बंधने नकोशी वाटून live in relationship चा मार्ग सुकर वाटू लागलाय. संपत्तीच्या भोगाचा मोह पडलाय आणि संततीची गैरसोय जाणवू लागली आहे. घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय आणि वृद्ध माता-पित्यांचे पाय वृद्धाश्रमाकडे वळू लागले आहेत. शेजारधर्म, मग तो वैयक्तिक असो वा आंतरराष्ट्रीय, शब्दकोशातून हद्दपार झालाय. धनिक गरीबांवर, बलवान दुर्बलांवर, सैतान मानवतेवर अत्याचार करतो आहे. जीवनातील शांती लोप पावली आहे. जीवन अशाश्वत झाले आहे. जीवनाची क्षणभंगुरता अस्वस्थ करतेय. मृत्यूचे भय माणसाला अखंड जाळते आहे. माणूस निसर्गावर मात करू पाहतोय पण तो हे विसरला आहे की ती एक शाश्वत, चिरंतन शक्ती आहे. 

खरं म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर युनो ची स्थापना झाली ते वैमनस्य नको, विश्वबंधुत्व हवं म्हणून. पण आज जैविक आणि आण्विक शस्त्रांच्या भीतीने जगाची झोप उडाली आहे. जग विनाशाच्या काठावर उभे आहे. धर्माच्या अफूने माणसातल्या संवेदनाच बोथट झाल्याने आत्मघातकी सेना बनवून तो मानवी जीवन नरकमय बनवतो आहे. न्यायदेवता आंधळी झालीये. धनदांडग्यानी तिला आपली बटीक बनवली आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशात मनुष्यवधाची एक केस १२ वर्षे चालते आणि अपराध्याला जामीन मिळवण्यासाठी २ तास देखील पुरतात. लाखो शेतकऱ्यांच्या आत्मदहनाने लोक दुःखी होताना दिसत नाहीत. सत्तेपुढे आणि संपत्तीपुढे माना न झुकवणारे कॉन्स्टेबल जाधवसारखे अधिकारी कवडीमोलाने मारले जातात आणि सट्टाबाजार करणारे सत्ताधीश उजळ माथ्याने फिरत आहेत. कुठं आहे उज्ज्वल भवितव्य? खरं म्हणजे उषःकाल होता होता परत अंधःकार वाढू लागलाय. 

मग जग चांगलं नाहीच का? आहे ना .. जरूर आहे. भौगोलिकदृष्ट्या जग जवळ आलंय, दळण-वळणाच्या साधनांची उपलब्धता वाढली आहे, औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडविला आहे, तंत्रज्ञानात अद्भूत क्रांती घडली आहे तरी पण माणूस कशाच्या तरी, कुणाच्या तरी शोधात आहे. कारण आता त्याचीच गरज आहे. तोच तर म्हणाला आहे "यदा यदा हि धर्मस्य …. संभवामि युगे युगे।"

- विनय सावंत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा