इच्छा तिथे मार्ग...

"आई , कशाला आणलीस ग हिला तू? मी एकटी तुला पुरेशी नव्हते का? आता माझ्या लाडांमध्ये भागीदारीण आली.." शुतुल ची मोठी बहीण तिच्या जन्मानंतर आईला म्हणत होती. त्यांवर आईने तिला समजावले, “अग ही तुझी छोटी बहीण आहे. तू ताई झालीस आता. तू बाळाला खूप लाड कर, बाळाबरोबर खेळ, मोठी झालीस ना की तुलाच किती छान वाटेल बघ आपल्याला बहीण मिळाली म्हणून ."

शुतुल म्हणजे दुसरी कोण नाही तर माझी सख्खी बहीण श्रुती नायक आणि आताची श्रुती शर्मा. ऋतुगंध ने "ह्याला जीवन ऐसे नाव " हा विषय जेव्हा लिखाणास दिला तेव्हा माझ्या बहिणीशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली नाही आणि मला आज माझ्या आईचे आणि माझे वरील संभाषण आठवले. शुतुल ची ताई म्हणजे मी आज गर्वाने सर्वांना सांगते की श्रुती माझी बहीण आहे.

लहानपणापासूनच श्रुती हुशार. शाळेमध्ये पाचाच्या आत कायम हिचा नंबर. पण गर्व लहानपणापासून कधीच केला नाही. अतिशय जिद्दीची आणि स्वतःला हवं त्यासाठी कितीही कष्ट करून प्राण पणाला लावून ती गोष्ट आत्मसात केल्या शिवाय ही शांत बसू शकत नाही. ती एक ध्येय डोळ्यासमोर ठेवते आणि ते साध्य केल्यावरच शांत झोपते.

अभ्यासात हुशार तर होतीच पण लहानपणापासून तिला चित्रकलेचे भारी वेड. रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा किंवा आनंद मासिकांमधली कोणतीही स्पर्धा असो हिने पारितोषिक पटकावलं नाही असं झालंच नाही. आपल्या लहानपणी कला (आर्टस्), वाणिज्य (कॉमर्स), विज्ञान (सायन्स) ह्याच पदवी घेण्यासाठी योग्य शाखा असे साधारण गृहीत धरले जात होते. पण श्रुतीने मनाशी पक्कं केलं होते की ती करिअर करेल तर फक्त चित्रकलेमध्येच नाहीतर काही करणार नाही. आमच्या शाळेतल्या सौ. पेडगावकर बाईंना ती ह्या गोष्टीसाठी अजूनही मानते. त्यांनी वेगळी दिशा दाखवली, मार्गदर्शन दिले आणि "कंमर्शिअल आर्टिस्ट" च स्वप्न दाखवलं आणि आज श्रुतीने ते पूर्ण करून दाखवलं.

दहावीनंतर फाऊंडेशन कोर्स करून त्यात उत्तम मार्क मिळवून सुद्धा हिला कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यास त्रास होत होता ते केवळ आरक्षणामुळे. एका कॉलेज च्या मुख्याध्यापकाने तर, "मुलींना हे शिकून काय करायचे. नंतर गोल गोल भाकऱ्याच करायच्या आहेत." असे उत्तर दिले होते. पण देवाची साथ कायम असते म्हणतात ना तसं स्वबळावर, स्वतःच्या हिमतीवर सोफिया कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन अतिपरिश्रम करून हिने हा कोर्स पूर्ण केला आणि मुलींचा जन्म भाकऱ्या करण्यासाठी नाही हे सिद्ध करून दाखवलं. शिक्षण घेताना अनेक जाहिराती बनवण्याचे प्रशिक्षण हिने घेतले. एका अत्तर बनवणाऱ्या कंपनीला कॉलेज चे प्रोजेक्ट बनवताना "Laaila" हे नाव सुचवल्याचे हिला पारितोषिकं ही मिळाले होते.

शाळेतले स्वप्न पूर्ण झाले तर ही आता नोकरीची स्वप्नं पाहू लागली होती. Ogilvy अँड Mather ही अतिशय प्रसिद्ध जाहिरात कंपनी. मी नोकरी करेन तर फक्त श्री.पियुष पांडे ह्यांच्या Ogilvy मधेच ही तिची अट होती, बरं का. आता एवढ्या मोठ्या माणसाला भेटणं काही शक्य नाही. पण ते सुद्धा हिने जिद्दीने साध्य केलं. कोणत्यातरी पार्टी मध्ये हिला श्री. पियुष पांडे भेटले . हिने आपला त्यांना portfolio दाखवला. त्यांनी लगेच मला ऑफिस मध्ये येऊन भेट म्हटले आणि हिच्या कामावर खूष होऊन तिला trainee म्हणून घेतले.

दिवस नाही रात्र नाही ही आपल्या कामाच्या इतकी आहारी जायची की घरी उशिरा येऊन आईला मनस्ताप देत असे. पण कामामुळे, तिच्या मेहनतीमुळे बढतीवर बढती घेत माझी बहीण बघता बघता trainee ची आर्ट डायरेक्टर झाली. फ्रान्स ला "Cannes Advertising Festival" साठी सुद्धा हिला निवडून कंपनी तर्फे बक्षीस घेण्यासाठी पाठवले होते. फेविकॉल, मेन्टॉस, बजाज इलेक्ट्रिकल अशा अनेक प्रसिद्ध जाहिरातींवर तिने काम केले आहे.

"तू लग्न कर, मी लग्न करणार नाही मी आई बाबांना सांभाळणार ." असे कायम मला लहानपणी सांगत आलेल्या हिने मात्र आपला जोडीदारही प्रेम विवाह करून जिद्दीने मिळवला आहे. जाहिरातीच्या प्रोजेक्ट साठी हिला कुठे तो राजीव भेटला आणि सैन्यात मेजर असलेला तो हिच्या प्रेमात पडला. दोघांचे जमले आणि हिने घरी सांगितले की मी लग्न करेन तर राजीव बरोबरच. आई बाबांचा ठाम विरोध होता. राजीव पंजाबी, आम्ही कट्टर सारस्वत, हा आर्मी मध्ये आणि ही जाहिरात युगामधली, परत मुंबईचे स्थळ नाही. सगळंच वेगळं त्यामुळे लग्नाला होकार मिळवणं काही सोपं नव्हतं. पण तो सुद्धा ह्या मुलीने इतक्या सहजतेने आईकडून मिळवला की थाटामाटात आई बाबांनी हिचं लग्न करून दिलं.

लिखाणाची, कवितेची आवड हिला पहिल्यापासून. दुसरीत असताना हिने चिमणीवर कविता केली होती. हिचे फार कौतुक झाले होते आणि शाळांमधून कविता करत हिने सलग आंतरशालेय कल्पकला स्पर्धेमध्ये भाग घेऊन सलग तीन वर्षे काव्यलेखन आणि काव्यवाचनामध्ये बक्षिसे मिळवली. हिची गणपती दूध प्यायला होता ह्या आशयाची कविता दिवाळी अंकामध्ये छापून आली होती जेव्हा ही शाळेमध्ये होती. आज त्या लिखाणाचा उपयोग हिने असा करून घेतला आहे की ही छान छान लिहिते, प्रोफेशनल लिखाण सुद्धा करते. 

अजय जडेजा ची ही मोठी फॅन. मी त्याला भेटणारच असं सांगून हिने त्याचा फॅन क्लब जॉईन केला. त्याला भेटली , त्याला त्याच्यावर केलेली कविता भेट केली आणि मग हिला समाधान मिळाले. 

आज ह्या मुलीने एक अतिशय कठीण गोष्ट साध्य करून दाखवली आहे आणि त्यासाठी मला तिचा अतिशय अभिमान आहे. शाळेत असताना श्रुतीला सुदृढ बालिका म्हणून बक्षीस मिळाले होते. अतिशय जाडी असल्यामुळे हिला सगळेच चिडवायचे. आमचे बाबा हिला लाडाने कद्दू , ढोलू म्हणायचे. मी बारीक होऊन दाखवणारच ही जिद्द तिच्या मनाने घेतली आणि गेल्या तीन वर्षांपासून ती धावण्याचे प्रशिक्षण घेत आहे. तिने अनेक हाल्फ आणि अल्ट्रा मॅरेथॉन धावून पूर्ण केल्या आहेत. त्यापैकी एका १०० किलोमीटर च्या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन ९५ किलोमीटर धावून हिने ती मॅरेथॉन पण पूर्ण केली. डाएट करून अतिपरिश्रम घेऊन, धावण्याची मॅरेथॉन करून आज हिने नक्कीच लोकांसमोर बारीक होण्याचे उदाहरण ठेवले आहे. 

आज श्रुती एक गृहिणी आहे. घरात बसून सुद्धा एके काळी "Young creative Artist" हा जगामध्ये मान मिळवलेली श्रुती जाहिरात युगात अजूनही काम करून पारितोषिकं मिळवत आहे. त्याबरोबरच ती लिखाण करते, कविता करते, मॅरेथॉन करते, पेन्टिंग करते आणि नवरा बॉर्डर वर असेल तर आपल्या मुलाला एकटी छान सांभाळते. खूप positive energy असलेली माझी बहीण सर्व गुण संपन्न आहे हे मी गर्वाने सांगू शकते. कर्नल राजीव शर्मा ची बायको म्हणून जवानांच्या बायकांचे सुद्धा मनोबल वाढवण्याचे काम अतिशय उत्तम रित्या पार पाडते . कोणा गरिबाला काही मदत लागली तर हिचा मदतीस हात पहिला पुढे असतो.

आपले स्वप्न, लक्ष्य एक ठेवून जिद्दीने कष्ट आणि मेहनत करून आपली इच्छा जबर असेल तर आत्मविश्वासाने ते साध्य करता येत हे अनेक उदाहरणांनी श्रुतीने सर्वांस दाखवून दिले आहे. आज मी आईबाबांना खरोखर धन्यवाद देते आणि म्हणते " बरं झालं हिला तुम्ही आणलीत मला लेख लिहायला घरातलेच उत्तम उदाहरण मिळाले." हाहाहाहा ....

श्रद्धा सोहोनी


२ टिप्पण्या:

  1. Shraddha, you have become great writer.Your confidence in narrating your sister is par excellence. One gets engrossed in your write up & shares your emotional state 100%. That is the gift you have achieved thru this write up. To become good and sustain writer one has to expose oneself to many more experienced if one has to become writer of repute. This is what Somerset Maugham says from his own knowledge. Write up cannot be one time flash up. You have displayed that talent. Pl read book of Writers Notebook by Maugham .You will get many clues for your future. All said we understood more about Shruti thru you and thoroughly enjoyed that love and emotions behind it. Keep up. It was a devastating experience and we can now say - oh that last-minute she is my niece.Vasantmama

    उत्तर द्याहटवा